सदर
परिवर्तन---------लोगो
(५ फेब्रुवारी टुडे ३)
देवाजवळ जाण्यासाठी
गावकऱ्यांना ‘श्री’ची गरज
आरत्या म्हणताना त्या ऐकून ऐकून श्री पाठ करत होता. काही आरत्या पूर्ण पाठ झाल्या. कठीण चाली असलेल्या मोठ्या आरत्या, उत्सवाचे फक्त तीन दिवस ऐकून पाठ होणे कठीण होते. नेहमी नवरात्रात, गणपतीत ऐकायला मिळणाऱ्या आरत्या पाठ झाल्या. त्याला सर्व आरत्या पाठ करण्याची इच्छा होती. बाबांना घरी आरत्या म्हणायची आवड नव्हती. बाबांच्या बऱ्याच आरत्या मुखोद्गत होत्या; पण त्यांना त्या श्रीला शिकवण्याची इच्छा नव्हती. थोडक्यात श्रीची आरत्या पाठ करण्याची इच्छा अपुरी रहिली. तो पुढे शिक्षणासाठी मुंबईला गेला. उत्सवाला जाणे कायमचे बंद झाले. अर्थात, त्यामुळे आरत्या पाठ करणेही! आपण आरत्या पाठ करू शकलो नाही, या गोष्टीची त्याला कायमची खंत वाटत राहिली.
-rat११p१८.jpg-
26O23828
--डॉ. शरद प्रभुदेसाई, रत्नागिरी
-------
गावदेवळात होणारा होळीचा उत्सव श्रीला आवडायचा. या उत्सवाप्रमाणे गावातील शंकराच्या देवळात होणाऱ्या शिवरात्री उत्सवाचीही श्रीला अपूर्वाई होती. हे देऊळ ब्राह्मणांचे. त्याचा पुजारी गुरव आणि उत्सवाची जबाबदारी ब्राह्मणांवर असे. हा उत्सव तीन दिवस साजरा होई. शिवरात्र, त्या आधी आणि मगचा दिवस असे ते तीन दिवस. बाबा या उत्सवात हिरिरीने भाग घेत. श्रीलाही भाग घ्यायला आवडेच. बाबांबरोबर हा उत्सवाचे काम करायला जाई अगदी वयाच्या सहाव्या वर्षापासून. आपला मुलगा देवाच्या कामात भाग घेतो म्हणून बाबाही खूश असत की, मोठेपणी हा उत्साही कार्यकर्ता होणार. उत्सवात श्री आरत्या आणि भोवत्या यात उत्साहाने भाग घेत असे. कीर्तन ऐकायला तो उत्साहाने बसे; पण झोप अनावर होई आणि हा झोपून जाई. कीर्तन संपले की, बाबा त्याला उठवून घरी नेत.
उत्सवाच्या शेवटच्या दिवशी समाराधना. हे जेवण म्हणजे देवाचा प्रसाद असे समजले जाई. त्यामुळे गावातील सर्व ब्राह्मणमंडळी या जेवणास हजेरी लावत. अर्थात, श्रीही हजर असेच. त्या दिवशी वातावरण भक्तिमय असे. या उत्सवामुळे त्याचा देवावरील विश्वास अधिक दृढ झाला. अशाच प्रकारचे उत्सव आजूबाजूच्या गावात असत. त्या उत्सवांना बाबांबरोबर श्री जात असे. श्रीच्या गावाच्या नदीपलीकडील गावातील विठोबाच्या देवळातील उत्सवाला बाबा याला घेऊन जात. हा उत्सव कार्तिकी एकादशीला असे. नदीला पाणी असल्याने श्रीला घेऊन जाणे कठीण होई. मग कोणीतरी गावातील माणूस त्याला खांद्यावर घेऊन नदीपलीकडे जाई. घरी लवकर झोपणारा श्री उत्सवात जागा राही. श्री चौथीत असतानाची गोष्ट. शाळेत सरस्वती उत्सव होता त्या निमित्त शाळेत सरस्वती पूजन तसेच विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होते. त्या वेळी विद्यार्थी एखादे नाटकही बसवत. या कार्यक्रमासाठी स्टेजची तयारी, पडदे बांधणे, शाळेचे आवार साफ करणे इत्यादी कामे करायची असत. बहुधा ही कामे विद्यार्थी करत. जवळच्या वाडीतील लोक त्यांना मदत करत. वाडीतील वाडकरी त्यासाठी शाळेत येत. या कामासाठीच एक वाडकरी दुपारी पहार खांद्यावर घेऊन शाळेकडे येत होता. येताना वाटेत त्याला भलामोठा साप आडवा जाताना दिसला. त्या सापाला मारण्यासाठी त्याने खांद्यावरची पहार सापावर टाकली आणि सापाला यमसदनाला पाठवला. त्यानंतर तो शाळेत येऊन कामाला लागला. नंतर काही वेळातच इतर काहीजणांना काम करताना शाळेच्या छपरातून जाणारा साप दिसला. तोही साप गावकऱ्यांनी मारून टाकला. शाळेत कार्यक्रमाची तयारी करताना दोन साप दिसणे हा गावकऱ्यांच्यादृष्टीने अपशकून होता. परत असे काही होऊ नये म्हणून उतारा करणे गरजेचे होते, असे सर्व गावकऱ्यांचे मत पडले. याबाबतीत खोतांचे मत घेणे गरजेचे होते. मग श्रीजवळ खोत म्हणजे बाबा आहेत काय, याची चौकशी झाली. बाबा नेमके घरात नव्हते. आईची परवानगी घेऊन गावकऱ्यांनी श्रीला बरोबर घेतले. त्यांनीच श्रीच्या हस्ते गावदेवळात देवाला नारळ द्यायचे ठरवले. रात्री आठची वेळ होती. श्रीसह सर्वजण गावदेवळात आले. तेथे श्रीच्या हस्ते नारळ फोडण्यात आला. श्रीने आजवर दगडावर कधीच नारळ फोडला नव्हता. त्यामुळे हातोडीने त्याने नारळ फोडला. त्यानंतर गाऱ्हाणे घालून अशी विघ्ने कार्यक्रमात आणू नको म्हणून देवाला आळविण्यात आले. विघ्ने टाळण्यासाठी हा उत्तम उतारा असे गावकऱ्यांना वाटले. आपल्या हस्ते देवासमोर नारळ फोडल्यामुळे श्री फारच खूश झाला. इतक्या लहान वयात देवासमोर नारळ फोडण्याचा मान आपल्याला मिळाल्याने श्री फारच खूश होता. श्री खोताचा मुलगा असल्यानेच हे शक्य झाले. देवाजवळ जाण्यासाठी आपली गरज असते, हे त्याने हेरले. देवाला नारळ दिल्यावर शाळेतील कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला, हे सांगण्याची गरज नाही. या घटनेवरून श्रीच्या डोक्यात देवाबाबतची श्रद्धा अधिक बळकट झाली नसती तरच नवल.
(लेखक बालरोगतज्ज्ञ आणि चिंतनशील अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

