लेखकाच्या भावना उलगडणारे ''काय लिहून ठेवलय कुणास ठाऊक''
- rat१०p१.jpg-
26O23572
रत्नागिरी ः नाट्यभारती-इंदूर या संस्थेने सादर केलेल्या ‘काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
राज्य नाट्यस्पर्धा----------लोगो
जिवंत पात्रांची आर्त हाक ः ‘काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक’
नाट्यभारती-इंदूरचा प्रयत्न; केवळ स्वतःपुरते जगू नका हा सकारात्मक संदेश
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः एका ज्येष्ठ लेखकाच्या मते, त्याने आयुष्यभर लिहिलेल्या कथा हे त्याचे केवळ ‘स्वांतः सुखाय’ (स्वतःच्या आनंदासाठी केलेले) लेखन आहे; मात्र, हेच लेखन आणि लेखकाच्या आयुष्यातील घडामोडी यावर आधारित ‘काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक’ हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सादर झाले. ‘नाट्यभारती, इंदूर’ या संस्थेने येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा प्रयोग सादर केला. मूळ कथाकारांच्या सात वेगवेगळ्या कथांची सुंदर गुंफण या नाटकात पाहायला मिळाली. या कथांचे नाट्यरूपांतर आणि दिग्दर्शन श्रीराम जोग यांनी केले आहे. ‘केवळ स्वतःपुरते जगू नका,’ असा सकारात्मक संदेश या नाटकातून देण्यात आला. लेखकाच्या लेखणीतून उतरलेल्या कथांमधील विविध रूपे कलाकारांनी आपल्या अभिनयातून प्रभावीपणे साकारली. या दर्जेदार अभिनयाला उपस्थित रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
-------
‘काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक’ नाटकाचा पडदा उघडताच ज्येष्ठ लेखक ‘बाबा लेखनकर’ आपल्या लेखनात मग्न असल्याचे दिसतात. त्यांच्यासोबत त्यांचा अत्यंत आवडता सोबती म्हणजेच ‘एकांत’ आहे. बाबा एकांताशी संवाद साधताना म्हणतात, ‘एकांता, तू मला का आवडतोस हे तुला ठाऊक आहे का?’ या संवादातून लेखकाचे अंतर्मुख व्यक्तिमत्त्व उलगडत जाते. लेखकाची पत्नी हयात नाही तरीही तिच्या निधनानंतर ती आभासी रूपात त्यांना अधूनमधून भेटत असते; त्यांच्यात मर्मभेदी संवादही झडतात.
एके दिवशी एक पुस्तक प्रकाशक लेखकांना भेटायला येतो. लेखकाचा मुलगा या प्रकाशकाचा मित्र असतो आणि त्याच्याकडूनच प्रकाशकाने लेखकाच्या कथेचे एक पान वाचलेले असते. या कथांचा आगळावेगळा धाटणीचा बाज पाहून प्रकाशक कथासंग्रह प्रसिद्ध करण्याची विनंती करतो; मात्र, लेखक ही विनंती फेटाळून लावतात. ‘या कथा मी केवळ लिहिलेल्या नाहीत तर त्या मी जगलो आहे आणि आजही जगतो आहे; त्या मला प्रकाशित करायच्या नाहीत,’ अशी त्यांची भूमिका असते. लेखकाचा मुलगाही फोनवरून विनवणी करतो; पण लेखक आपल्या निर्णयावर ठाम राहतात.
लेखक आणि त्यांच्या पत्नीच्या आभासी रूपातील संवादादरम्यान अचानक लेखकाच्या कथांमधील पात्रे त्यांच्याभोवती गोळा होतात. ‘आम्ही या कथांच्या पानांमध्ये गुदमरलो आहोत, आम्हाला बंदिस्त का केले आहे? आम्हाला वाचकांपर्यंत पोहोचवून जिवंत करा!’ अशी मागणी ही पात्रे करू लागतात.
येथून फ्लॅशबॅकच्या माध्यमातून लेखकाच्या अनवाणी, वधू, शहाणपणाची टोपी, ढग आणि वाळू, पोटभर बोलणारा माणूस, अवध्य आणि एक असामान्य कथा अशा सात कथांमधील पात्रे रंगमंचावर जिवंत होतात. यात ‘लहरी’ नावाचा प्रकाशक आणि ‘चिरंतन’ नावाचा लेखक यांच्यातील उपकथानकही येते, जिथे चिरंतनच्या कथांचे स्वप्न अधुरे राहते. पात्रांच्या आग्रहाखातर आणि त्यांच्या जगण्याच्या हक्कासाठी लेखक शेवटी कादंबरी पूर्ण करण्याचे ठरवतात. प्रकाशकाला कळवले जाते की, ‘कादंबरी पूर्ण झाली आहे, सर्व पात्रे जिवंत केली आहेत. आता आपण ती प्रकाशित करू.’ सर्व पात्रे आनंदाने लेखकाचे आभार मानतात; मात्र, कादंबरीचे शेवटचे पान लिहीत असतानाच नियती डाव साधते आणि लेखकाचा मृत्यू होतो.
दुर्दैवाने, त्या शेवटच्या पानाचा अर्थ कोणालाच समजत नाही. लेखकाची ती अखेरची इच्छा असावी, असा चुकीचा समज करून घेऊन त्यांचे सर्व हस्तलिखित प्रकाशित करण्याऐवजी त्यांच्या अंत्येष्टीच्यावेळी अग्नीच्या स्वाधीन केले जाते. अशा प्रकारे एक महान साहित्यकृती जगासमोर येण्याआधीच नष्ट होते. नेपथ्य, प्रकाशयोजना आणि साजेसे संगीत यांच्या माध्यमातून एका कल्पनारम्य कथानकाला वास्तववादी स्पर्श देण्याचा यशस्वी प्रयत्न ‘नाट्यभारती, इंदूर’ या संस्थेने केला. ‘केवळ स्वतःपुरते जगू नका’ हा लेखक व दिग्दर्शकांचा संदेश प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारा ठरला.
----
* सूत्रधार आणि साह्य
नाट्यरूपांतर -दिग्दर्शक ः श्रीराम जोग, मूळ कथाकार ः श्रीकांत बोजेवार, नितीन थोरात, मधुकर धर्मापुरीकर, विलास पाटील, विद्यासागर महाजन, विनोद गोरवाडकर, मीनाक्षी अंबेकर, वामन काळे, नेपथ्य ः अनिरुद्ध किरकिरे, नेपथ्य सहाय्यक ः असीम कानडकर, अमेय वझे, संध्या जोग, ऋत्विक तेलंग, राहुल कविश्वर, विवेक कुलकर्णी, दिनेश प्रजापत. प्रकाशव्यवस्था ः अभिजित कळमकर, रंगभूषा ः अंकूर लोकरे, वेशभूषा ः श्रुतिका जोग-कळमकर, संगीत संयोजन ः शशिकांत किरकिरे.
---
आजचे नाटक
नाटक ः मी कुमार. सादरकर्ते ः निष्पाप कलानिकेतन सेवा संस्था, इचलकरंजी, वेळ ः सकाळी ११.३० वा. नाटक ः कूचकूच. सादरकर्ते ः परिवर्तन बहु संस्था नाशिक. स्थळ ः स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी. वेळ ः सायंकाळी ७.३० वाजता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

