स्थलांतरामुळे कोकण होतेय भकास
सकाळ विशेष
22937
rat८p१.jpg- नकाशा
२२८८४
- rat८p२.jpg- गाव दिसतंय… पण गावपण जाणवत नाही.
rat८p३.jpg-
२२८८५
आता कार्यक्रमापुरतं का होईना, गाव पुन्हा गजबजतं
- rat८p४.jpg-
२२८८६
गावपणं जपणारी माणसं
rat८p५.jpg-
२२८८७
ओटीवरच्या गप्पा मन निरोगी ठेवणारा घरगुती उपचार दुर्मिळ झाला आहे.
rat८p१३.jpg-
२२९०३
संगमेश्वर येथील बंद घर.
------------
इंट्रो
कोकण म्हणजे निसर्ग, माती, परंपरा आणि माणसांचा घट्ट विणलेला संसार; मात्र गेल्या तीन दशकांत कोकणातील ही विण उसवत चालली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधून रोजगार व शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतरामुळे गावे, वाड्या, खेडी अक्षरशः ओस पडत चालली आहेत. ही केवळ लोकसंख्येतील घट नाही, तर ग्रामीण जीवनपद्धती, लोकसंस्कृती, कृषी व्यवस्था आणि सामाजिक रचना यांवर पडलेला घाव आहे. याचा सर्वाधिक फटका बसलेला तालुका म्हणजे मंडणगड. कोकण आज एका अशा वळणावर उभा आहे, की जर आज ठोस धोरणे राबवली नाहीत तर पुढील दहा वर्षांत गावे नकाशावर असतील; पण वास्तवात नसतील. मंडणगड तालुक्यातील गावे केवळ आठवणीत उरतील. कोकण वाचवायचा असेल तर केवळ रस्ते, पूल आणि इमारती नव्हे, माणूस गावात टिकवणारी धोरणे हवीत कारण, गावाशिवाय कोकण नाही आणि माणसांशिवाय गावही नाही.
- सचिन माळी, मंडणगड
--
स्थलांतरामुळे कोकण होतेय भकास
बंद घरे अन् हरवत चाललेली ग्रामीण संस्कृती; भावनिक तुटणं अपरिहार्य
कोकण म्हणजे हिरवीगार शेती, नारळ आणि सुपारीच्या बागा, आंब्याचा सुगंध आणि माणुसकीने नटलेली गावे. इथे समाज म्हणजे एक कुटुंब. लग्न, सण, उत्सव आणि दुःख-सुख सगळं एकत्र वाटलं जायचं; पण २० वर्षांच्या कालावधीत कोकणाच्या सामाजिक जीवनात मोठा बदल घडला आहे. शिक्षण, नोकरी आणि आधुनिक सुविधांच्या शोधात अनेक तरुण आणि मध्यमवयीन मंडळी मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईकडे स्थायिक झाली आहेत. गावातील सामाजिक बंध आता तुटू लागले आहेत. वृद्धांना आधार, संवाद आणि सहवासाचा अभाव निर्माण झाला आहे. हे मानवी स्थलांतर फक्त भौगोलिक नाही तर भावनिक तुटणं आहे. वृद्धांना शहरात राहिल्यानंतर निर्माण होणारा मानसिक ताणदेखील गंभीर आहे. पोकळीचा आजार, एकाकीपणा आणि नैराश्य ही प्रकरणं वाढताना दिसत आहेत. एकेकाळच्या समृद्ध कोकणचा हा स्थलांतराचा कोंडमारा अधिक गंभीर होत चालला आहे.
-----
आकडे काय सांगतात?
२०११ च्या जनगणनेनुसार, रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १६ लाख होती; मात्र अंतर्गत अंदाजानुसार २०२४ पर्यंत प्रत्यक्ष वास्तव्यास असलेली लोकसंख्या ११ ते १२ लाखांपर्यंत खाली आली आहे. कोकण विभागात (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्हे) एकूण लोकसंख्येच्या ३८ ते ४२ टक्के लोकसंख्या स्थायी किंवा अंशतः स्थलांतरित आहे. २००१ ते २०२१ दरम्यान ग्रामीण लोकसंख्या सरासरी १८ टक्केनी घटली तर शहरांतील कोकणी लोकसंख्या २६ टक्केनी वाढली. रत्नागिरी जिल्ह्यातील ३० टक्के घरे वर्षातून ८ महिने बंद राहतात. शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या मागील दशकात २५ टक्केनी कमी झाली आहे.
---------
महत्त्वाचे मुद्दे
* १८ ते ३५ वयोगटातील सुमारे ४५ ते ५० टक्के युवक स्थलांतरित
* मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, गोव्यासह परदेशात (मुख्यतः मध्य पूर्व) स्थलांतर
* अनेक गावांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक घरे बंद
* मंडणगड तालुक्यात १०९ पैकी ४० गावे अर्धवट ओस
* काही वाड्यांमध्ये ५ ते १० पेक्षा कमी कुटुंबे उरलीत
* प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या ५० टक्क्यांनी घटली
-------
गावं आहेत; पण माणसं नाहीत
मंडणगड, दापोली, संगमेश्वर, लांजा, राजापूर या तालुक्यांत अनेक गावे अशी आहेत जिथे दिवसा दरवाजे बंद आणि रात्री संपूर्ण गाव अंधारात असतो. गावात उरले आहेत ते वृद्ध आई-वडील, काही महिला, मोजके शेतकरी, सण उत्सव, जत्रा, दशावतार, भजन, पालखी, वारी हे सारे आज प्रतिकात्मक उरले आहेत. पूर्वी ज्या जत्रांना हजारोंची गर्दी असायची त्या आज काही शेकड्यांत आटोपतात.
--------
सामाजिक परिणाम : वृद्ध समाज घडतोय का?
गावात आता प्रामुख्याने वृद्ध लोकच राहतात. त्यांचा दिवस घराच्या ओट्यावर बसून जुन्या आठवणी काढण्यात जातो. मुलं नोकरीसाठी बाहेर, नातवंडं शाळा कॉलेजात आणि घरी उरलेले फक्त दोन वृद्ध. दुसरीकडे शहरांचा ताण वाढला आहे. मुंबई-पुणे परिसरात स्थलांतरित लोकसंख्येमुळे वाहतूककोंडी, निवासस्थानांचा तुटवडा, प्रदूषण, आणि सामाजिक तणाव प्रचंड वाढला आहे. मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. जिल्ह्याच्या काही भागात तर ग्रामीण भागातील घरं बंद आणि शहरांतील भाड्याच्या घरांचा दर प्रचंड वाढलेला दिसतो.
------
सामाजिक परिणाम, एकाकी वृद्ध, तुटलेली कुटुंबव्यवस्था
स्थलांतराचा सर्वात वेदनादायक परिणाम म्हणजे एकाकी वृद्धांचे वाढते प्रमाण. मुलं मुली शहरात, आई-वडील गावात एकटे. आरोग्यसेवा लांब व परिपूर्ण नाही, वाहतूक अपुरी, अनेक गावांत वृद्धांना औषध, दवाखाना, दैनंदिन गरजा यासाठी शेजाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. पूर्वीची संयुक्त कुटुंबपद्धती आज इतिहासजमा होत आहे.
----------
कृषिसंपदेवर घातक परिणाम
कोकणची खरी ओळख असलेली भातशेती, नाचणी, वरी, काजू, आंबा, सुपारी ही कृषिसंपदा आज मोठ्या संकटात आहे. अनेक शेतजमिनी पडीक पाणलोट क्षेत्रे दुर्लक्षित, आंबा-काजू बागा सांभाळणारे हात कमी, शेती करायला मजूर नाहीत, शेतीवरील खर्च वाढला, उत्पन्न घटले आणि त्यामुळे शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आज अनेक शेतकरी म्हणतात शेतीपेक्षा मुंबईत चहा विकलेला परवडतो. ही वाक्ये कोकणाच्या वेदनेचे वास्तव चित्र आहे.
---------
रक्कम येते; पण अर्थव्यवस्था वाढत नाही
स्थलांतरित कोकणी लोक मुंबई-पुण्यात नोकऱ्या करतात आणि वर्षातून एकदा गावात येतात. त्यांच्याकडून येणाऱ्या पैशामुळे गावांतील काही बांधकामं, देवळं आणि उत्सव सुरू राहतात; पण स्थानिक अर्थव्यवस्था वाढत नाही. गावात उद्योग नाहीत, रोजगार नाही त्यामुळे आर्थिक प्रवाह तुटलेला आहे.
----------
शिक्षण स्थलांतराचा पहिला टप्पा..
शिक्षणासाठी शहराकडे जाणे आवश्यकच आहे; मात्र त्यानंतर परत गावाकडे येण्याचा प्रवाह जवळपास थांबलेला आहे. गावात पदवीपुढील शिक्षणाची सोय नाही. खासगी नोकऱ्या नाहीत, उद्योग नाहीत. त्यामुळे एकदा शहर गाठलेला युवक पुन्हा गावाकडे परतत नाही. याचा परिणाम शाळा बंद पडत आहेत, शिक्षकसंख्या कमी, ग्रामीण शिक्षणव्यवस्था कमकुवत.
-------
लोकप्रतिनिधींच्या घोषणा अधिक, अंमलबजावणी कमी
स्थानिक लोकप्रतिनिधी स्थलांतराचा मुद्दा मान्य करतात; मात्र तो निवडणुकीपुरता चर्चेचा विषय ठरत असल्याची टीका होत आहे. लोकप्रतिनिधी म्हणतात, पर्यटन विकासातून रोजगार निर्माण करू, कृषी प्रक्रिया उद्योग उभारू, कोकण रेल्वे, महामार्गामुळे विकास होईल; मात्र प्रत्यक्षात स्थानिक युवकांना नोकऱ्यांत प्राधान्य नाही, पर्यटनातून बाहेरचीच गुंतवणूकदार मंडळी लाभार्थी, गावपातळीवर रोजगार निर्मिती नगण्य, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हा स्थलांतरामागील मोठा कारणीभूत घटक मानला जातो.
----------
लोकसंस्कृतीचा ऱ्हास
कोकणाची ओळख असलेली दशावतार, जाखडी नृत्य, भजन कीर्तन परंपरा, गावगाडा या साऱ्याला युवकांचा अभाव भेडसावत आहे. कलावंत तयार होत नाहीत. वारसा चालवणारी पिढीच गावात उरलेली नाही. तज्ज्ञांच्या मते स्थलांतर पूर्णपणे थांबवता येणार नाही; मात्र ते संतुलित करता येऊ शकते.कोकण फक्त निसर्ग नाही ती एक संस्कृती आहे. माती, भाषा, आणि माणुसकीची. स्थलांतर थांबवणं अवघड आहे; पण मुळं विसरणं हा पर्याय नाही. गावं ओसाड झाली; पण अजून उरली आहे एक आशा. कारण, विकासाचा अर्थ फक्त शहरांची उंची नव्हे तर गावांचं अस्तित्व टिकवणं हाच खरा विकास आहे.
---------
शिक्षण आणि डिजिटल क्रांती : नवा संधीचा किरण
गेल्या काही वर्षांत ऑनलाइन शिक्षण, डिजिटायझेशन आणि ‘वर्क फ्रॉम होम’च्या संकल्पनेमुळे गावात राहूनही काम करण्याची शक्यता वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावांमध्ये युवकांनी ऑनलाइन फ्रीलान्सिंग, शेतीप्रक्रिया उद्योग आणि इकोटुरिझम सुरू केले आहेत. हीच नवी दिशा ठरू शकते. गावात डिजिटल नेटवर्क, चांगलं रस्ते जाळं आणि स्थिर वीजपुरवठा मिळाला तर तरुण पुन्हा गावाकडे वळतील. कोकणात ग्रीन इकॉनॉमी विकसित करण्याची क्षमता प्रचंड आहे.
---------
उपाय
* संतुलित विकासाचं मॉडेल हवं
* ग्रामीण भागात लघुउद्योग आणि शेतीप्रक्रिया प्रकल्प सुरू करणे
* डिजिटल सुविधा व इंटरनेट कनेक्टिव्हिटी मजबूत करणे
* इको टुरिझम, होमस्टे आणि पारंपरिक कलेला प्रोत्साहन
* शहरी वृद्धांसाठी आठवड्यातून एक दिवस ग्रामीण निसर्गसंपर्क
* स्थानिक प्रशासनाने गाव पुनरूज्जीवन योजना तयार करावी
-------------------------------------
चौकट
हे करावे लागेल
* ग्रामस्तरावर रोजगार, कृषी प्रक्रिया केंद्रे, काजू-आंबा मूल्यवर्धन उद्योग, महिला बचतगट आधारित उद्योग.
* स्थानिक युवकांसाठी कौशल्य विकास, पर्यटन मार्गदर्शक, होमस्टे व्यवस्थापन, मत्स्यप्रक्रिया प्रशिक्षण
* डिजिटल कोकण, वर्क फ्रॉम होम संधी, इंटरनेट पायाभूत सुविधा
* कृषीला आर्थिक सुरक्षितता, हमीभाव
* थेट बाजारपेठ, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
---------
कोरोनात कोकणकर गावाकडे
२०१९-२० या वर्षात कोरोनाच्या संकटामुळे मुंबईतील अनेक कोकणकरांनी गावाची वाट धरली होती. रोजगारानिमित्त राहिलेल्या मुंबईकरांना काहीकाळ क्वारंटाईन रहावे लागले होते. याच कालावधीत जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या अडीच हजाराने वाढली होती. पुढे कोरोनाची लाट सरल्यानंतर गावाकडे आलेली लोक पुन्हा माघारी गेली. याच कालावधीत भातशेती लागवडीखालील क्षेत्र सुमारे ३ हजार हेक्टरने वाढले होते. तसेच मनरेगा अंतर्गत होणारी लागवडखालील क्षेत्रही वाढले. अनेकांनी पडीक जमिनीत आंबा, काजुसह विविध रोपांची मोठ्याप्रमाणात लागवड केली.
-----
कोट १
आज कोकण बदलत आहे; पण त्याचबरोबर कोकणातील माणूसही बदलत्या काळाशी झुंजतोय. विशेषत: आपल्या वृद्ध व्यक्तींना ही झुंज अधिक जड जाते. आयुष्यभर स्वतःच्या घरात, शेतात, मातीच्या सुगंधात, गावच्या सहज सरळ जगण्यात राहिलेली ही पिढी अचानक मुंबईसारख्या धकाधकीच्या दुनियेत आल्यावर नकळत हरवून जाते. मुंबईत येऊन त्यांचं जगणं सुरक्षित होतं; पण मुक्त राहत नाही. स्थलांतर अनिवार्य असेल तर त्यांच्या शारीरिक सुरक्षिततेसोबत भावनिक स्वातंत्र्य सांभाळणं तितकंच गरजेचं आहे.
- विजय घरटकर, उद्योजक, मुंबई.
-----
कोट २
स्थलांतरामुळे वृद्धापकाळात स्वतःच्या घराचा व परिसराचा ताबा हरवणे, जीवनशैलीत बसू न शकणे, आर्थिक आणि आरोग्याविषयीचा ताण याचा परिणाम होतो. वृद्धांचे स्थलांतर हे फक्त पत्ते बदलण्याचे प्रकरण नाही ते त्यांच्या स्वातंत्र्य, ओळख आणि जगण्याच्या तत्त्वांचा हळूहळू होत जाणारा विलय आहे. शहर जीवन देते; पण ते जगण्याची पद्धत बदलून आणि हीच बदलाची किंमत सर्वाधिक वृद्धांना चुकवावी लागत आहे.
- गणेश पोस्टुरे, मुंबईवासीय कोकणकर.
------
कोट ३
कोकणातून शिक्षण व रोजगारासाठी होणारे स्थलांतर हे केवळ भौगोलिक नसून भावनिक स्थलांतरही आहे. गावात आयुष्य घालवलेल्या वृद्धांना अचानक शहरातील वेगवान जीवनशैली व एकाकीपणा पेलवतोच असे नाही. ओळखीची माती, माणसे, सवयी तुटल्यामुळे त्यांची अस्वस्थता, नैराश्य, झोपेचे विकार व शारीरिक तक्रारी वाढतात. वृद्धांसाठी ‘सोबत नेणे’ महत्त्वाचे असते, पण ‘समजून घेणे’ त्याहून अधिक गरजेचे असते.
- डॉ. अतुल ढगे, मानसोपचार तज्ञ
------
चौकट
मनाची ओढ मात्र गावाकडेच
शहरांमध्ये प्रदूषण, गर्दी, वाढता खर्च, गोंगाट आणि सततची धावपळ या समस्या असूनही चांगले जीवनमान, विविध मनोरंजनाची साधने आणि सामाजिक संधी यामुळे लोक शहरांकडे आकर्षित होतात. मात्र हे शहरी जीवन सर्वांनाच मानवणारे नसते. विशेषतः ग्रामीण भागात आयुष्यभर राबून संसार उभा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात राहणे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अत्यंत कठीण ठरते. गावातील मोकळे वातावरण, शांतता, निसर्गाचा सहवास, कमी गर्दी आणि आपल्या मातीशी असलेले भावनिक नाते हे सर्व सोडून महानगरात जुळवून घेणे अनेकांना अशक्य होते. आज अनेक कुटुंबे परिस्थितीपोटी शहरात स्थायिक झाली आहेत. विशेषतः उपचारासाठी आई वडिलांना मुंबईसारख्या शहरात आणले जाते, तेव्हा दोन चार दिवस काढणेही त्यांच्यासाठी जीवघेणे ठरते. आजार कितीही गंभीर असला तरी त्यांच्या मनाची ओढ मात्र गावाकडेच असते. अनेक वेळा असे दिसून आले आहे की काही रुग्ण उपचार अपुरे ठेवून गावी परत जातात आणि गावी गेल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारलेली दिसते. शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून सुट्टी मिळताच आम्हाला थेट गावी सोडून द्या, अशी विनंती करणारे अनेक रुग्ण मी प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. डायबेटिस, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांसाठी नियमित औषधे सुरू असतानाही अनेकजण गावी गेल्यानंतर ती औषधे बंद करतात, तरीसुद्धा ते अधिक प्रसन्न, स्थिर आणि बरे वाटतात. यामागे कदाचित गावाचे शुद्ध वातावरण, मोकळा श्वास, निसर्गाशी असलेली जवळीक, ओट्यावर बसून होणाऱ्या मनमोकळ्या गप्पा आणि सामाजिक आपुलकी हे घटक कारणीभूत असावेत. वृद्धांसाठी सन्मानजनक जीवन निर्माण करणे ही आज काळाची गरज बनली आहे, असे जेजे रुग्णालय क्षयकिरण तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) व मायभूमी फाउंडेशनचे संस्थापक अनंत काप यांनी सांगितले.
---------
तालुक्यातील स्थितीवर एक दृष्टिक्षेप...
* गुहागर तालुक्यात समुद्र जवळ असूनही रोजगार संधी मर्यादित आहेत. मासेमारी किंवा शेती यावर अवलंबून असलेले जीवन आता तरुणांना अपुरे वाटते. मुंबई, पुण्यासारख्या शहरांत नोकरीवरच त्यांचा भर आहे.
* मंडणगड तालुक्यात स्थलांतराचे चित्र अधिक तीव्रपणे दिसते. डोंगराळ भाग, मर्यादित दळणवळण आणि रोजगाराच्या संधींचा अभाव यामुळे स्थलांतर हे अपरिहार्य झाले आहे. अनेक वाड्यांमध्ये पाच दहा घरे असतात; त्यातील एखाद दुसऱ्या घरातूनच धूर निघतो. उरलेल्या घरांच्या दारांवर लटकणारी कुलपे गावाच्या रिकामेपणाची साक्ष देतात.
* दापोली तालुक्यात शिक्षणसंस्था असल्यामुळे काही प्रमाणात वर्दळ आहे, पण तीही तात्पुरती आहे. विद्यार्थी शिक्षणासाठी येतात आणि शिक्षण पूर्ण होताच शहरांकडे वळतात. गावातील शेती सांभाळायला हात कमी पडतात. आंबा, काजूची बाग आजही उभी आहे, पण ती पाहणारे डोळे आणि जपणारे हात कमी झाले आहेत. परिणामी ग्रामसभा असो वा सार्वजनिक काम यातील सहभाग घटलेला आहे. सुट्ट्यांमध्ये गावात परतणारी पिढी, शेतीकडे नव्या दृष्टीने पाहणारे काही तरुण आणि पर्यटन व स्थानिक व्यवसायाच्या संधी. यामुळे दापोलीतील गावे पुन्हा श्वास घेऊ लागलेली आहेत. पण त्यासाठी रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि दळणवळण या मूलभूत गोष्टी गावातच सक्षम करणे गरजेचे आहे.
* संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुतेक मंडळी मुंबई इमारतींना अथवा घरांना रंग काढण्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. आधी घरातील एखादी व्यक्ती जाऊन काम मिळवते आणि नंतर थोडंसं बस्तान बसल्यावर आपल्या घरातील पत्नीसह मुलांना देखील मुंबईला घेऊन जाते. त्यामुळे हळूहळू गावाकडचं घर कुलूप बंद होत आहेत. संगमेश्वर येथील व्यापारी मंडळींनी माभळे येथे लघु औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव ठेवला आहे. एका छोट्या कुटुंबातील चार माणसं मुंबईत मुंबईत जाऊन महिन्याला किमान साठ हजार रुपये एवढी कमाई करत असल्याचे चित्र आहे.
* सुमारे पावणेदोन लाख लोकसंख्या असलेला राजापूर तालुका २३७ महसूली गावांमध्ये विस्तारलेला आहे. तालुक्यात १०१ ग्रामपंचायती आणि एक नगरपालिका कार्यरत आहे. शिक्षणासोबत मोठ्याप्रमाणात नोकरीनिमित्ताने स्थलांतर होत असून त्यामध्ये युवावर्गाचा अधिक समावेश आहे. शिमगोत्सव, गणेशोत्सव आणि मे महिन्यातील सुट्टीत बंद घरे उघडली जातात. गेल्या दहा-पंधरा वर्षामध्ये शासनाकडून उद्योगांच्या उभारणीच्या झालेल्या प्रयत्नांना विविध कारणांनी स्थानिकांकडून विरोध झाला. याठिकाणी रोजगार निर्मितीसाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

