-चिपळूण, खेडमध्ये टँकरच्या पाण्याचा आधार

-चिपळूण, खेडमध्ये टँकरच्या पाण्याचा आधार
Published on

-rat२५p१९.JPG-
26O46572
खेड ः कोतवली गावात सध्या एमआयडीसीकडून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
---
कोकणात पावसाने पुनरागमन करत दमदार हजेरी लावल्याने राजापूर शहराला दिलासा मिळाला असून, अडीच महिन्यांपासून भेडसावत असलेली पाणीटंचाई अखेर दूर झाली आहे; मात्र चिपळूण, खेड आणि लोटे एमआयडीसी परिसरात अद्यापही पाण्याचे नैसर्गिक स्रोत पुरेशा प्रमाणात निर्माण झाले नसल्याने टँकर व पर्यायी व्यवस्थांवर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी, एका बाजूला राजापूरमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू झाला असताना दुसऱ्या बाजूला चिपळूण-खेड परिसराला अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
----
खेड, चिपळूणला टँकरच्या पाण्याचा आधार
पावसाची हजेरी; मुबलक पाणीसाठ्याची प्रतीक्षा, कोयनेतील वीजनिर्मिती थांबल्याचा फटका
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ : तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे; मात्र अजून पाण्याचे नैसर्गिक स्रोत तयार झालेले नाहीत. त्यामुळे खेड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा सुरू आहे. पोफळी परिसरातील गावांना एक दिवसाआड पाणी सुरू आहे. चिपळूण शहरात काही ठिकाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी या भागाला अजूनही मुसळधार पावसाची अपेक्षा आहे.
कोयना प्रकल्पातील वीजनिर्मिती ठप्प झाल्याचा सर्वाधिक मोठा परिणाम लोटेसह चिपळूण तालुक्यातील उद्योजकांना बसला आहे. लोटे परशुराम, खेर्डी, खडपोली औद्योगिक वसाहतीमधील शेकडो कंपन्या पाण्याअभावी बंद पडल्या आहेत. एमआयडीसीसाठी जमीन देणाऱ्या गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. यातील टंचाईग्रस्त कोतवली, धामणदेवी, सोनगाव आणि घाणेकुंट गावाला एमआयडीसीकडून रोज टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. काही गावांना एमआयडीसीने टाक्यांची व्यवस्था करून दिली आहे. लोटे एमआयडीसी परिसरातील गावात ज्या विहिरींना पिण्यायोग्य पाणी आहे तेथील पाणी आणून या टाक्यांमध्ये सोडले जात आहे आणि त्यातून ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे तसेच काही गावांनी एमआयडीसीचे पाणी न घेता स्थानिक विहीर आणि तळ्याचे पाणी वापरायला सुरुवात केली आहे. लोटे परिसरात पाऊस सुरू झाल्यानंतर भूगर्भातील पाण्याची पातळी काही प्रमाणात वाढली आहे.
लोटे, खेर्डी, खडपोली येथील कारखानदारांचे उत्पादन बंद असले तरी कारखाने सुरू आहेत. त्यातील मशीनरीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी आणि शौचालयात वापरण्यासाठीचे पाणी हे टॅंकरने घेतले जात आहे.
चिपळूणच्या उपनगरात आणि पूर्व विभागात पाऊस झाल्यानंतर वाशिष्ठी नदीतील पाण्याची पातळी काही प्रमाणात वाढली. त्यामुळे हे पाणी उचलून आम्हाला द्या, अशी मागणी सातत्याने कारखानदारांकडून सुरू झाली आहे; परंतु एमआयडीसीचे पंपपाऊस असलेल्या ठिकाणी पाणी अत्यल्प आहे. त्यामुळे एमआयडीसीला पंपिंग करताना अडचणी येत आहेत. चिपळूण पालिकेचे खेर्डी आणि गोवळकोट येथे जॅकवेल आहे. त्या ठिकाणी पाणी लागले आहे; परंतु पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा साठा होत नाही. त्यामुळे चिपळूण पालिका शहरातील नागरिकांना कमी दाबाने पाणी देत आहे. ज्या ठिकाणी नळाला पाणी जात नाही तिथे टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पोफळी कर्मचारी वसाहत, पोफळी गाव, कोंडफणसवणे, शिरगाव, तळसर आणि मुंडे गावाला कोयना धरणाचे पाणी ग्रॅव्हिटीने दिले जाते. सध्या या गावांना कोळकेवाडी धरणातून पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून, दिवसाआड कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे.
---
दृष्टिक्षेपात...
उद्योगांवर पाणीटंचाईचा फटका
लोटे, खेर्डी, खडपोलीतील उत्पादन ठप्प
शेकडो कंपन्यांचे कामकाज प्रभावित
मशिनरी दुरुस्तीची कामे सुरू
कर्मचाऱ्यांसाठी टँकरने पाणी उपलब्ध
---
कोट
पाऊस सुरू झाल्यानंतर आम्ही एमआयडीसीकडे पाणी मागितले; परंतु वाशिष्ठी नदीतून पाणी उचलता येईल एवढी पाणीपातळी नदीची नाही, असे एमआयडीसीकडून सांगण्यात आले. कोयना धरणातील पाणी अत्यल्प आहे. त्यामुळे कोयना प्रकल्पात निर्मिती होत नाही. अजून मुसळधार पावसाची अपेक्षा आहे.
- राज आंब्रे, अध्यक्ष, लोटे उद्योजक संघटना
---
-rat२५p११.jpg-
26O46542
राजापूर ः कोदवली धरणामध्ये झालेला पाणीसाठा.
-----
(ही पोटात घ्यावी)

राजापुरात मुसळधार पावसाने टंचाई दूर
राजापूर ः अनेक दिवसाच्या खंडानंतर पावसाचे पुनरागमन झाले असून, गेल्या चार दिवसांपासून सातत्याने पाऊस तालुक्यामध्ये पडत आहे. त्यामुळे शहरातील पाणीटंचाई दूर झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील धरणामध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहरामध्ये नियमित पाणीपुरवठ्याला सुरुवात झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. सुमारे अडीच महिन्यापासून शहरामध्ये सुरू असलेली पाणीटंचाई अखेर संपुष्टात आली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य जलस्रोत असलेल्या कोदवली येथील धरणातील पाणीसाठा वाढत्या उष्म्याच्या झळा पोहोचून मार्च महिन्यामध्ये खालावला होता. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन नियोजनाचा भाग म्हणून नगरपालिकेने १५ एप्रिलपासून शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. त्यानंतरही, हवेतील उष्मा आणि तापमानवाढ राहिल्याने जलसाठे खालावले होते तर अन्य जलस्रोत असलेल्या शीळ जॅकवेलच्या येथून होणाऱ्या पुरवठ्यामध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे अडथळे येत होते. त्यामुळे पालिकेला शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागले तसेच पाणीवितरण कालावधीमध्ये कपात करण्यात आली; मात्र, पाच दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे.
---------
अग्निशमन बंबाने पाण्याची ने-आण
पावसाचे आगमन लांबणीवर पडल्याने शहरातील पाणीपुरवठा नियोजन विस्कळीत झाला होता. अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. अशा स्थितीमध्ये अग्निशमन बंबाच्या साहाय्याने साठवण टाक्यांमध्ये पाणी वाहून नेऊन टाकत पालिकेकडून शहरामध्ये पाणीपुरवठा केला जात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com