

rat१०p९.jpg-
26O56362
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात लोकमान्य टिळक योगभवनाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. अतुल वैद्य. सोबत मान्यवर.
---
रत्नागिरीत नूतनीकृत योगभवन खुले
डॉ. अतुल वैद्य ः योगाभ्यासासाठी उत्तम सुविधा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : समाजात योगाचा प्रसार होण्यासाठी सुसज्ज योगभवनांची आवश्यकता आहे. या माध्यमातून विद्यार्थी, नागरिक आणि योगसाधकांना नियमित योगाभ्यासासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे, असे रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी सांगितले.
येथील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्राच्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नूतनीकृत योगभवनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. या वेळी कुलगुरू डॉ. वैद्य यांनी योग ही केवळ शारीरिक व्यायामपद्धती नसून भारतीय ज्ञानपरंपरेतील सर्वांगीण जीवनदृष्टी असल्याचे सांगितले. नूतनीकरण करण्यात आलेल्या योगभवनात नियमित निःशुल्क योगवर्ग, योगप्रशिक्षण, प्राणायाम, ध्यानसाधना तसेच विविध योगविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे रत्नागिरी परिसरातील नागरिकांना सातत्यपूर्ण योगाभ्यासासाठी एक सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. येथे दररोज सकाळी ७ ते ८ आणि संध्याकाळी ५.४५ ते ६.४५ या कालावधीत निःशुल्क योग करता येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी, विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ. रोशन अलोने, अधिष्ठाता प्रो. कविता होले, वेदविद्या संका याचे अधिष्ठाता प्रो. हरेकृष्ण अगस्ती, परीक्षा नियंत्रक डॉ. जयवंत चौधरी, रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे आदी उपस्थित होते.