परीक्षेचा ताण अभ्यासापेक्षा इतर गोष्टींनी

परीक्षेचा ताण अभ्यासापेक्षा इतर गोष्टींनी

Published on

rat8p7.jpg-
22889
डॉ. स्नेहल तोडकर-अंधारे

राखूया मनाचे आरोग्य .........लोगो

इंट्रो

परीक्षा जवळ आली की केवळ विद्यार्थ्यांच्याच मनात धडधड होत नाही तर घराघरातील वातावरणही अभ्यासाच्या पुस्तकांसारखे गंभीर होऊन जाते. आजच्या स्पर्धात्मक युगात ''पालक आणि परीक्षा'' हे एक वेगळेच समीकरण बनले आहे; मात्र, हा ताण वेळीच ओळखला आणि हाताळला तर मुलांचे यश अधिक सुकर होऊ शकते. कसे ते या लेखात पाहूया..

- डॉ. स्नेहल तोडकर-अंधारे रत्नागिरी
एमबीबीएस, डीपीएम, एमआयपीएस
----------------------------------

परीक्षेचा ताण अभ्यासापेक्षा इतर गोष्टींनी


परीक्षेचा ताण का येतो हे तपासून पाहिले पाहिजे. ताण येण्यामागे अनेकदा अभ्यासापेक्षा इतर गोष्टी कारणीभूत असतात. उदा. आपली अवास्तव अपेक्षा: ‘‘माझ्या मुलाला ९० टक्केपेक्षा जास्तच हवेत’’ असा अट्टहास ठेवू नका तसेच शेजाऱ्यांच्या किंवा नातेवाईकांच्या मुलांशी केलेली तुलना मुलांचे खच्चीकरण करते शिवाय, मुलांच्या गुणांना पालकांनी स्वतःची सामाजिक प्रतिष्ठा समजण्यास चालू केले तर ताण नक्कीच वाढत जाईल.
ताण हाताळण्यासाठी ‘त्रिसूत्री’: जर ताण खूप वाढत असेल तर खालील गोष्टींचा अवलंब करा. दररोज सकाळी १० मिनिटे मुलांसोबत बसून प्राणायाम करा. सतत ३-४ तास बसण्याऐवजी, दर तासाला ५-१० मिनिटांचा ‘मोबाईल-मुक्त’ ब्रेक घ्या. शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य असल्यास थकवा कमी जाणवतो.​ परीक्षा ही केवळ एका वर्षाच्या अभ्यासाची चाचणी आहे, ती संपूर्ण आयुष्याची परीक्षा नाही. मुलांचे मानसिक आरोग्य हे त्यांच्या निकालापेक्षा कैकपटीने महत्त्वाचे आहे.
जर मुलामध्ये खालील लक्षणे दिसत असतील तर ते तीव्र तणावाचे लक्षण असू शकते. अचानक भूक कमी होणे किंवा खूप जास्त खाणे, झोप न येणे किंवा सतत झोपून राहणे, नेहमीपेक्षा जास्त चिडचिड करणे किंवा शांत राहणे, ‘‘मला काहीच जमणार नाही’’ असे नकारात्मक बोलणे. अशा वेळी मुलाला ओरडण्याऐवजी प्रेमाने जवळ घ्या, घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे. गरज पडल्यास समुपदेशकाची व मानसोपचार तज्ञांची मदत घ्या.

पालकांसाठी सूचना ः ब्रेकदरम्यान मोबाईल पाहिल्यास मेंदू अधिक थकतो. त्याऐवजी पाणी पिणे, डोळे मिटून बसणे किंवा थोडे फिरणे फायदेशीर ठरते. परीक्षेच्या काही दिवस आधीपासूनच टीव्ही व इंटरनेट बंद ठेवा, सतत ओरडाओरड टाळणे आणि सकारात्मक चर्चा करणे यामुळे मुलांची एकाग्रता वाढते. जर तुमचे मूल दिवसाला फक्त २ तास अभ्यास करत असेल, तर थेट १० तासांचे वेळापत्रक लावू नका. हळूहळू वेळ वाढवा. पुरेशी झोप आणि संतुलित आहार हे गरजेचे समीकरण आहे. अभ्यासाच्या नादात मुलांच्या झोपेशी तडजोड करू नका. रात्रीची ७-८ तासांची झोप मेंदूला ताजेतवाने ठेवते व विस्मरण होत नाही.
तसेच भरपूर पाणी प्यायला हवे, अभ्यासाच्या टेबलावर पाण्याची बाटली नेहमी असू द्या. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून, परीक्षेचा काळ हा केवळ मुलांच्या बुद्धीची नाही तर पालकांच्या ''भावनिक स्थिरतेची'' देखील चाचणी असतो. मुलांपेक्षा जास्त भीती पालकांना वाटते आणि ही भीती नकळत मुलांकडे हस्तांतरित होते. वारंवार घड्याळ पाहणे टाळा. तुमची शांतता मुलाला सुरक्षिततेची भावना देते. निकालावर आधारित प्रेम अनेकदा मुलांना असं वाटतं की, जर मला मार्क कमी मिळाले, तर आई-बाबा माझ्यावर रागावतील किंवा प्रेम करणार नाहीत. मुलांना स्पष्ट सांगा की, तू आमचा मुलगा किंवा मुलगी आहेस हे महत्त्वाचं आहे, तुझे मार्क नाहीत. निकालापेक्षा मुलाच्या प्रयत्नांचे कौतुक करा. सततच्या ओरडण्यामुळे मुलांच्या शरीरात ''कॉर्टिसोल'' (स्ट्रेस हॉर्मोन) वाढते, ज्यामुळे त्यांची विचार करण्याची क्षमता कमी होते. याउलट अभ्यासात प्रगती केल्यावर किंवा एखादा अवघड प्रश्न सोडवल्यावर मुलाचे कौतुक करा. यामुळे ‘डोपामाईन’ (हॅप्पी हॉर्मोन) वाढते ज्यामुळे मुलाची एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते. भावनिक आधार द्या. जेव्हा मूल म्हणते की, "मला भीती वाटतेय," तेव्हा ‘‘त्यात घाबरण्यासारखं काय आहे?’’ असं म्हणून त्याला फेटाळू नका. त्याच्या भितीला समजून घ्या. "मला समजतंय तुला टेन्शन येतंय, आपण मिळून यावर काय करू शकतो0" असा संवाद साधा. त्याला तुमच्या पाठिंब्याची जाणीव करून द्या. मुलांशी फक्त अभ्यासाबद्दल बोलण्याऐवजी त्यांच्या आवडीनिवडी आणि मनातील भितीबद्दल बोला. त्यांना हे पटवून द्या की, "तू कितीही मार्क मिळवलेस, तरी आमचे प्रेम कमी होणार नाही." स्वतःची काळजी घ्या. कमी मार्क मिळाले तर पुढे काय होईल अशी चिंता पालकांचा ताण वाढवते आणि मग घरात चिडचिड होते. मुलाच्या परीक्षेसाठी स्वतःची नोकरी, छंद किंवा सामाजिक जीवन पूर्णपणे थांबवू नका. तुम्ही आनंदी राहिलात तरच घर प्रसन्न राहील. पालकांनी जर स्वतःचे मनःस्वास्थ्य जपले तरच मुले शांतपणे व सहजपणे अभ्यास करू शकतील. आवर्जून हे लक्षात ठेवा की, प्रत्येक फुलाचा फुलण्याचा काळ वेगळा असतो. आपल्या मुलाची क्षमता ओळखून त्याच्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे.

(लेखक सुवर्णपदकप्राप्त मानसोपचारतज्ञ , व्यसनमुक्तीतज्ञ व समुपदेशक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com