शेतकऱ्याचे वास्तव दाखविणारे नाटक ''बरड''
rat६p६.jpg-
२६O२२४६८
रत्नागिरी- राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी-सोलापूर या संस्थेने केलेल्या ‘बरड’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ- सकाळ छायाचित्रसेवा)
-----
शेतकऱ्याचे वास्तव दाखवणारे ‘बरड’
महाराष्ट्र विद्युत पारेषणतर्फे सादरीकरण ; नेपथ्य, अभिनयाला रसिकांची दाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः सध्या गावातील शेतकरी कुटुंबाच्या वाट्याला आलेल्या जमिनीचे तुकडे होत जात आहेत. दोन भावांच्या भांडणात वर्षानुवर्षे सुपिक जमिन नापिक होताना दिसते आणि हेच वास्तव राज्य नाट्यस्पर्धेत ‘बरड’ या नाटकातून महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण-सोलापूरने सादर केले. मनाला भिडणारी, शेतकऱ्याच्या व्यथा लेखक सुनील डोंगरे यांनी संहितेतून साकार केली. शेतकऱ्याच्या वडिलोपार्जित जमिनीच्या हिस्सा, वाटप, विधवा बहिणीची व्यथा अभिनयातून कलाकारांनी साकार केली. गावातील शेतकरी कुटुंबाचे भावविश्व उभे करण्यास संस्था यशस्वी झाली. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
--------
‘बरड’ या नाटकाची कथा ग्रामीण भागातील एका कुटुंबाभोवती फिरते, जिथे नात्यांतील प्रेमापेक्षा जमिनीच्या तुकड्याला अधिक महत्त्व दिले जाते. या कुटुंबात मोठा भाऊ तुका, धाकटा भाऊ अजिनाथ आणि त्यांची विधवा बहीण तायडी एकत्र राहतात. वडिलांच्या जमिनीचा मोठा हिस्सा तुकाकडे असतो, ज्यामुळे अजिनाथ नाराज आहे. अजिनाथची नजर पाणवठ्यावरील सुपिक आठ एकर जमिनीवर असते. नोकरीनिमित्त तो सधन असला तरी केवळ हव्यासापोटी तो जमिनीसाठी गावात अनेकदा बैठका लावून तुकावर दबाव निर्माण करतो. घरातील वादाला कंटाळून तायडीच्या पतीने पूर्वीच आत्महत्या केलेली असते. पदरी वैधव्य आल्यावर तायडी आपल्या भावांच्या आधाराने माहेरीच राहते; मात्र, तिथेही तिच्या नशिबी दुःखच येते. तिची वहिनी सतत तिला ‘रंडवा’ म्हणून हिणवते आणि तिचा छळ करते. तरीही सामाजिक प्रतिष्ठेपोटी तायडी सर्व अपमान मुकाट्याने सहन करत असते.
अशा नीरस आयुष्यात तायडीच्या जीवनात बाळ्या येतो. बाळ्या हा दुसऱ्या जातीचा असला तरी त्याचे या कुटुंबाशी घरोब्याचे संबंध असतात. त्यांच्यातील वाढत्या जवळीकीची कुणकूण जेव्हा ‘मास्तरां’ मार्फत तुकाला लागते तेव्हा तुका संतापतो. तो तायडीला मारहाण करतो; मात्र तिला घराबाहेर काढावे लागणारे एकाकीपण आणि तिच्या भावना समजून घेण्याऐवजी तो ‘जाती’च्या आणि ‘नाका’च्या प्रतिष्ठेला जास्त महत्त्व देतो. शेवटी, वहिनी तायडीच्या भावना ओळखून तिला पाठिंबा देते आणि बाळ्यासोबतच्या लग्नासाठी तुकाचे मन वळवण्याचे आश्वासन देते.
घरातील हा ‘लफड्या’चा विषय तुका आपला भाऊ अजिनाथकडे नेतो; पण स्वार्थी अजिनाथ तिथेही संधी साधतो. ‘पाणवठ्यावरची जमीन देणार असशील तरच मी यात पडेन, नाहीतर तुमचे तुम्ही बघा,’ असे तो सुनावतो. हतबल झालेला तुका बहिणीच्या भविष्यासाठी शेवटी जमिनीचा हिस्सा देण्यास तयार होतो. पुन्हा एकदा मास्तरांच्या उपस्थितीत बैठक होते. दोन्ही भावांमधील वाद मिटतो आणि जमिनीच्या वाटणीचा नारळ फुटतो; मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य असते. जमिनीचा आनंद साजरा होत असतानाच बातमी येते की, बाळ्याचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. ज्या जमिनीसाठी तुकाने तायडीच्या प्रेमाचा सौदा केला ती जमीन तर हातातून गेलीच; पण तायडीचे आयुष्यही त्या जमिनीसारखेच कायमचे ‘बरड’ (नापीक) होऊन जाते.
-------
सूत्रधार आणि साहाय्य
लेखक ः सुनील डोंगरे, दिग्दर्शक ः अनिल कोलप, संजीव कुमार, तृप्ती मुधोळकर, तंत्रज्ञ ः मनिषा देसाई, आसावरी कुलकर्णी, प्रियांका धांदे, प्रकाशयोजना ः सुचिता भिकाणे, राजू गायकवाड, भरत पाटील. रंगभूषा ः शिल्पा कुंभार, ज्योती चिमटे, नेपथ्य ः विठ्ठल भुजबळ, जयवंत कोकाटे, राम शेळके.
-----
पात्र परिचय
तुका ः प्रताप भोसले, तायडी ः रूपाली राऊत, बाळ्या ः महेश भागवत, अजिनाथ ः नितीन धनवे, सुरकी ः अनुजा जाधव, मास्तर ः रोहित झिरकांडे, दीदी ः शर्वरी मराठे, आनंदा ः पुंजाजी पाटील, अजिनाथचा मित्र- प्रकाश सूर्यवंशी, गावकरी ः अनिरूद्ध जाधव, नितीन बोरले, किशोर झगडे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

