कमी दाबाच्या वीजपुरवठ्याने पांगरीवासीय त्रस्त

कमी दाबाच्या वीजपुरवठ्याने पांगरीवासीय त्रस्त
Published on

पांगरीतील विजेचा प्रश्न ऐरणीवर
पाणीपुरवठा, शेतीवर परिणाम; उपाययोजनेची मागणी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १३ ः महावितरणच्या कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) वीजपुरवठ्यामुळे तालुक्यातील पांगरी गावातील नागरिक आणि शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. या समस्येमुळे गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या कामकाजालाही मोठा फटका बसत असून, या संदर्भात पंचायत समिती सभापतींकडे निवेदन देऊन गावकऱ्यांनी तातडीने मार्ग काढण्याची मागणी केली आहे.
पांगरी परिसरात महावितरणची मुख्य वीजवाहिनी जंगलातून जात असल्यामुळे झाडांच्या फांद्या छाटणे आणि देखभाल करणे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत कसरतीचे ठरत आहे. पावसाळ्यात झाडे पडून तारा तुटण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने गावात अनेक दिवस अंधार असतो. त्यातच सध्या कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पाणीपुरवठा योजनांचे पंप सुरळीत सुरू राहत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. सध्या पांगरी येथील कोंडवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड गावातून ‘थ्री-फेज’ लाईनद्वारे वीजपुरवठा केला जात आहे. हा वीजपुरवठा पूर्णक्षमतेने व विनाअडथळा व्हावा यासाठी जंगलाऐवजी मोकळ्या रस्त्यावरून नवी वीजवाहिनी टाकणे गरजेचे आहे. यामुळे भविष्यातील दुरुस्तीची कामेही सोपी होतील. या कामाचे तत्काळ सर्वेक्षण करून जिल्हा नियोजन आराखड्यात (डीपीडीसी) आवश्यक निधीची तरतूद करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
---
कोट १
वीजपुरवठ्याच्या समस्येबाबत पंचायत समिती सभापतींची भेट घेऊन निवेदन दिले आहे. सभापतींनी याची दखल घेतली असून, पालकमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून प्रश्नाचा सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासनही दिले आहे.
- सुनील म्हादे, प्रशासक, पांगरी ग्रामपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com