वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार सुधारावा
वैद्यकीय महाविद्यालयाचा
कारभार सुधारावाः राणे
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ११ ः येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एकूणच कारभाराबाबत अनेक तक्रारी आहेत. प्रत्येक रुग्णाला जिल्ह्याबाहेर पाठवण्याचा धंदा बंद करा, किमान रुग्णांच्या आजाराबाबत निदान तरी व्यवस्थित करा. तुम्ही अप्रत्यक्षपणे माणसे मारण्याचा धंदा चालविलेला आहे, तो तत्काळ बंद करा, अशा शब्दांत पालकमंत्री नीतेश राणे यांनी आजच्या नियोजन समिती सभेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.
जिल्हा नियोजन समितीची सभा आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. आमदार नीलेश राणे यांनी जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत वैद्यकीय अधिष्ठाता (डीन) यांच्याबाबतही आरोप केले. जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून योग्य निदान होत नाही. एका महिलेला गरोदर असल्याचे सांगत गोवा वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आले. प्रत्यक्ष त्या महिलेला पोटात ट्यूमर असल्याचे त्या ठिकाणी निदान झाले, ही बाब अत्यंत गंभीर आहे. असे अनेक प्रकार समोर आले आहेत. अधिष्ठाता यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत. याबाबत गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी आमदार राणे यांनी सभागृहात केली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनीही वैद्यकीय महाविद्यालयाला दिलेल्या निधी खर्चाबाबत आढावा घेत निधी योग्य रीतीने व वेळीच खर्च करा, अशा सूचना दिल्या.
यावेळी पालकमंत्री राणे यांनी आमदार राणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर बोलताना, अधिष्ठाता यांच्या चुकीच्या कारभाराबाबत माझ्याकडेही अनेक तक्रारी असल्याचे सांगत दुजोरा दिला; मात्र यावेळी अधिष्ठाता यांनी आपला कोणताही खुलासा केला नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तक्रारी वाढल्या असून जिल्ह्यासाठी योग्य नाही. येथील गोरगरीब रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी. यासाठी आम्ही झटत असताना रुग्ण जिल्ह्याबाहेर का पाठविले जातात? तुमची अडचण काय? किमान रुग्णांच्या आजाराचे निदान तरी योग्य करा. अंतर्गत भांडणे थांबवून रुग्णांना चांगली सेवा द्या, असे सुनावले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

