चिपळूण ःराष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात युतीची मुसंडी
चौकट
एक नजर...
पूजा निकम यांचे मताधिक्य तालुक्यात सर्वाधिक
राष्ट्रवादीचे सभापतिपदाचे दावेदार निवडणुकीत पराभूत
खेर्डी जिल्हा परिषद गटात भाजपची जोरदार मुसंडी
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात युतीची मुसंडी
खेर्डी, वहाळमधील वर्चस्वाला धक्का; धनश्री शिंदे, दिशा दाभोळकर, ठसाळेंचा पराभव धक्कादायक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्यात शिवसेना-भाजप युतीने मुसंडी मारली. परिणामी, खेर्डी आणि वहाळ गटात राष्ट्रवादीचे सभापतिपदाचे दावेदार असलेले उमेदवार गारद झाले. या दोन्ही गटांत झालेला पराभव राष्ट्रवादीसाठी धक्कादायक ठरला आहे. सावर्डे गटातून आमदार शेखर निकम यांच्या पत्नी व माजी सभापती पूजा निकम यांनी शिंदे सेनेच्या माजी सभापती धनश्री शिंदे यांचा तब्बल ५ हजार ६१९ विक्रमी मताधिक्याने पराभव केला. निकम यांचे हे मताधिक्य तालुक्यात सर्वाधिक राहिले आहे.
चिपळुणात राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीलाच स्वबळाचा नारा देत एकहाती किल्ला लढवला; मात्र त्यांना मोठा पल्ला गाठता आला नाही. पालिका निवडणुकीत अपयश आल्यानंतर आमदार शेखर निकम व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक जोमाने लढण्याची तयारी केली होती. आमदार निकम यांनीही प्रत्येक गण आणि गटात बारकाईने लक्ष देत मतांची गोळाबेरीज करण्यावर भर दिला होता. कार्यकर्त्यांना उणीव भासणार नाही, याची खबरदारी घेतली होती. खेर्डी जिल्हा परिषद गटावर नेहमीच राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे; मात्र या वेळी या गटात भाजपने जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादीला पराभवाची धूळ चारली. जिल्हा परिषद गटातून भाजप रावी मोरे विजयी झाल्या, तर जिल्हा बॅंकेच्या संचालिका आणि दुसऱ्यांदा या निवडणुकीस सामोरे जाणाऱ्या दिशा दाभोळकर यांना पराभव स्वीकारावा लागला. तसेच खेर्डी पंचायत समिती गणात तिरंगी लढत झाली. राष्ट्रवादीकडून तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, भाजपकडून तालुकाध्यक्ष विनोद भुरण, तर ‘उबाठा’कडून युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते रिंगणात होते. एक गाव आणि एकच गण असलेल्या या गणातून भाजपने राष्ट्रवादीला धक्का देत बाजी मारली. तालुकाध्यक्ष विनोद भुरण विजयी झाले. खेर्डीत दथरथ दाभोळकर आणि जयंद्रथ खताते यांची एकी झाली, तरीही त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
वहाळ जिल्हा परिषद गटातही राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. या गणातून राष्ट्रवादीचे माजी सभापती सुरेश खापले यांना नवख्या संजय जावळे या उमेदवाराने पराभूत केले. पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता आली असती, तर सुरेश खापले आणि नितीन ठसाळे हे सभापतिपदाचे दावेदार मानले जात होते; मात्र हे दोन्ही उमेदवार पराभूत झाल्याने आमदार निकमांना हा पराभव जिव्हारी लागला आहे. वहाळ गटात शिवसेनेचे संदीप सावंत हे किमयागार ठरले. या गटातून त्यांची पत्नी शिवानी सावंत जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या आहेत.
चौकट
शिगवण, खापरे सलग दुसऱ्यांदा जिंकले
निवळी गणातून ‘उबाठा’च्या संजीवनी खापरे यांनी दुसऱ्यांदा पंचायत समितीवर बाजी मारली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शरद शिगवण व ‘उबाठा’च्या खापरे हे दोनच उमेदवार सलग दुसऱ्यांदा पंचायत समितीवर निवडून गेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

