सावंतवाडी गोदामाच्या मागे ''खाऊ गल्ली''
swt1213.jpg
24084
सावंतवाडी : पालिकेच्या उद्यानातील खेळण्यांची पाहणी करताना उद्यान सभापती मोहिनी मडगावकर.
सावंतवाडी गोदामाच्या मागे ‘खाऊ गल्ली’
मोहिनी मडगावकर : रोजगार निर्मितीसाठी उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ : शहरातील महिला व युवकांना रोजगार मिळावा, या उद्देशाने आणि पर्यटन वृद्धीसाठी येथील गोदामाच्या मागे असलेल्या आठवडाबाजार भरत असलेल्या रिकाम्या जागेत लवकरच खाऊ गल्ली करण्यात येणार आहे, अशी माहिती आज येथे सावंतवाडी पालिकेच्या उद्यान व पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर यांनी दिली.
दरम्यान, येथील उद्यानात असलेली जुनी खेळणी बदलण्यासोबत त्या ठिकाणी धोकादायक असलेल्या नाल्यावर स्लॅब घालण्यासाठी तसेच शहराच्या संस्कृतीला साजेल असा सेल्फी पॉइंट उभारण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सौ. मडगावकर यांनी काल (ता. ११) सभापतिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर आज जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांची संवाद साधला. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘या ठिकाणी असलेली जुनी खेळणी धोकादायक झालेली आहेत. त्यामुळे ती बदलण्यासाठी लवकरच पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बाजूला धोकादायक असलेला नाला बंदिस्त करण्यात येणार आहे. ‘एमटीसी’च्या माध्यमातून लावण्यात येणारी खेळणी पुन्हा सुरू करता येतील का? या संदर्भात पालिका प्रशासनाशी चर्चा करण्यात येणार आहेत.’’
त्यानंतर त्यांनी पालिकेच्या गोदामाच्या बाजूला असलेल्या आठवडा बाजाराच्या जागेची पाहणी केली. शहरात अनेक युवक व महिला बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार देता यावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असणार आहेत. आगामी काळात त्यांना रोजगार मिळावा, यासाठी या ठिकाणी खाऊ गल्ली उभारण्याचा मानस आहे. त्यासाठी पालिकेच्या बैठकीत ठराव घेऊन निर्णय घेतला जाईल. आठवडा बाजार मंगळवारी भरतो. मात्र अन्य वेळी ती जागा रिकामी असते. त्यामुळे त्या जागेचा फायदा होऊ शकतो. आठवडा बाजारादिवशी संबंधित व्यापाऱ्यांना सुटी देऊन बाजार यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे त्याचा तोटा कोणाला होणार नाही आणि रोजगाराचे नवे दालन उभे राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘शहराबाहेरून महामार्ग आणि रेल्वे गेल्यामुळे त्या ठिकाणी शहर दुर्लक्षित राहिले आहे. पर्यटक बाहेरून जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेले उद्योगधंदे ओस पडत चालले आहेत. हॉटेल बंद पडत आहेत. ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात याबाबत सकारात्मक धोरण ठरवले जाणार आहे. आमचे नेते पालकमंत्री नीतेश राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्यासह सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन याबाबतचा सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

