

35118
गॅस सिलिंडरसाठी रांगाच्या रांगा
ग्रामीण भागातील चित्र; घरपोच सेवा विस्कळीत
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. ३ : आखाती देशांतील युद्धाच्या सावटाखाली सध्या गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचे सर्वाधिक चटके ग्रामीण भागाला बसू लागले आहेत. आरोंदा येथे सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते.
सिलेंडर मिळणार नाही अशी अनामिक भीती, प्रशासकीय अनास्था आणि घरपोच सेवेचा अभाव यामुळे ग्राहक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. गुरूवारी आरोंदा ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर गॅस वितरणाची गाडी येणार होती. यामुळे तेथे सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी होती. मात्र, केवळ एकाच ठिकाणी वितरण होत असल्याने ३-४ किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या ग्राहकांना रिक्षा किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागल आहे. येथे ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या.
उन्हात रांगेत उभे राहावे लागल्याने आणि घरपोच सेवा मिळत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते नरेश देऊलकर यांनी गॅस कर्मचाऱ्यांना जाब विचारला. कर्मचाऱ्यांनी इंटरनेट सुविधेचा अभाव असल्याचे कारण पुढे केले, मात्र वाहतूक खर्च आकारूनही सेवा का मिळत नाही, असा प्रश्न देऊलकर यांनी उपस्थित केला. या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या वादाची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासक सायली साळगावकर यांच्या उपस्थितीत संबंधितांनी पुढील गॅस वितरणावेळी योग्य नियोजन करून ''डोअर स्टेप डिलिव्हरी'' (घरपोच सेवा) देण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनानंतर नागरिकांनी तूर्तास समाधान व्यक्त केले असले, तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी होणार याकडे आरोंदावासीयांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान ग्रामीण भागातील हे प्रतिनिधीक उदाहरण आहे. बहुसंख्या ठिकाणी अशीच स्थिती आहे. पूर्वी ग्रामीण भागात आठवड्यातून एक दिवस घरपोच गॅस वितरण होत असे. अलीकडे बहुसंख्य एजन्सी ही सेवा नियमित देताना दिसत नाही. यामुळे ग्राहकांना भुर्दंड बसत आहे. गावापासून गॅसची मुख्य एजन्सी आठ दहा किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर असते. तेथून सिलेंडर आणायचा तर वाहतूक खर्च जास्त येतो. यामुळे अस्वस्थता वाढली आहे.
------------
35120
नांदगाव पंचक्रोशीमध्ये
गॅस वितरणाबाबत गोंधळ
ग्राहकांचे हाल; तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ३ : नांदगाव पंचक्रोशीत उप-वितरकांमार्फत (सब-डिलर्स) ग्राहकांना गॅस वितरण केले जाते. मात्र, कणकवली व फोंडा येथील मुख्य एजन्सीकडून घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. संबंधित एजन्सीधारक वेगवेगळी कारणे देत सर्वसामान्यांना सिलिंडर नाकारत असल्याचा आरोप होत आहे. ही परिस्थिती सुधारावी अशी मागणी नांदगावचे सरपंच रविराज मोरजकर यांनी कणकवली तहसीलदारांकडे केली.
गॅस बुकिंगसंदर्भात ग्राहकांना कोणतीही स्पष्ट सूचना मिळत नाही. उप-वितरक ''साठा उपलब्ध नाही'' असे सांगून वेळ मारून नेतात, ज्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नांदगावचे सरपंच मोरजकर यांनी कणकवली तहसीलदारांकडे केली आहे.सरपंचांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नायब तहसीलदार विजय वरक यांची भेट घेऊन त्यांना ग्रामस्थांच्या स्वाक्षरींचे निवेदन दिले. यावेळी असलदे सोसायटीचे चेअरमन भगवान लोके, माजी चेअरमन प्रकाश परब, कोळोशी सोसायटीचे चेअरमन संतोष चव्हाण, कृष्णा वायंगणकर, श्री. बटवाले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.