

46805
आंबा, काजू उत्पादकांसाठी २०९ कोटींची मदत
संजू परब : नीलेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे १२ तासांत शासन निर्णय
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार नीलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राज्य शासनाने अवघ्या १२ तासांत २०९ कोटी १० लाख ६ हजार रुपयांच्या मदतीस मंजुरी दिली. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार नीलेश राणे यांनी दिलेला शब्द पाळल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांचे जाहीर आभार मानले.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत परब बोलत होते. यावेळी जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, उपतालुकाप्रमुख राकेश पवार आदी उपस्थित होते. संजू परब म्हणाले की, ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत कडाक्याची थंडी आणि अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा व काजू बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आमदार राणे यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. पावसाळी अधिवेशनात त्यांनी हा विषय आक्रमकपणे मांडत कृषिमंत्र्यांचे लक्ष वेधले. बागायतदारांची स्थिती, कृषी विद्यापीठाच्या सर्वेक्षणाचा अहवाल आणि उपलब्ध आकडेवारी सभागृहात सादर करून त्यांनी शासनाला तातडीने निर्णय घेण्यास भाग पाडले, असे परब यांनी सांगितले.
२०१३ नंतर प्रथमच आंबा व काजू उत्पादकांना अशा प्रकारची नुकसानभरपाई मिळत असल्याचे सांगताना परब म्हणाले, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे आणि आमदार नीलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा निर्णय शक्य झाला आहे. नुकसानभरपाईचा पहिला टप्पा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून दुसरा टप्पाही लवकरच वितरित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
-----------
नगरसेवक अभ्यास दौऱ्यावर, फिरण्यास नव्हे!
सावंतवाडी नगरपालिकेतील काही नगरसेवक काश्मीर दौऱ्यावर गेल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजू परब म्हणाले, नगरसेवक हे फिरण्यासाठी गेले नसून अभ्यास दौऱ्यासाठी गेले आहेत. मी शहरातील कामांवर लक्ष ठेवण्यासाठी येथेच थांबलो आहे. पावसाळ्यात नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होत असल्याची जाणीव असून त्याबाबत आम्ही प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. नगरपालिकेत विरोधी बाकावर असलो तरी राज्यात एकत्र सत्तेत आहोत. त्यामुळे शहरातील त्रुटींकडे लक्ष वेधून त्या सुधारण्याचा आमचा प्रयत्न असतो. नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही काम करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
---
प्रतिहेक्टर २२ हजार ५०० रुपये दराने मदत
शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) अंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना इनपुट सबसिडी स्वरूपात मदत दिली जाणार आहे. निश्चित निकषांनुसार प्रतिहेक्टर २२ हजार ५०० रुपये दराने मदत वितरित केली जाणार असून संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा केली जाणार आहे.
---
पाच जिल्ह्यांना होणार लाभ
‘एनडीआरएफ’ अंतर्गत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील पाच जिल्ह्यांतील एकूण १ लाख ३४ हजार २५१ शेतकऱ्यांना होणार आहे. सुमारे ९२ हजार ३४२.७८ हेक्टर क्षेत्रावरील आंबा व काजू बागांचे नुकसान ग्राह्य धरून शासनाने मदत मंजूर केली आहे. पैकी रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९८.४४ कोटी रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ७९.०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.