

swt131.jpg
37037
सावंतवाडी ः आंबेडकर चौक साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना अनिल निरवडेकर. बाजूला कवी अजय कांडर, वीरधवल परब, प्रा. एस. एन. पाटील, अरुण नाईक, मधुकर मातोंडकर, विठ्ठल कदम व इतर मान्यवर.
सत्ताधारी-साहित्यिकांची युती घातक
कवी अजय कांडर ः सावंतवाडीत ‘आंबेडकर चौक’ साहित्य संमेलन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः धार्मिक उन्मादी राजकारणाला आज साहित्यिकांचे प्रोत्साहन मिळत असून सत्ताधारी आणि साहित्यिक यांची ही युती निकोप समाजासाठी अत्यंत धोकादायक आहे. अशा काळात व्यवस्थेला शरण न जाणारा लेखकच सकस साहित्य निर्माण करू शकतो, असे परखड मत कवी अजय कांडर यांनी व्यक्त केले. येथील श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित पहिल्या नाटककार कवी सिद्धार्थ विष्णू तांबे स्मृती आंबेडकर चौक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ तथा सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला जल अर्पण करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी वीरधवल परब, प्रा. एस. एन. पाटील, ज्येष्ठ कवी अरुण नाईक, आयोजक मधुकर मातोंडकर आणि विठ्ठल कदम उपस्थित होते.
या सोहळ्यात ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांना सिद्धार्थ तांबे स्मृती लेखन पुरस्कार तर सम्यक परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष अनिल जाधव यांना सिद्धार्थ तांबे स्मृती कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. कवी हरिश्चंद्र भिसे यांच्या ‘रानपुराण’ या दीर्घ काव्यसंग्रहाचे आणि समीर वेंगुर्लेकर यांच्या ‘वारसदार’ या कादंबरीचे प्रकाशनही करण्यात आले.
प्रमुख पाहुणे वीरधवल परब यांनी सिद्धार्थ तांबे यांच्या आठवणींना उजाळा दिला. सिद्धार्थ केवळ साहित्यिक नव्हते, तर चळवळीचे टीकाकारही होते. आंबेडकर चळवळीत शिरलेल्या ‘बाबा-बुवा’ प्रवृत्तीवर त्यांनी प्रहार केला होता. विखुरलेल्या परिवर्तनवादी विचारांना एकत्र आणण्यासाठी हे संमेलन मैलाचा दगड ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
संमेलनाचे उद्घाटक उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी पालिकेच्या माध्यमातून सावंतवाडीत होणाऱ्या साहित्यिक कार्यक्रमांसाठी योग्य ती मदत केली जाईल, अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ कवी अरुण नाईक यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. यामध्ये जिल्हाभरातून आलेल्या कवींनी आपल्या विविध रचना सादर केल्या. प्रास्ताविक मधुकर मातोंडकर यांनी केले, तर विठ्ठल कदम यांनी आभार मानले. प्रा. संजीवनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
बंधुप्रेमाचा इतिहास दुर्लक्षित राहिल्याची खंत
श्री. कांडर म्हणाले, विशिष्ट अस्मिता कुरवाळण्याच्या काळात माणूस म्हणून जगणे कठीण झाले आहे. बहुजन साहित्यिकांनी आपली सामाजिक भूमिका गांभीर्याने घ्यायला हवी. सिद्धार्थ तांबे यांचे ‘जाता नाही जात’ सारखे नाटक सामाजिक समतेचा आग्रह धरणारे होते, म्हणूनच त्यांचे साहित्य काळाच्या पडद्यावर टिकणारे आहे. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळकांचे सुपुत्र श्रीधर पंत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील बंधुप्रेमाचा इतिहास दुर्लक्षित राहिल्याबद्दल खंत व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.