''द ब्लॅन्क्ड इक्वेशन'' मधून अणुबॉम्बच्या विनाशाचे दर्शन
rat8p12.jpg-
22902
रत्नागिरी ः नाट्य आराधना, अहिल्यानगर या संस्थेने सादर केलेल्या ‘द ब्लॅक्ड इक्वेशन’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
---------
राज्य नाट्य स्पर्धा - लोगो
‘द ब्लॅन्क्ड इक्वेशन’मधून अणुबॉम्बच्या विनाशाचे दर्शन
अनोख्या विषयावरील नाटक ; अभिनय, नेपथ्याला दाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ः अणुबॉम्बचे दूरगामी दुष्परिणाम या आंतरराष्ट्रीयस्तरावरील गंभीर विषय ‘द ब्लॅन्क्ड इक्वेशन’ या संहितेतून लेखक चंद्रकांत चौधरी यांनी हाताळला आहे. दिग्दर्शन तेजस अतितकर यांच्या संकल्पनेतून राज्य नाट्य स्पर्धेत येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाटयगृहात या नाटकाचा प्रयोग झाला. छोट्या-छोट्या प्रसंगातून व संवादातून अणुऊर्जेचे संभाव्य फायदे आणि त्याचे विनाशकारी धोके लक्षात घेऊन शांतता आणि मानव कल्याणासाठीच त्याचा वापर व्हावा, असा संदेश देण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला आहे. रंगमंचावरील कलाकारांचा अभिनय, नेपथ्यातून रंगलेल्या नाटकाला रसिकांनी दाद दिली.
-------
काय आहे नाटक ?
‘द ब्लँक्ड इक्वेशन’ हे नाटक मानवी महत्त्वाकांक्षा, विज्ञानाचा संहारक वापर आणि युद्धाचे भीषण परिणाम यांचा वेध घेते. अमेरिकेने जपानवर टाकलेला अणुबॉम्ब आणि त्यानंतरची परिस्थिती यावर हे नाटक भाष्य करते. नाटकाची सुरुवात जपानवरील अणुबॉम्ब हल्ल्याच्या भीषण वातावरणाने होते. सायरन, लढाऊ विमानांचे आवाज आणि जळत्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर जेतो आणि हकुझो यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले दिसते. त्यांची नातवंडे, चिओ आणि तनाका, यांना लष्करी अधिकारी सुरक्षिततेच्या नावाखाली लष्करी तळावर घेऊन जातात. दुसरीकडे, अमेरिकन अणूशास्त्रज्ञ रॉबर्ट ओपेनहायमर ''ट्रिनिटी'' चाचणीनंतर अपराधीपणाच्या भावनेत अडकलेले दिसतात. आपली मैत्रीण नताली आणि वडील यांच्याशी असलेल्या नात्यातील ताणतणाव त्यांच्या अंतर्मनातील द्वंद्वाचा भाग बनतात. जपानचे अणूशास्त्रज्ञ डॉ. निशिना यांच्यावर जपान सरकार अणुबॉम्ब बनवण्यासाठी दबाव टाकत असते. त्यांची सहकारी मासाको हिच्याशी चर्चा करताना डॉ. निशिना विज्ञानाच्या संहारक रूपाबद्दल चिंता व्यक्त करतात. दुर्दैवाने, मासाकोचा एका हल्ल्यात मृत्यू होतो, जे युद्धातील अनिश्चिततेचे प्रतीक आहे. दुसऱ्या अंकात अणुबॉम्बने उद्ध्वस्त झालेले शहर आणि मृत नागरिकांचा खच दिसतो. जपानी सरकारचे उपसरसेनापती सूडाच्या भावनेने पेटलेले असतात. ते डॉ. निशिना यांना संशोधनासाठी धमकावतात, मात्र निशिना त्यांना अणुबॉम्बची ‘हजार सूर्यांच्या प्रकाशाएवढी’ संहारक क्षमता समजावून सांगतात. लष्करी तळावर असलेली चिओ आणि तनाका ही मुले आपल्या आजी-आजोबांच्या भेटीसाठी आणि युद्ध संपण्यासाठी आतुर असतात, जी सर्वसामान्य जनतेची व्यथा मांडतात. मूकनाट्याद्वारे जपानी नागरिकांची मनस्थिती, युद्धाची भीषणता आणि गौतम बुद्धांचा शांततेचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. एका बाजूला लष्करी अधिकाऱ्यांची ''जिंकण्याची खुमखुमी'' आणि दुसरीकडे ओपेनहायमर व डॉ. निशिना यांसारख्या शास्त्रज्ञांची झालेली घुसमट, असा संघर्ष नाटकात दिसतो. सामुराई परंपरा, कौटुंबिक वाताहात आणि ‘अणू संशोधन मानवाच्या हितासाठी की संहारासाठी?’ हा वैश्विक प्रश्न उपस्थित करण्यात ही संस्था यशस्वी झाली आहे.
* सूत्रधार आणि साहाय
लेखक ः चंद्रकांत चौधरी, दिग्दर्शक ः तेजस अतितकर, प्रकाश योजनाः गणेश लिमकर, नेपथ्यः समीर पाठक, पार्श्वसंगीत ः आशुतोष मेनसे, रंगभूषा ः चंद्रकांत सैदाणे, वेशभूषा ः तेजा पाठक, रंगमंच व्यवस्था ः विराज अडगटला, विशाल कुटे, रुद्र रसाळ, महादेव गाडे, श्लोक गाडे, लक्ष्मीकांत देशमुख,
* पात्र परिचय
उर्जा व नताली ः अवंती गोले, ओपनहायमर ः चैतन्य खानवेलकर, डॉ. निशिना व हकुझो- तेजस अतितकर, मिस काबावे व जेतो ः तन्मयी भावे, मासाको ः तेजा पाठक, तामिकी ः देवदत्त चौसाळकर, चिओ ः पद्मनाथ जांभळे, तनाका ः ओजस्वी पाठक, लष्करी अधिकारी-१ ः सुजित भावे, लष्करी अधिकारी-२ ः राहूल रसाळ, इतर कलावंत ः रेवती घोटणकर, देविका साळुंके, ज्ञानेश्वर झगडे, सृष्टी गंधे, दर्शना दंडवते, स्नेहा विखे, मानवी डेरे, सुभांगी कुटे, प्रतिक्षा रसाळ, श्लोक गाडे, तनया कुटे, शुभ्रा अडगटला, रुद्र रसाळ, राज जोशी, राहुल उजागरे, प्राची जांभळे, राजेंद्र कऱ्हाडकर, त्रिशान तोडमल, गौतम त्र्यंबक, अनंत जोशी.
आजचे नाटक
नाटक ः काय लिहून ठेवलय कुणास ठाऊक, सादरकर्ते ः नाट्य भारती इंदुर. वेळ ः सकाळी ११.३० वाजता. नाटक ः ती , सादरकर्ते ः नाट्यांकूर, जालना. स्थळ ः स्वा. सावरकर नाट्यगृह, मारुती मंदिर. वेळ ः सायंकाळी ७.३० वाजता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

