-कैद्याच्या मजुरीपेक्षाही कमी पेन्शन, ही लोकशाहीची थट्टाच
पेन्शनधारकांचा आज विराट मोर्चा
कैद्याच्या मजुरीपेक्षाही कमी पेन्शन ; ३० वर्षात पेन्शन वाढ नाही
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : देशाच्या तिजोरीत आयुष्यभर प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या कामगारांच्या नशिबी निवृत्तीनंतर केवळ ५०० ते १००० रुपयांची पेन्शन येत असेल तर ही लोकशाहीची क्रूर थट्टा आहे. तुरुंगातील कैद्याला मिळणाऱ्या मजुरीपेक्षाही कमी रक्कम पेन्शन म्हणून मिळणे हे सरकारसाठी लांछनास्पद आहे, अशा तिखट शब्दांत ईपीएस १९९५ पेन्शनधारकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी गेल्या ३० वर्षांपासून पेन्शनमध्ये कोणतीही वाढ न केल्याच्या निषेधार्थ उद्या (ता. १३)रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पेन्शनधारकांनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी ''लाडकी बहीण'' सारख्या योजनांमधून मागणी नसतानाही तिजोरी खुली केली जाते; मात्र ज्या कामगारांनी आयुष्यभर कष्ट केले आणि ज्यांचा हक्काचा पीएफ कापला गेला, त्यांच्या मागण्या का डावलल्या जातात? असा सडेतोड सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला. सद्यःस्थितीत २०१४ पूर्वीच्या निवृत्तांना ५०० ते १ हजार रुपये तर त्यानंतरच्या निवृत्तांना २५०० ते ३५०० रुपयांच्या तुटपुंज्या रकमेवर उदरनिर्वाह करावा लागत असल्याची भीषण वास्तवता निवेदनातून मांडण्यात आली आहे.
१९९५ची पेन्शन योजना ही कामगारांवर लादलेली शिक्षा ठरली आहे. २००९ मध्ये ओआरसी आणि कम्युटेशनसारख्या महत्त्वाच्या तरतुदी बंद करून मोदी आणि मनमोहन सिंग या दोन्ही सरकारांनी पेन्शनधारकांच्या हक्कावर गदा आणली आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटना दिल्ली आणि महाराष्ट्र स्तरावर आंदोलने करत आहेत; परंतु सरकारकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने आता रत्नागिरीतून हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या सकाळी ११ वा. मारूती मंदिर येथून मोर्चाला सुरुवात होणार ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाप्त होणार आहे.
या मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
----
कोट...
हा केवळ आजच्या निवृत्तांचा प्रश्न नाही तर ज्यांचा आज ‘पीएफ’ कापला जात आहे, अशा सर्व तरुण कामगारांच्या भविष्याचा प्रश्न आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे.
- संजय नागवेकर (उपाध्यक्ष, राष्ट्रीय संघटना) व व्ही. टी. शिंदे (तालुकाध्यक्ष)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

