जिल्ह्यातील 3,200 दाखल्यांना मान्यता

जिल्ह्यातील 3,200 दाखल्यांना मान्यता
Published on

अखेर तीन हजार दाखल्यांना मान्यता
ओटीपीचा निकष बदलला; केवळ ४०० प्रलंबित
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : जन्म व मृत्यू दाखल्यांना मान्यता देण्यासाठी सीआरएस (Civil Registration System) पोर्टलवरील ओटीपी प्रक्रियेमुळे दाखले मंजूर करण्यात अडथळा निर्माण झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही सुमारे पाच हजारांहून अधिक जन्म-मृत्यू दाखले प्रलंबित होते; मात्र, शासनाने प्रणालीत सुधारणा करत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा पर्याय उपलब्ध करून दिल्याने दाखल्यांच्या मंजुरीला वेग आला आहे. आतापर्यंत २ हजार ६०० जन्मदाखले आणि ६०० मृत्यू दाखल्यांसह एकूण ३ हजार २०० दाखल्यांना मान्यता देण्यात आली असून, आता केवळ ४०० दाखले प्रलंबित आहेत.
बनावट जन्मदाखल्यांच्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने २०२३ पूर्वीच्या जन्मदाखल्यांसाठी बारकोड सक्तीचा केला होता. त्यानुसार दाखल्यांना मंजुरी देण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर ओटीपी येत असे आणि तो नोंदवल्यानंतरच संबंधित दाखल्याला मान्यता मिळत होती. या प्रक्रियेमुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला होता. ओटीपीशिवाय दाखल्यांना मंजुरी मिळत नसल्याने ग्रामपंचायत, नगरपालिका आणि इतर नोंदणी कार्यालयांकडून आलेले पाच हजारांहून अधिक दाखले प्रलंबित राहिले. परिणामी, नागरिकांना जन्म व मृत्यूदाखले वेळेत मिळत नसल्याने शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. शासनाने ओटीपीऐवजी डिजिटल स्वाक्षरीचा पर्याय उपलब्ध करून दिल्याने मंजुरी प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही डिजिटल स्वाक्षरीच्या माध्यमातून दाखल्यांना मंजुरी देता येत असल्याने प्रलंबित दाखल्यांचा मोठा निपटारा करण्यात यश आले आहे; मात्र, या कामासाठी आरोग्य विभागात किमान चार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना सध्या केवळ एकाच कर्मचाऱ्यावर संपूर्ण जबाबदारी आहे. या कर्मचाऱ्याने सुटीच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळेनंतरही लॅपटॉपवर काम करून मोठ्या प्रमाणावर दाखल्यांना मंजुरी दिली आहे.
---
अतिरिक्त कर्मचारी नियुक्ती हवी
मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे इतर आरोग्यविषयक कामांवर परिणाम होत असून, अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्यास जन्म-मृत्यू दाखल्यांच्या मंजुरीच्या प्रक्रियेला आणखी गती मिळेल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com