‘भडगाव’च्या मुलांना ज्ञानज्योत शिष्यवृत्ती
‘भडगाव’च्या मुलांना
ज्ञानज्योत शिष्यवृत्ती
कुडाळ ः ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी या सेवाभावी संस्थेमार्फत सह्याद्री माध्यमिक विद्यालय, भडगाव बुद्रुक येथील पाच गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या शिष्यवृत्ती अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यास रुपये ३६०० इतकी आर्थिक मदत देण्यात आली. शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थ्यांमध्ये धीरज खरात, अनुष्का लोट, श्रद्धा गावठे, पूर्वा सावंत आणि गुंजन पावसकर यांचा समावेश आहे. मुख्याध्यापक सचिन धुरी यांनी ग्लोबल फाउंडेशनचे आभार मानताना सांगितले, अशा सामाजिक बांधिलकी जपणार्या संस्थांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी उमेद मिळते. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात खंड पडू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. पालक व शिक्षकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.
.........................
शांतता भंगप्रकरणी
१५ जणांवर गुन्हा
कुडाळ ः वेतोबा मंदिर परिसरात सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून शांतता भंग केल्याप्रकरणी १५ जणांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना रविवारी (ता. ८) रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी ५० ते ६० नागरिकांची गर्दी जमली होती. आरोपींनी आरडाओरड करत एकमेकांना मारहाण केली होती. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले व वाहतुकीवरही परिणाम झाला. या प्रकरणात १० ते १५ जणांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गोंधळात एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..........................
अणाव स्वयंभू मंदिरात
महाशिवरात्रोत्सव सुरू
कुडाळ ः अणाव येथील श्री स्वयंभू रामेश्वर मंदिरात आजपासून महाशिवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. यानिमित्त उद्या (ता. ११) सायंकाळी ७ वाजता स्थानिक भजने, १२ ला रात्री ९ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळाचे नाटक, १३ ला सायंकाळी ६ वाजता हरिपाठ, एकादशीनिमित्त सायंकाळी ७ वाजता पुराण वाचन, रात्री ८ वाजता पालखी सोहळा, ८.३० वाजता ऋचा पिळणकर (माणगाव) यांचे कीर्तन, १४ रोजी रात्री ८ वाजता पालखी सोहळा, ९ वाजता संदेश सामंत (झाराप) यांचा कार्यक्रम, १५ ला पहाटे ४.३० वाजता रुद्राभिषेक, सकाळी ६ वाजता महाआरती, तीर्थप्रसाद, वैयक्तिक अभिषेक, दुपारी ३ वाजता पुराण वाचन, सायंकाळी ४ वाजता गोविंद आसोलकर यांचे कीर्तन, रात्री १२ वाजता ''श्रीं''ची सवाद्य व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक, १.३० वाजता ओंकार दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन श्री स्वयंभू रामेश्वर देवस्थान सल्लागार उपसमिती भावगीत-भक्तीगीत (अणाव-हुमरमळा), मानकरी व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
........................
मूकबधीर मुलगा
रेल्वेमधून ताब्यात
कणकवली ः गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्या रेल्वेमधून एका मुलाला रेल्वे पोलिसांनी येथील स्थानकात ताब्यात घेतले. हा मुलगा मूकबधीर असल्याने त्याची माहिती समजू शकली नाही. त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले. ही घटना सोमवारी (ता. ९) सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडली. एर्नाकुलम-एलटीटी या दुरांतो एक्स्प्रेसमधून दहा ते बारा वर्षांचा मुलगा फिरत असल्याचे गाडीतील लोकोपायलटच्या निदर्शनास आले होते. या मुलाला बोलता व ऐकायला येत नव्हते. त्याला काही विचारले असता तो खुणा करून सांगत होता. ही गाडी कणकवली स्थानकात ''क्रॉसिंग''साठी थांबली असता मुलाला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मुलगा मूकबधीर असल्याने रेल्वे पोलिसांनी केलेल्या चौकशीतही काही निष्पन्न न झाल्याने त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले.
..........................
नेरुर भगतवाडी
पुलाला भगदाड
कुडाळ ः पिंगुळी-मुस्लिमवाडी-भगतवाडी-गोवेरी मार्गावरील नेरुर-गोवेरी भगतवाडी प्राथमिक शाळेसमोरील पुलाला भगदाड पडले असून वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. संबंधित विभागाने त्या ठिकाणी वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी कोणताही फलक लावलेला नाही. भगदाड पडलेल्या ठिकाणी असलेला धोका ओळखून वाहनधारकांना अंदाज येण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी तात्पुरते चिरे, दगड व लाकडी ओंडके ठेवले आहेत. हे भगदाड तत्काळ बुजवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

