

सिंधुदुर्ग किल्ल्यावर ''थ्री-डी लेझर शो'' उभारावा
प्रमोद जठार : ‘नाईट टुरिझम’ ला चालना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १६ : रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या ऐतिहासिक आणि पर्यटन वैभवाचे केंद्र असलेल्या सिंधुदुर्ग किल्ला तसेच राजकोट किनारपट्टी परिसरात ‘नाईट टुरिझम’ला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी ‘बीओटी’ तत्त्वावर अत्याधुनिक लाईट, साऊंड व थ्री डी लेझर मॅपिंग शो विकसित करावा, अशी मागणी विधानपरिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे. या भव्य प्रकल्पासाठी दहा कोटींचा निधी मंजूर करण्यात यावा, असा सविस्तर प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे.
सध्या सिंधुदुर्ग किल्ल्यास भेट देणारे पर्यटक दिवसभर स्कुबा डायव्हिंग, बोट सफारी, वॉटर स्पोर्ट्स आणि किनारपट्टीचा आनंद घेतात. मात्र, सूर्यास्तानंतर या परिसरात कोणत्याही आकर्षक उपक्रमांची सोय नसल्याने पर्यटकांना परत जावे लागते. परिणामी स्थानिक हॉटेल, होमस्टे, रेस्टॉरंट आणि लहान व्यवसायिकांना रात्रीच्या पर्यटनाचा अपेक्षित लाभ मिळत नाही.
या पार्श्वभूमीवर, जर येथे जागतिक दर्जाचा थ्री डी प्रोजेक्शन मॅपिंग आणि लाइट अँड साऊंड शो सुरू झाला, तर पर्यटक संध्याकाळनंतरही मालवणमध्ये मुक्कामी थांबतील. यामुळे पर्यटकांचा स्टे वाढून स्थानिक पर्यटनाला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास प्रस्तावात व्यक्त केला आहे.
या प्रकल्पाची मूळ संकल्पना रविकिरण तोरसकर यांनी यापूर्वी आमदार प्रमोद जठार यांच्याकडे मांडली होती. त्या संकल्पनेची दखल घेत आमदार जठार यांनी राजकोट परिसराला भेट देऊन आपल्या आमदारकीचा पहिला एक कोटी रुपयांचा निधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करत या कामाला सुरुवात केली होती.
आता हीच संकल्पना अधिक विस्तारित करून राजकोट किनारपट्टीसह संपूर्ण सिंधुदुर्ग किल्ला परिसर यात समाविष्ट केला आहे. या भव्य विस्तारासाठी अधिक निधीची आवश्यकता असल्याने मुख्यमंत्र्यांकडे १० कोटी रुपयांची मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, शिवरायांची दूरदृष्टी आणि मराठा आरमाराचा देदीप्यमान इतिहास थ्री डी लेझर मॅपिंगद्वारे सादर केला जाईल. समुद्र, सिंधुदुर्ग किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचा एकत्रित वापर करून एक अद्वितीय दृश्य अनुभव तयार केला जाईल. देश-विदेशातील पर्यटकांच्या सोयीसाठी हा शो मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये उपलब्ध असेल. अत्याधुनिक, ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्पाची उभारणी केली जाईल.
चौकट
१० कोटींच्या निधीचा प्रस्ताव
हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर राबविल्यास शासनावर कोणताही थेट आर्थिक वा देखभालीचा भार पडणार नाही. खासगी संस्थेमार्फत या प्रकल्पाची उभारणी, संचालन व देखभाल केली जाईल आणि ठराविक कालावधीनंतर तो शासनाकडे हस्तांतरित होईल. यासाठी पर्यटन विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांची संयुक्त समिती स्थापन करून तात्काळ सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा व निविदा प्रक्रिया राबवून १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी विनंती आमदार जठार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.