कणकवली टेंबवाडीत तीन म्हशी दगावल्या
कणकवली टेंबवाडीत
तीन म्हशी दगावल्या
कणकवली, ता. ८ : शहरातील टेंबवाडी येथील भागात आज तीन म्हशींचा मृत्यू झाला. यातील एक म्हैस गाभण होती. विषबाधेमुळे या म्हशींचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, याच परिसरात गेल्या महिन्यात १९ जानेवारीला दोन म्हशी, एक गाय, एक रेडा आणि एक वासरू अशी पाच जनावरे दगावली होती.
शहरातील टेंबवाडी येथील कामत हायलाईटच्या बाजूला असलेल्या अंधारी मिल शेजारील शेतात कामगार काम करण्यासाठी गेले असता त्यांना तीन म्हशी दगावलेल्या आढळल्या. त्यांनी याबाबतची माहिती अंधारी मिलचे मालक श्री. अंधारी यांना दिली. अंधारी यांनी याबाबत नगरपंचायत प्रशासनाला कळविले.
प्राथमिक अंदाजानुसार अन्नातून विषबाधा झाल्याने तीन म्हशींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. महिन्यापूर्वी याच ठिकाणपासून सुमारे दोनशे मीटरवरील महामार्गालगतच्या शेतजमिनीमध्ये पाच जनावरे दगावली होती. ही जनावरे देखील दूषित अन्न खाल्याने दगावल्याचा अंदाज पशू विभागाने व्यक्त केला होता. त्यानंतर आज पुन्हा टेंबवाडी भागात तीन म्हशी मृतावस्थेत आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

