अरबी समुद्रात शीतलहरींचे संकट
समुद्रातील शीतलहरींचा मासळीवर परिणाम
मच्छीमार नौका माघारी; कोट्यवधींचे नुकसान, बाजारातील आवक घटली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः अरबी समुद्रात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वादळीवाऱ्यांच्या लहरींमुळे किनारपट्टीवरील मच्छीमारी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. खोल समुद्रातील पाणी गारठल्याने मासळी मिळेनाशी झाली असून, रत्नागिरीतील काही मच्छीमार नौका रिकाम्या माघारी परतत आहेत. या संकटामुळे मच्छीमारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे.
खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे आता मच्छीमारांसाठी लॉटरी ठरत आहे. एका बोटीच्या सहा दिवसांच्या फेरीचा हिशोब केल्यास खर्च थक्क करणारा आहे. एका ट्रीपसाठी डिझेलचा खर्च अंदाजे ३ लाख रुपये, बर्फ खर्च २५ हजार रुपये, रेशन व पाणी (१७ कर्मचारी) २५ ते ३० हजार रुपये असा एकूण साडेतीन लाख रुपयांहून अधिक खर्च करूनही बोटी रिकाम्या परतत असल्याने मच्छीमार हतबल झाले आहेत. अनेकांनी सुरवातीचे सहा दिवस मासळी न मिळाल्याने धाडस करून आणखी सहा दिवस (एकूण १२ दिवस) समुद्रात मुक्काम ठोकला; मात्र डिझेल आणि रेशन संपत आल्याने अखेर रिकाम्या बोटी किनाऱ्याला लावण्याशिवाय पर्याय उरला नाही. सध्या, मासळीची आवक घटल्याने मासळी विक्रेत्या महिलांच्या उत्पन्नावर गंडांतर आले आहे. ‘विक्रीसाठी मालच उपलब्ध नसेल तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? असा प्रश्न महिला विक्रेत्यांकडून केला जात आहे.
थंड वाऱ्यांचा जोर आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्या बोटींना थोडीफार मासळी मिळाली त्यांना मिळालेले उत्पन्न खर्चाच्या १० टक्केही नसल्याचे मच्छीमार सांगत आहेत. समुद्र शांत होऊन मासळी पुन्हा मिळेपर्यंत मच्छीमारांना सावरण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याबाबत शासन काय भूमिका घेते याकडेही त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
-----
चौकट
आर्थिक मदत जाहीर करा
शीतलहरींमुळे खोल समुद्रातील तापमानात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे मासळी किनाऱ्याजवळ येत नाही. सध्याची स्थिती मत्स्यदुष्काळासारखीच असून, शासनाने मच्छीमारांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

