

गॅस सिलिंडर मिळवणे
दिव्यांगांसाठी ‘दिव्य’
वृद्धांनाही कारभाराचा मोठा फटका
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. ६ : शासनाकडून गॅस सिलिंडरचा तुटवडा नसल्याचे वारंवार सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात आरोंदा आणि परिसरातील गॅस ग्राहकांसाठी सिलिंडर मिळवणे म्हणजे एक ‘दिव्य’ ठरत आहे. गॅस वितरकांकडून घरपोच सेवा देणे बंधनकारक असतानाही, ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिव्यांग आणि वृद्ध ग्राहकांना या कारभाराचा मोठा फटका बसत आहे.
गॅस पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांच्या घरापर्यंत सिलिंडर पोहोचवणे आवश्यक आहे; मात्र, आरोंदा परिसरात हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. गॅस वितरणाची गाडी केवळ गावातील ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत येते. यामुळे दूरवर राहणाऱ्या ग्राहकांना, विशेषतः वृद्ध आणि दिव्यांगांना स्वतः गॅस सिलिंडर वाहून न्यावा लागत आहे. ग्राहकांच्या मते, गॅस वितरक प्रत्येक सिलिंडरवर ‘होम डिलिव्हरी’चा (घरपोच सेवा) खर्च वसूल करतात. मात्र, प्रत्यक्ष सेवा मात्र दिली जात नाही. ग्राहकांना स्वतःच्या खर्चाने रिक्षा किंवा अन्य वाहनाने सिलिंडर घरापर्यंत न्यावा लागतो. म्हणजेच, ग्राहकांना गॅसची मूळ किंमत अधिक वितरकाचा वाहतूक खर्च अधिक स्वतःचा खासगी वाहतूक खर्च असा तिहेरी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता, ‘नेटवर्क नाही’ किंवा ‘ओटीपी येत नाही’ अशी तांत्रिक कारणे देऊन ग्राहकांची बोळवण केली जाते.
-----------
तहसीलदारांना साकडे
मळेवाड येथील दिव्यांग अनंत (मामा) आजगावकर यांनी याविरुद्ध आवाज उठवला आहे. त्यांनी सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन देऊन व्यथा मांडली. ‘गॅस वितरकांच्या अशा कारभारामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान होत असून, शारीरिक व्याधी असलेल्या व्यक्तींना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे,’ असे त्यांनी निवेदनात नमूद केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बाळा शिरसाट, प्रकाश पार्सेकर, गोविंद मुळीक आदी उपस्थित होते.
------
कोट
35653
गॅस वितरणाबाबतच्या तक्रारींची तहसील कार्यालयाने दखल घेत सकारात्मक आश्वासन दिले आहे. गॅस सिलिंडरसाठी दिव्यांगांचे हाल थांबविण्यासाठी संबंधित गॅस एजन्सीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
- अनंत (मामा) आजगावकर, दिव्यांग