क्रूर सत्ताधाऱ्यांविरोधातील संघर्षाचे नाट्य ः युटोपिया

क्रूर सत्ताधाऱ्यांविरोधातील संघर्षाचे नाट्य ः युटोपिया

Published on

rat६p२.jpg-
26O22437
रत्नागिरी- राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत लोकरंगभूमी-सांगली या संस्थेने केलेल्या ‘युटोपिया’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ- सकाळ छायाचित्रसेवा)

क्रूर सत्ताधाऱ्यांविरोधातील संघर्षाचे नाट्य ः ‘युटोपिया’
सांगलीतील लोकरंगभूमी शांतीनिकेतन संस्थेकडून सादरीकरण ; कलाकारांच्या अभिनयाला दाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः आदर्श राजकीय व्यवस्था राबवण्याच्या नादात सत्तेचा आलेला कैफ आणि त्या विरोधात सर्वसामान्यांचा संघर्ष चित्रित करणारे ‘युटोपिया’ हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावरील अंतिम स्पर्धेत झाले. लेखक आणि दिग्दर्शन इरफान मुजावर यांच्या संकल्पनेतून साकार झालेले हे नाटक सांगलीतील लोकरंगभूमी शांतीनिकेतन या संस्थेने सादर केले. नेपथ्य, प्रकाशयोजना आणि कलाकारांच्या अभिनयात रंगलेल्या या नाटकाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
--------
सांगलीतील लोकरंगभूमी शांतीनिकेतन संस्थेने हे नाटक सादर केले. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन इरफान मुजावर यांनी केले आहे. युटोपिया (एक कल्पित भयाण वास्तव) हे नाटक ‘किंग’ नावाच्या एका सत्ताधीशाच्या राज्याभोवती फिरते. तो आपल्या राज्यात ‘युटोपिया’ म्हणजे एक असे आदर्श जग निर्माण करू पाहतोय, जिथे गरिबी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि दु:खाला स्थान नसेल; पण हा ‘आदर्शवाद’ प्रत्यक्षात एक हुकूमशाही आहे. या स्वप्नवत जगाच्या निर्मितीत सर्वसामान्य माणसे आणि प्रामुख्याने ‘मिरामी’ नावाची जमात हा मोठा अडथळा आहे, असा समज करून घेऊन सत्ताधारी या साऱ्यांना कैद करतात. राज्यात ‘लाँग लीव्ह युटोपिया, गॉड सेव्ह युटोपिया’ अशा घोषणांचा दणदणाट सुरू असतो; मात्र पडद्यामागे छळछावण्यांमध्ये अमानुष अत्याचार होत असतात. विरोध करणाऱ्यांना भररस्त्यात गोळ्या घातल्या जातात. या दहशतीच्या वातावरणात पर्ल ही १० वर्षांची निष्पाप मुलगी, तिची आई ग्लोरी, काका जॉन आणि काकी या एका कुटुंबाची फरफट दाखवण्यात आली आहे.
सत्ताधारी प्रशासनाकडून सर्वांदेखत जॉनची हत्या केली जाते, ज्यामुळे काकी मानसिक संतुलन गमावते. पर्ल आणि ग्लोरीला ‘सुधारणा केंद्रा’च्या नावाखाली छळछावणीत डांबले जाते. सत्तेच्या या खेळाचे गांभीर्य न समजणारी छोटी पर्ल आणि आपल्या मुलाला वाचवण्यासाठी धडपडणारी ग्लोरी यांचा संघर्ष प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवतो. या नाटकात ‘चेरी’ नावाचे एक तृतीयपंथी पात्र आहे, जे समाजाच्या निष्क्रियतेवर आणि ‘षंढ’ मानसिकतेवर भाष्य करते. जेव्हा अत्याचाराची परिसीमा गाठली जाते तेव्हा चेरीचाही लैंगिक छळ केला जातो, जे सत्तेच्या विकृत रूपाचे दर्शन घडवते.
नाटकाचा शेवट अत्यंत हृदयद्रावक आणि प्रेरणादायी आहे. अखेरच्या संघर्षात आपल्या लेकीला, पर्लला वाचवण्यासाठी आई ग्लोरी स्वतःच्या प्राणांची आहुती देते. दरम्यान, युटोपियाच्या छळाला कंटाळलेली सामान्य जनता एकत्र येते आणि या कृत्रिम ‘युटोपिया’वर हल्ला करते. शेवटी, रक्ताने माखलेले ते स्वप्नवत राज्य उद्ध्वस्त होते आणि अन्यायाविरूद्धचा लढा यशस्वी होतो.
-------
सूत्रधार आणि साहाय्य
लेखक/दिग्दर्शक -इरफान मुजावर, प्रकाशयोजना ः श्याम चव्हाण, नेपथ्य -संजय सुतार आणि मयूर पाटील, पार्श्वसंगीत/संगीत निर्मिती - आशुतोष वाघमारे, ध्वनी-प्रितीश खंडागळे, रंगभूषा-प्रसाद गद्रे, वेशभूषा-वैष्णवी शेटे, संगीतसाथ-हार्मोनियम-विशाल पारदे, तालवाद्य-सुजित गायकवाड, गायिका-प्रिया दूनघव, सूत्रधार-साईकलाम कोरबू, रंगमंच व्यवस्थापन-आकाश कदम
-----
पात्र परिचय
पर्ल : स्वरा मेंडगुले, ग्लोरी : हर्षाली बेलवलकर, क्युबा : वैष्णवी शेटे, चेरी : इरफान मुजावर, लॉर्ड : मयूर पाटील, फॉक्स : अमर शिंदे, फ्युचर : प्रणिता भिंताडे, लीओ : मनीषा काळे, पॅपिलॉन : तनुजा रणखांबे, डोरा : मधु शिंदे, तोरस्कर, पिकॉक : पूजा देशमुख, अनामिका : संवेदना राठोड, काका/जॉन : आकाश कदम, काकी : विशाखा भोसले, डॉ. स्नेक : साईकलाम कोरबू, स्पून : देवांतक पाटील, शेजारी : प्रणव कोळी, सैनिक : प्रणव गुरव, प्रशांत जगताप.
---------
आजचे नाटक
नाटक ः दी ब्लॅकंड इक्वेशन, सादरकर्ते ः नाट्य आराधना, अहिल्यानगर, स्थळ ः स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह. वेळ ः सकाळी ११.३० वा. संध्याकाळी नाटक नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com