

-rat१५p२१.jpg-
26O51115
रत्नागिरी ः वायंगणी येथे लागवड केलेली भातशेती.
-rat१५p२२.jpg-
26O51121
पावस ः उपलब्ध पाण्याचा वापर करून सुरू असलेली लावणी.
------
लहरी पावसाचा भातशेतीला फटका
जिल्ह्यातील ४५ टक्के क्षेत्रावर लागवड पूर्ण; कृषी विभाग सतर्क
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने पूर्णपणे ओढ दिल्यामुळे भातलावण्यांची कामे खोळंबली आहेत. जून महिन्यातील पावसाची कमतरता जुलैच्या सुरुवातीला भरून निघाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात भातलावणीला सुरुवात केली होती; मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा चिंतेत पडला असून, कडक ऊन आणि पाण्याच्या अभावामुळे भातरोपे पिवळी पडू लागली आहेत. बुधवारी (ता. १५) काही ठिकाणी हलका पाऊस पडल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळालेला आहे.
जिल्ह्यात जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. २२ जूनला पावसाने हजेरी लावली आणि ५ जुलैपर्यंत तो सक्रिय होता. या १० ते १२ दिवसांत कमी कालावधीत अतिवृष्टी झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात एकत्रित पाऊस चांगला झाला असला, तरी आता पडलेला हा प्रदीर्घ खंड (कोरडे दिवस) चिंतेची बाब ठरत आहे. जुलै महिन्यात अशी स्थिती गेल्या अनेक वर्षांत प्रथमच पाहायला मिळत आहे. या अनियमिततेचा मोठा फटका शेतीला बसत असून, जमिनीला भेगा जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
जिल्हा कृषी विभागाच्या अहवालानुसार, आजअखेर जिल्ह्यात एकूण २० हजार हेक्टर क्षेत्रावर भातलावणी पूर्ण झाली आहे. एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत लावण्या ४५ टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिल्या आहेत. सध्या कातळावरील भागात पावसाचा अभाव असल्याने तिथली कामे थांबली आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे एकूण लागवडीच्या क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिकांचे शेंडे करपू लागल्याने आणि भविष्यात कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याने, जिल्हा कृषी विभागाने याबाबत दापोली कृषी विद्यापीठाकडून तातडीने विशेष मार्गदर्शक सूचना व सल्ला मागवला आहे.
---
कृषी विभागाचा सल्ला ः
* सध्या रोपांना केवळ जगण्यापुरते पाणी उपलब्ध असल्याने पाणी व्यवस्थापन अत्यंत गरजेचे आहे.
* शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच पुढील लावण्यांचे नियोजन करावे, पाऊस न आल्यास रोपांची अडचण होईल.
* जिथे पाण्याचे खात्रीशीर स्रोत किंवा मुबलक उपलब्धता आहे तिथेच लावण्या सुरू ठेवाव्यात.
---
कोट
शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. ज्या भागांमध्ये भातलावण्या झाल्या आहेत तिथे पाणी उपलब्ध करावे. पावसाचा अंदाज घेऊनच भातलावणी करावी.
-विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.