

swt६४.jpg
५५६२०
आंबोली : मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांचे स्वागत करताना आंबोलीच्या सरपंच सावित्री पालयेकर. सोबत अध्यक्ष प्रमोद कामत व अन्य.
कार्यालयीन वेळेत शिक्षकांना मोबाईल बंदी
आंबोली येथे स्थायी समिती सभा; लवकरच आदेश काढणार
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ६ : सर्व शिक्षकांना कार्यालयीन वेळेत मोबाईल न वापरण्याचे आदेश तत्काळ काढले जतील, असे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी आंबोली ( ता. सावंतवाडी) येथे झालेल्या स्थायी समिती सभेत स्पष्ट केले.
जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी कार्यालयीन वेळेत मोबाईल बंद ठेवावा; केवळ मुख्याध्यापकांचा मोबाईल सुरू ठेवावा, अशी मागणी स्थायी समितीच्या सभेत सदस्य संदेश सावंत यांनी केली. त्यावर सुमेधा पाताडे यांनी "मोबाईल बंद ठेवावा; मात्र प्रशासनाने यापुढे कोणतेही आदेश शिक्षकांना मोबाईलवर पाठवू नयेत, ऑफलाइन आदेश द्यावेत," अशी मागणी केली. त्यावर शिक्षणाधिकारी सविता परब यांनी "केवळ मुख्याध्यापकांनाच मोबाईलवर आदेश दिले जातात. त्यांनाच ऑनलाइन पोषण आहाराची माहिती भरावी लागते," असे सांगितले. यावर अध्यक्ष कामत यांनी सर्व शिक्षकांना कार्यालयीन वेळेत मोबाईल न वापरण्याचे आदेश तत्काळ काढले जातील, असे सांगितले.
यावेळी तुकाराम साईल, रविंद्र खेबुडकर, शीतल पुंड, जयप्रकाश परब, संतोष साटविलकर, प्रितेश राऊळ, रुहिता तांबे, अनुराधा नारकर, संदेश सावंत, रुपेश कानडे, सुप्रिया वालावलकर, सुमेधा पाताडे, नागेश आईर, संदीप गावडे, मनोज रावराणे, डॉ. उदय पाटील आदी उपस्थित होते.
सभेत विविध विभागांतील प्रलंबित प्रश्नांवर सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. स्मार्ट मीटरच्या तक्रारी, शाळांमधील शिक्षकांची कमतरता, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, धोकादायक शाळा इमारती, रस्त्यांची देखभाल, वीजपुरवठा, एसटीचे थांबे, आरोग्य विभागातील मनुष्यबळ, दिव्यांग कर्मचाऱ्यांचे व्हेरिफिकेशन, पदोन्नती व आश्वासित प्रगतीची प्रलंबित प्रकरणे अशा विविध विषयांवर सभेत सविस्तर चर्चा झाली.
सभेच्या प्रारंभीच सुमेधा पाताडे यांनी "स्थायी समिती सभेचे इतिवृत्त सदस्यांना किती दिवस आधी मिळाले पाहिजे?" असा सवाल उपस्थित केला. "इतिवृत्त वेळेत मिळत नसल्यास सदस्यांना विषयांचा अभ्यास करून सभेत प्रभावीपणे मते मांडता येत नाहीत," असा मुद्दा त्यांनी मांडला. यावेळी जयप्रकाश परब यांनी याबाबत कायद्यात उल्लेख नसल्याचे सांगितले. त्यामुळे संदेश सावंत यांनी आक्रमक होत प्रशासनाला धारेवर धरले. यावरून सभेत काही काळ वातावरण तापले होते. अखेर कामत यांनी यापुढील सभेचा अजेंडा आणि इतिवृत्त वेळेत दिले जाईल, असे आश्वासित केले.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील दायित्व संपणाऱ्या रस्त्यांचा प्रश्नही सभेत उपस्थित झाला. दायित्व संपल्यानंतर या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी कोणाची, याबाबत स्पष्ट नियोजन करण्याची मागणी सदस्यांनी केली. रस्ते खराब झाल्यानंतर निधीची प्रतीक्षा करण्यापेक्षा आधीच उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका मांडण्यात आली. आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर नियुक्त करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. जिल्ह्यातील शाळांच्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेण्याची मागणी करण्यात आली. काही शाळांतील छप्पर कोसळले आहे. त्यातील दोषी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले.
बचतगटांच्या तपासणीसाठी ऑडिटरच्या मानधनाचा मुद्दा सौ. पाताडे यांनी सभेत उपस्थित केला. ऑडिटसाठी बचतगटांना सुमारे ११०० रुपये भरावे लागत असल्याचे सांगण्यात आले. ही रक्कम बचतगटांवर टाकण्याऐवजी ''उमेद''च्या माध्यमातून ऑडिटरचे मानधन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच सुकळवाड गावाला ओरोस फिडरमधून विद्युतपुरवठा करण्याची मागणी सौ. पाताडे यांनी केली.
चौकट
विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक समायोजन करा
शिवडाव हायस्कूलमध्ये १४० विद्यार्थी असून केवळ तीन शिक्षक कार्यरत असल्याचा मुद्दा सभेत संदेश सावंत यांनी उपस्थित केला. याचवेळी दुसरीकडे जिल्ह्यात ९३ शिक्षक अतिरिक्त असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे शिक्षकांचे योग्य समायोजन करून ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी श्री. सावंत यांनी केली.
--------------
चौकट
दिव्यांग कर्मचाऱ्यांचे व्हेरिफिकेशन करा
जिल्हा परिषदेत १२७ दिव्यांग कर्मचारी असल्याची माहिती सभेत मांडण्यात आली. खऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांचा सन्मान व त्यांना मिळणारे अधिकार कायम ठेवले पाहिजेत; मात्र चुकीच्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेतला जात असल्यास त्याची तपासणी झाली पाहिजे, अशी भूमिका सदस्यांनी मांडली.सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे व्हेरिफिकेशन करून त्याची माहिती पुढील स्थायी समितीच्या सभेत सादर करावी, अशा सूचना अध्यक्ष कामत यांनी दिल्या.
---------------
चौकट
एका पदासाठी दोघांची नियुक्ती
सावंतवाडी पंचायत समिती सभापतींना वाहनचालक म्हणून दोघांना नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबत संदीप गावडे यांनी सभागृहात माहिती देत, "त्यातील कोणता चालक निश्चित करण्यात आला, याचे आदेश जिल्हा परिषदेने दिलेले नाहीत. मग सध्या असलेला चालक कोणाच्या आदेशावरून काम करीत आहे?" असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर अध्यक्ष कामत यांनी हे चालक कंपनीमार्फत घेण्यात आले आहेत, याबाबतचे निश्चित आदेश काढले जातील, असे सांगितले.
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.