अपक्षांनी झुंजवले, पण महायुतीचाच तालुक्यात डंका

अपक्षांनी झुंजवले, पण महायुतीचाच तालुक्यात डंका

Published on

-rat९p११.jpg-
P२६O२३१५०
रत्नागिरी ः गोळप गटामध्ये कल लक्षात आल्यानंतर अपक्ष उमेदवार उदय बने केंद्रातून निघून गेले.
------
अपक्षांनी झुंजवले; पण महायुतीचाच जल्लोष
हातखंबा, गोळप गटामुळे चुरस; महाविकास आघाडीचा पराभव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निकालाच्या सुरुवातीच्या फेऱ्या शिवसेना, भाजप महायुतीला घाम फोडणाऱ्या होत्या. एकीकडे महायुतीने बहुतेक गट आणि गणामध्ये आघाडी घेत विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू ठेवली होती; परंतु दुसऱ्या बाजूला सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या हातखंबा आणि गोळप गटामध्ये अपक्षांनी सुरुवातीपासून घेतलेली आघाडी सर्वांचे समीकरण बदलून टाकणारी होती. अतिशय रंगतदार झालेल्या आणि अखेरच्या टप्प्यापर्यंत या दोन गटात अपक्षांनी चांगलेच झुंजवले; परंतु दोन्ही गटांमध्ये शिवसेनेच्या शिलेदारांनी बाजी मारत विजय मिळवला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनामध्ये आज सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पोस्टल मतासह एकूण २२ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी झाली. साडेदहा वाजता पहिली फेरी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी आकडेवारी जाहीर केली, तेव्हा १० गटापैकी ८ गटांमध्ये शिवसेना आघाडीवर होती तर २० गणापैकी एक बिनविरोध झाल्यामुळे दोन भाजप आणि उर्वरित सतरा जागांपैकी काही जागांवर शिवसेनेचे उमेदवार पिछाडीवर होते. मंत्री उदय सामतं याचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील गोळप गणातून पहिल्या काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते. त्यानंतर याच गटातील शिवसेनेचे उमेदवार नंदकुमार मुरकर यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवार उदय बने यांनी आघाडी घेतली होती. तसेच हातखंबा गटातून अपक्ष उमेदवार परशुराम कदम यांनीही आघाडी घेतल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांना घाम फुटला होता. अगदी आठ ते दहा फेऱ्यांपर्यंत आघाडी तुटत नव्हती.
हातखंबा गटामध्ये अपक्ष परशुराम कदम आणि शिवसेनेचे उमेदवार सुयोग कांबळे यांच्यात मुख्य लढत असताना शिवसेनच्या याच गणातील विद्या बोबले यांना चांगले मतदान झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे नेते आणि पदाधिकाऱ्यांची धाकधूक वाढली होती. पाली गावातील मतमोजणी सुरू झाल्यावर परशुराम कदम यांचे मताधिक्य घटले. अखेर हातखंबा गटामध्ये २८९ मतांनी सुयोग कांबळे विजयी झाले. गोळप गटामध्ये नंदकुमार मुरकर यांनी देखील चांगले मताधिक्य घेत अपक्ष उदय बने यांचा पराभव केला. गोळप गणातून नेताजी पाटील विजयी झाले. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अंदाज आला की, सर्व १० गटांमध्ये शिवसेनेने तर २० गणांपैकी २ भाजप व उर्वरित १८ गटामध्ये शिवसेनेने बाजी मारत महाविकास आघाडीचा सुपडा साफ करून टाकला. या मोठ्या विजयानंतर समाजिक न्यायभवनासमोर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलालांची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली. ढोलताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. मंत्री उदय सामंत आल्यानंतर पुन्हा एकदा जल्लोष करत त्यांना खांद्यावर घेऊन विजयाचा आनंद साजरा केला.
----------
चौकट...
पालीत मताधिक्य घटले
हातखंबा गटामध्ये अगदी १ ते १३ फेऱ्यांपर्यंत परशुराम कदम हे आघाडीवर होते. अपक्ष परशुराम कदम आणि त्यांचे खंदे समर्थक मुन्ना देसाई यांना देखील विजयाची खात्री असल्याने त्या आवेशात ते मतदान केंद्रावर फिरत होते. अगदी कापडगावापर्यंत त्यांना मताधिक्य मिळत होते; परंतु पाली गावातील मतपेट्या फुटू लागल्यानंतर कदम यांचे मताधिक्य घटू लागले आणि शिवसेना उमेदवार सुयोग कांबळे यांनी पुढील काही फेऱ्यांमध्ये आघाडी घेतली आणि विजयी पताकाच फडकवली. त्यामुळे कदम यांची घोरनिराशा झाली आणि निराश मुद्रेने ते मतदान केंद्राबाहेर पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com