टोल कंत्राटात सत्ताधाऱ्यांची भागीदारी

टोल कंत्राटात सत्ताधाऱ्यांची भागीदारी
Published on

57961

टोल कंत्राटात सत्ताधाऱ्यांची भागीदारी

उपरकरांचा आरोप; सिंधुदुर्गला टोलमाफी न दिल्‍यास आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १८ : ओसरगाव टोल नाक्‍यावर सिंधुदुर्गातील वाहनांना टोलमाफी मिळेल, अशी ग्वाही सत्ताधाऱ्यांनी दिली होती. मात्र, नव्याने टोल ठेकेदार निश्चित होऊनही याबाबत त्यांच्याकडून कोणतेही स्पष्ट वक्तव्य आलेले नाही. त्यामुळे या टोल कंत्राटामध्ये सत्ताधाऱ्यांची भागीदारी असावी, असा संशय सिंधुदुर्गातील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे, असा आरोप शिवसेना नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.
कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्गातील वाहनांना टोलमाफी आहे की नाही, याबाबत जनतेमध्ये संभ्रम आहे. तांत्रिक बाबी पूर्ण होताच पुढील दोन ते तीन दिवसांत हा टोल नाका कार्यान्वित होणार आहे. त्‍यावेळी टोलमाफीचे सत्‍य बाहेर येणार आहे. सिंधुदुर्गातील वाहनांना टोलमाफी मिळेल, अशी ग्वाही सत्ताधाऱ्यांनी सिंधुदुर्गवासीयांना दिली होती. त्यामुळे आता त्‍याची अंमलबजावणी व्हायला हवी.
-----
आरोग्यसेवा ढासळली
सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा बळकट करण्याची ग्‍वाही सत्ताधाऱ्यांनी दिली होती. मात्र, कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तीनही तालुक्यांमधील आरोग्यसेवा ढासळली आहे. रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता असल्याने नागरिकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून त्यातून त्यांच्यावर मोठा आर्थिक भुर्दंड पडत आहे. जिल्ह्यातील राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग तसेच ग्रामीण रस्ते खड्ड्यांमध्ये गेले आहेत. रस्त्यांची कामे निकृष्ट होण्यामागे आणि रखडण्यामागे ठेकेदारीतील कथित टक्केवारीचे राजकारण कारणीभूत असल्याचा आरोप श्री.उपरकर यांनी केला.
-----
आधी कमिशन नंतर कामे!
स्त्यांच्या कामांसाठी १० टक्के, तर बंदर विभागातील कामांसाठी १५ टक्के कमिशन द्यावे लागत असल्याचा आरोप उपरकर यांनी केला. एवढे कमिशन दिले तरच कामे केली जातात, अन्यथा कामे बंद ठेवली जातात, असेही ते म्हणाले. आता १५ टक्के कमिशन निश्चित झाल्यानंतर बंदर विभागातील जेटीची कामे मार्गी लागणार आहेत, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.
---
कोट
यापूर्वी ओसरगाव नाक्यावर टोलविरोधात अनेक आंदोलने झाली आहेत. त्‍यात आताच्या सत्ताधाऱ्यांचाही सहभाग होता. आता नव्याने टोल ठेकेदार निश्चित झाला आहे. त्‍यानंतर टोलमाफीबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट नाही. मात्र, टोलमाफी झाली नाही तर सिंधुदुर्गातील जनता पेटून उठेल. टोल विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू.
- परशुराम उपरकर, शिवसेना नेते, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com