कलेच्या जोरावर स्वकमाईतून पूर्ण केले शिक्षण

कलेच्या जोरावर स्वकमाईतून पूर्ण केले शिक्षण
Published on

rat10p3.jpg
42593
कौस्तुभ शेट्ये

कलेच्या जोरावर स्वकमाईतून पूर्ण केले शिक्षण
साखरप्यातील कौस्तुभचा आदर्श; नमनामधील बिदागीतून शुल्क
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १० ः ''कमवा आणि शिका'' ही संकल्पना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असली, तरी रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथील एका शालेय विद्यार्थ्याने ती खऱ्या अर्थाने सत्यात उतरवली आहे. येथील कौस्तुभ मिलिंद शेट्ये याने इयत्ता तिसरीपासून आपल्या अंगी असलेल्या ''नमन'' कलेच्या माध्यमातून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च स्वतःच केला आहे.
कौस्तुभ हा कबनूरकर इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी असून, नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत त्याने ८० टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. कौस्तुभला लहानपणापासूनच कोकणची लोककला असलेल्या ''नमन''ची प्रचंड आवड होती. त्याची ही आवड ओळखून पालकांनी त्याला गावातील स्वामी समर्थ कलामंच नमन मंडळात दाखल केले. तिसरीत असल्यापासून तो बालकलाकार म्हणून या क्षेत्रात सक्रिय झाला.
कोकणात दिवाळीनंतर नमनाचे प्रयोग सुरू होतात. कौस्तुभ रात्री नमनाचे कार्यक्रम करून पहाटे घरी परतत असे. मात्र, जागरणाची तमा न बाळगता तो दुसऱ्या दिवशी न चुकता शाळेत उपस्थित राहत असे, असे त्याच्या शिक्षिकांनी अभिमानाने सांगितले. शाळेचे लिपिक आणि नमन मंडळाचे आधारस्तंभ प्रज्योत पांचाळ यांनी त्याला सतत प्रोत्साहन दिले.
कौस्तुभचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, नमनाच्या प्रयोगांतून त्याला मिळणारी ''बिदागी'' (मानधन) तो इतरत्र खर्च न करता साठवून ठेवतो. इयत्ता तिसरीपासून ते दहावीपर्यंतची शाळेची संपूर्ण फी त्याने याच स्वकमाईतून भरली आहे. एकीकडे कलेची जोपासना आणि दुसरीकडे शिक्षणाची ओढ, असा दुर्मिळ संगम त्याच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतो.

चौकट
कला जोपासायला कुटुंबाचे पाठबळ
कौस्तुभची आई श्रद्धा शेटये या शिलाई व्यवसाय करतात आणि सध्या कोंडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत. वडील मिलिंद शेटये यांचे किराणा दुकान असून, कौस्तुभ सुट्ट्यांमध्ये दुकानात जाऊन त्यांनाही मदत करतो. "परिस्थितीची जाणीव ठेवून कौस्तुभने स्वतःच्या कलेतून मिळवलेला पैसा शिक्षणासाठी वापरला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे," अशी प्रतिक्रिया त्याची आई श्रद्धा शेटये यांनी दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com