कोकण रेल्वेच्या विलंबाने प्रवाशांचे नियोजन बिघडतेय

कोकण रेल्वेच्या विलंबाने प्रवाशांचे नियोजन बिघडतेय
Published on

rat10p7.jpg-
42597
चिपळूण : येथे स्थानकावर रेल्वेची प्रतीक्षा करत असलेले प्रवासी.

कोकण रेल्वेच्या विलंबाने प्रवाशांचा खोळंबा
विशेष गाड्यांमुळे एकेरी मार्गावर अधिक भार; नियोजित वेळापत्रकावर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे विस्कळीत झाली असून, गाड्यांच्या प्रचंड विलंबामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई, गोवा आणि कर्नाटक दरम्यान धावणाऱ्या नियमित गाड्यांसह विशेष रेल्वेगाड्याही उशिराने धावत असल्याने प्रवाशांच्या नियोजित वेळापत्रकावर परिणाम होत आहे.
कोकण रेल्वेचा एकेरी मार्ग, मार्गावर सुरू असलेली देखभालीची कामे आणि पर्यटनासाठी सोडण्यात आलेल्या जादा विशेष गाड्यांमुळे मार्गावर मोठी कोंडी होत आहे. याचा थेट परिणाम गाड्यांच्या वेळेवर होत असून, विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्यांना क्रॉसिंगसाठी तासनतास थांबावे लागत आहे. नेहमी वेळेवर धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव एक्स्प्रेस यांसारख्या प्रतिष्ठेच्या गाड्यांनाही या विलंबाचा मोठा फटका बसला आहे. यामुळे कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा पर्यटनासाठी निघालेल्या हजारो प्रवाशांचे हाल होत असून त्यांना रेल्वे स्थानकांवर ताटकळत राहावे लागत आहे. गाड्या उशिराने येत असतानाच, ग्रामीण भागातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याने संतापात भर पडत आहे. अनेक स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची कमतरता, बसण्यासाठी आसनांची अपुरी व्यवस्था आणि गाड्यांच्या विलंबाबाबत होणाऱ्या घोषणांमधील विसंगतीमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.
महागडी तिकिटे काढूनही वेळेवर सेवा मिळत नाही. अनेकदा रात्री उशिरा स्थानकांवर अडकून पडावे लागते. रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन वेळापत्रक सुरळीत करावे अशा प्रतिक्रिया त्रस्त झालेले प्रवासी व्यक्त करीत आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

चौकट १
उशिराने धावणाऱ्या गाड्या
कोकण रेल्वे मार्गावर उशिराने धावणाऱ्या गाड्यांमध्ये एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, मुंबई-मंगळुरू अतिजलद एक्स्प्रेस यांचा समावेश आहे.

-------------
चौकट २
गाड्यांना उशिर होण्याचे कारण
* रोहापासून पुढे एकेरी मार्ग आहे.
* अनेक ठिकाणी सुरू असलेली देखभार दुरूस्तीची कामे
* विशेष गाड्यांमुळे गाड्यांची संख्या वाढली
* बहुसंख्य रेल्वेगाड्या मडगावपर्यंत चालवण्याचा आग्रह

--------------
चौकट
हे उपाय करण्याची गरज
* जनशताब्दी आणि एलटीटी-मडगाव सावंतवाडीपर्यंत चालवावी
* तेजस एक्स्प्रेसला करमळी किंवा थिवीपर्यंत मर्यादित करावे.
* कोकणकन्या एक्स्प्रेस पूर्वीप्रमाणे सायंकाळी ६ वाजता सोडावी

---------------
कोट
कोकण रेल्वेवर दररोज सरासरी ७६ रेल्वेगाड्या आणि मालगाड्या धावतात. त्यात विशेष रेल्वेगाड्या समाविष्ट झाल्याने, एकेरी रेल्वे मार्गावरून रेल्वेगाड्या, विशेष रेल्वेगाड्या आणि मालगाड्या चालवणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी पावसाळ्यापूर्वी दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे काही रेल्वेगाड्या विलंबाने धावतात. प्रवाशांनी सहकार्य करावे.
- सुनील नारकर, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे

Marathi News Esakal
www.esakal.com