चिपळूणमध्ये पाइपलाइन गॅसला अल्प प्रतिसाद

चिपळूणमध्ये पाइपलाइन गॅसला अल्प प्रतिसाद
Published on

59141

पाइपलाइन गॅसला अल्प प्रतिसाद
चिपळूणमध्ये जोडणीची संख्या नगण्य; जाळे विस्तारण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः शहरात घरगुती वापरासाठी एलपीजी गॅस सिलिंडर सहज उपलब्ध होत असल्यामुळे पाइपलाइनद्वारे मिळणाऱ्या गॅसकडे (पीएनजी) नागरिकांचा कल अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही. काही महिन्यांपूर्वी अवघ्या ३५० ग्राहकांनी पाइपलाइन गॅसची जोडणी घेतली होती. आता ही संख्या एक हजाराच्या पार गेली असली, तरी चिपळूण शहरातील ४० हजारांहून अधिक कुटुंबांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे.
अमेरिका-इराक युद्धाच्या काळात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी चिपळूणमधील नागरिकांनाही तीव्र अडचणींचा सामना करावा लागला होता. गॅसच्या उपलब्धतेबाबतची अनिश्चितता आणि वाढती मागणी यामुळे ग्राहकांचे हाल झाले. या पार्श्वभूमीवर पाइपलाइनद्वारे घरगुती गॅस पुरवठा करण्याच्या योजनेला चालना देण्याची गरज अधोरेखित झाली होती.
पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित गॅस कंपनीला चिपळूण शहरात पाइपलाइन गॅसचा पुरवठा वेगाने सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शहरातील कनेक्शनच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली. पूर्वी केवळ ३५० च्या आसपास असलेली ग्राहकसंख्या आता एक हजारावर पोहोचली आहे. सध्या शहरातील रॉयल नगर, मार्कंडी, कावीळतळी, बहादूरशेख नाका, शंकरवाडी आणि एकतानगर या परिसरांतील नागरिकांनी पाइपलाइन गॅसची जोडणी घेतली आहे. मात्र, शहराचा बहुतांश भाग अद्याप या सुविधेपासून वंचित असल्याने पाइपलाइन जाळ्याचा विस्तार करण्याची तातडीची गरज आहे.
चिपळूणमध्ये ४० हजारांहून अधिक कुटुंबे वास्तव्यास असताना पाइपलाइन गॅसचे ग्राहक अद्याप अवघे एक हजारच आहेत. त्यामुळे शहरातील उर्वरित भागात पाइपलाइनचे जाळे विस्तारून नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. भविष्यात पुन्हा गॅस टंचाई निर्माण झाल्यास ही व्यवस्था एक सक्षम आणि सातत्यपूर्ण पर्याय ठरू शकते. यासाठी प्रशासन आणि संबंधित कंपनीने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

चौकट १
पाइपलाइन गॅसचे फायदे
* पाइपलाइन गॅसमुळे सिलिंडरची नोंदणी करणे आणि वितरणासाठी वाट पाहण्याची गरज नाही
* गॅस अचानक संपेल या भीतीपोटी घरात अतिरिक्त सिलिंडर साठवून ठेवावा लागत नाही
* थेट पुरवठा होत असल्याने वजनदार सिलिंडरची वाहतूक आणि स्वयंपाकघरातील हाताळणीवर निर्बंध
* गॅस मीटरद्वारे मोजमाप होत असल्याने ग्राहकांना त्यांनी जितका गॅस वापरला आहे, तितकेच बिल भरावे लागते.

कोट १
गॅस जोडणीची मागणी आल्यानंतर आम्ही ग्राहकांना प्रतीक्षा यादीत न ठेवता तत्काळ जोडणी देण्याचा प्रयत्न करतो. ग्राहकांना दर्जेदार व अखंडित सेवा देणे हेच आमचे ध्येय आहे. त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन सिलिंडर बुकिंगच्या कटकटीतून मुक्त व्हावे.
- संतोष चव्हाण, महानगर गॅस, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com