

58262
‘ताज’ उभारणीच्या निर्णयाचे जामसंडेत स्वागत
देवगड, ता. १९ ः जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर भागात बहुचर्चित ताज हॉटेल उभारणीच्या अनुषंगाने शासन स्तरावर आवश्यक निर्णय झाल्याने येथील तालुका भाजपतर्फे जामसंडे येथील पक्ष कार्यालयासमोर फटाके फोडून आनंद व्यक्त केला. जिल्ह्यात पंचतारांकित हॉटेल उभारणीमुळे स्थानिक पर्यटन वाढीला चालना मिळून यामुळे आणखीही काही गुंतवणूकदार जिल्ह्यात येतील, असा विश्वास भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
यावेळी भाजपचे देवगड मंडल अध्यक्ष सदाशिव भुजबळ, प्रकाश गोगटे, वैभव करंगुटकर, योगेश चांदोस्कर, दयानंद पाटील, मकरंद जोशी, नरेश डामरी, उल्हास मणचेकर, शरद ठुकरूल यांच्यासह अन्य उपस्थित होते. श्री. साटम म्हणाले की, पर्यटनाच्या दृष्टीने हे मोठे पाऊल उचलले गेले आहे. या निर्णयाचे जिल्हावासीय म्हणून स्वागत आहे. यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रोजगार निर्मिती होईल. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिकांना याचा फायदा होईल. यामुळे आणखीही गुंतवणूकदार येतील, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नीतेश राणे यांचे अभिनंदन केले.