माजगावच्या विकासाचा वारसा चालवण्यासाठीच सावंतांना उमेदवारी

माजगावच्या विकासाचा वारसा चालवण्यासाठीच सावंतांना उमेदवारी

Published on

swt57.jpg
22234
माजगाव ः महायुतीच्या प्रचार सभेत बोलताना पालकमंत्री नीतेश राणे. बाजूला आमदार दीपक केसरकर, अशोक दळवी, मनीष दळवी व इतर.

माजगावच्या विकासाचा वारसा
चालवण्यासाठीच सावंतांना उमेदवारी
नीतेश राणे ः महायुतीची प्रचार सभा
​सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः माजगाव मतदारसंघाला विकासाची एक मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. तोच वारसा पुढे नेण्यासाठी विक्रांत सावंत समर्थ आहेत. या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः घेतो, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली.
तालुक्यातील माजगाव जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रांत सावंत, पंचायत समिती गणाचे उमेदवार सचिन बिर्जे आणि उत्कर्षा गावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. माजगाव येथील सिद्धिविनायक सभागृहात ही सभा झाली. यावेळी श्री. राणे यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांनी जिल्ह्यात विकासाची जी घोडदौड सुरू केली होती, ती वाखाणण्याजोगी आहे. सध्या केंद्रापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत सर्वच सत्ताकेंद्रे महायुतीच्या ताब्यात आहेत. विकासासाठी लागणाऱ्या निधीच्या सर्व चाव्या आमच्याकडे असल्याने या भागाच्या प्रगतीसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे ते म्हणाले.
माजी मंत्री आमदार केसरकर म्हणाले, ‘‘भाईसाहेब सावंत यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचे काम विक्रांत सावंत करत आहे. ते महायुतीचे उमेदवार असून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करावे.’’
या सभेला जिल्हा बँक संचालक मनीष दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सावंत, माजी सभापती अशोक दळवी, उमेदवार विक्रांत सावंत, सचिन बिर्जे, उत्कर्षा गावकर, श्याम कासार, महेश धुरी, मधुकर देसाई उपस्थित होते.
​....................

swt58.jpg
22235
तळवडे : येथे ठाकरे शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे उमेदवार रुपेश राऊळ यांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेले शिवसैनिक.

सावंतवाडीत ठाकरे शिवसेनेचा
मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर
दोनच ठिकाणी उमेदवार ः अपक्षांनाही पाठबळ
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः तालुक्यात ठाकरे शिवसेनेचे जिल्हा परिषदेसाठी दोनच ठिकाणी उमेदवार आहेत. उर्वरित सहा ठिकाणी त्यांची मते निकालावर प्रभाव टाकणारी ठरण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी त्यांनी अपक्षांना पाठिंबा दर्शवला आहे. तालुक्यात जाहीर सभांपेक्षा थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यावर ठाकरे शिवसेनेने भर दिला आहे.
तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे शिवसेनेची मते विजयी उमेदवारासाठी निर्णायक ठरणार आहेत. तालुक्यात केवळ दोन जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये ठाकरे सेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. उर्वरित सहा ठिकाणी त्यांचा उमेदवार नाही. काही ठिकाणी ठाकरे सेनेने अपक्षाला पाठिंबा दर्शविला आहे, तर काही ठिकाणी छुपी युती पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडींकडे पाहता दोन मतदारसंघ वगळता अन्य ठिकाणी ठाकरे शिवसेनेची मते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आणि विजयाची गणिते जुळविणाऱ्या उमेदवारांसाठी निश्चितच निर्णायक ठरणार आहेत. ठाकरे सेनेची मते ज्या पक्षीय उमेदवारांच्या मागे राहतील किंवा तुल्यबळ अशा अपक्ष उमेदवाराच्या पारड्यात पडतील, त्याचे पारडे निश्चितच जड होणार आहे. सावंतवाडी तालुक्याचा विचार करता ठाकरे शिवसेनेची ठरलेली हक्काची मते आहेत. गावागावांत बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यांची मते कोणाच्या पारड्यात पडणार, त्यावरून त्या त्या मतदारसंघातील विजयाचे गणित निश्चित होणार आहे.
सावंतवाडी तालुक्यात विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून एकाकी खिंड लढवली आहे, तर दुसरीकडे माजगाव मतदारसंघातून दिनेश सावंत जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरले आहेत. एकूणच भाजप विरोधात ठाकरे शिवसेनेकडून दिली जाणारी झुंज लक्षवेधी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com