रेल्वेला म्हैस धडकल्याने वाहतूक विस्कळीत
23257
रेल्वेला म्हैस धडकल्याने वाहतूक विस्कळीत
‘वंदे भारत’ला अपघात; प्रवाशांचे हाल; मांडवी, दुरांतो, मंगलोर गाड्यांना विलंबाने
कणकवली, ता. ९ : कोकण रेल्वे मार्गावर मुंबई- मडगावदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला कणकवली ते ओरोस दरम्यान मोठा बिघाड झाला. दुपारी बाराच्या सुमारास ओरोस स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे रुळावर आलेल्या एका म्हशीला वंदे भारत एक्स्प्रेसची धडक बसली. या अपघातामुळे एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडले आणि कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली. या घटनेनंतर सुमारे अडीच तास रेल्वे मार्गावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
दुपारी अडीचच्या सुमारास दुसरे इंजिन घटनास्थळी आणण्यात आले. तांत्रिक बिघाड दूर करून सायंकाळी तीन वाजल्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेसला पुढे मार्गस्थ करण्यात आले. मात्र तोपर्यंत कोकण रेल्वे मार्गावरील अनेक प्रवासी गाड्या ठिकठिकाणी खोळंबून राहिल्या. या बिघाडाचा सर्वाधिक फटका मांडवी एक्स्प्रेसमधून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसला. सकाळी साडे अकरा वाजता कणकवली स्थानकात पोहोचणे अपेक्षित असलेली मांडवी एक्स्प्रेस तब्बल चार तास उशिराने दुपारी साडे तीन वाजता कणकवली स्थानकात आली. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना कणकवली स्थानकात ताटकळत राहावे लागले. प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. याशिवाय सीएसटी–मंगळूर एक्स्प्रेस ही गाडी सुमारे तीन तास उशिराने धावत होती. मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस सुमारे तीन तास, दुरांतो एक्स्प्रेस पाच तास, तर मरूसागर एक्स्प्रेस सुमारे तीन तास विलंबाने धावत होती. इतरही अनेक प्रवासी गाड्या एक ते दोन तास विलंबाने धावल्याने कोकण रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले होते. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून बिघाड दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात आले. सायंकाळनंतर हळूहळू सर्व गाड्या मार्गस्थ करण्यात आल्याने वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली. मात्र या घटनेमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
------------
शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांबाबत विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. गुरेढोरे, म्हशी, गायी यांना शक्यतो मोकळे सोडू नये. रेल्वे रुळालगत चराईसाठी जनावरे नेणे टाळावे. जनावरांसाठी कुंपण, दोरखंड किंवा बंदिस्त गोठ्याची व्यवस्था करावी. रेल्वे मार्गालगतच्या शेतांमध्ये काम करताना जनावरांवर सतत लक्ष ठेवावे. ग्रामपातळीवर जनजागृती करून रेल्वे रुळाजवळ जनावरे येणार नाहीत, याची सामूहिक जबाबदारी घ्यावी. रेल्वे प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे व काही अडचण आढळल्यास तत्काळ स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. रेल्वे रुळावर जनावरे येण्याच्या घटनांमुळे केवळ जनावरांचेच नव्हे तर प्रवाशांचेही जीव धोक्यात येतात. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ आणि रेल्वे प्रशासन यांनी समन्वय साधून अशा अपघातांना आळा घालणे आवश्यक असल्याचे मत या घटनेनंतर अनेकांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

