

30804
बेसुमार वृक्षतोड शेतकऱ्यांच्या मुळावर
डॉ. जयेंद्र परुळेकर ः बागायतदारांना शासनाकडून रास्त अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य आर्थिक कणा असलेल्या आंबा आणि काजू उत्पादनात यावर्षी तब्बल ८५ टक्के घट झाली असून, ही परिस्थिती ‘न भूतो न भविष्यती’ अशी निर्माण झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने बागायतदार आणि व्यापारी पूर्णपणे आर्थिक अडचणीत आले आहेत. सह्याद्रीच्या पायथ्याशी होणारी बेसुमार वृक्षतोड हेच याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे बागायतदारांनी आंब्यासाठी प्रतिहेक्टरी ५ लाख आणि काजूसाठी ३ लाख रुपयांची मागितलेली मदत रास्त आहे, असे सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.
श्री. परुळेकर यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धिस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या कित्येक वर्षांत उत्पादनात एवढी मोठी घट कधीही पाहिली नव्हती. अचानक पडलेली थंडी, ढगाळ वातावरण आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होणे ही यामागची प्राथमिक कारणे असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणावर मोहोर येऊनही फलधारणा न झाल्याने बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यातील इतर शेतकऱ्यांप्रमाणेच कोकणातील शेतकरीही मदतीच्या प्रतीक्षेत असून, कर्जमाफी किंवा नुकसान भरपाईसाठी त्यांना किती काळ संघर्ष करावा लागेल, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
उत्पादनातील या प्रचंड घटीमागे सह्याद्रीच्या पायथ्याशी होणारी बेसुमार वृक्षतोड हे मुख्य कारण असल्याचे डॉ. परुळेकर यांनी अधोरेखित केले आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यातील अनेक गावांमध्ये शेकडो एकर जमिनीवरील जुने वृक्ष कटरच्या साहाय्याने कापले जात आहेत. महसूल आणि वन विभाग या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भौगोलिकदृष्ट्या चिंचोळी पट्टी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्रीतील जंगल नष्ट झाल्याची किंमत आता किनारपट्टीवरील बागायतदारांना मोजावी लागत आहे. उच्च न्यायालयाने वृक्षतोड बंदीचे आदेश देऊनही जिल्ह्यात वृक्षतोड थांबलेली नाही. यामुळे भविष्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि हवामानातील बदलांचे गंभीर परिणाम संपूर्ण जिल्ह्याला भोगावे लागणार आहेत. निसर्गाचा हा समतोल बिघडल्यास बागायतदारांसोबतच सामान्य जनतेचेही जीवन कठीण होईल, अशी भीती डॉ. परुळेकर यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.