राजापूर : मल्लिकार्जुन मंदिराला प्राचीन दगडांची परंपरा

राजापूर : मल्लिकार्जुन मंदिराला प्राचीन दगडांची परंपरा
Published on

श्रावण विशेष - लोगो
rat२३p१०.jpg-
५९१४२
राजापूर ः प्रिदांवनमधील श्रीदेव मल्लिकार्जुन मंदीर.
-rat२३p११.jpg-
५९१४३
आकर्षक सभागृह
rat२३p१२.jpg-
५९१४४
वैशिष्ट्यपूर्ण गाभारा
-----------
मल्लिकार्जुन मंदिराला प्राचीन दगडांची परंपरा
प्रिदांवनमधील वैशिष्ट्यपूर्ण मंदिर; काळ्या बेसाल्टचा दगडी गाभारा
राजेंद्र बाईत ः सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २३ : तालुक्यातील प्रिंदावन येथील श्री देव मल्लिकार्जुन मंदिर हे प्राचीन दगडी मंदिर परंपरा, कोकणी लाकडी स्थापत्य आणि उत्तरकालीन स्टुको अलंकरण यांचा सुंदर संगम असलेले महत्वाचे देवस्थान आहे. मराठ्यांचे शेवटचे सरसेनापती बापू गोखले यांचे जन्मगाव असल्याने ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या प्रिंदावणमधील श्री देव मल्लिकार्जुन मंदिराचा केवळ एक प्राचीन शिवालय म्हणून नावलौकीक नाही. तर, काळ्या बेसाल्टच्या दगडी गाभार्‍यापासून कोकणी लाकडी स्थापत्यापर्यंत आणि पुढे चुन्याच्या गिलाव्यावर साकारलेल्या स्टुको शिखरापर्यंत झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य अन् वास्तुविकासाचा जिवंत दस्तऐवज म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
श्रीदेव मल्लिकार्जुन मंदिराचा काळ्या बेसाल्ट दगडातील प्राचीन वाटणारा गाभारा असून त्यामध्ये काळ्या पाषाणाचे रेखीव शिवलिंग आहे. गाभाऱ्याच्या सुमारे तीन फूट रुंदीच्या भिंती आहे. गाभाऱ्याच्या तीन बाजूंना प्रकाश व वायुवीजनासाठी झरोके असून त्यांच्या बाहेरील भागात जाळीसदृश रचना दिसून येते. दगडी फरसबंदी, कीर्तीमुख शैली असून गाभाऱ्यात जाण्यासाठी खाली उतराव्या लागणाऱ्या पायऱ्या ही स्थापत्यवैशिष्ट्ये विशेष लक्षवेधी आहेत. गर्भगृह आणि सभामंडप यांना जोडणार्‍या अंतराळात मोठा आणि रेखीव नंदी आहे.
गळ्यातील माळ, अलंकार, देहाची ठेवण आणि शिल्पातील प्रमाण यामुळे नंदीचे शिल्प विशेष लक्षवेधी ठरते. मंदिर परिसरातील दीपमाळेजवळील दुसरा नंदीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. गाभाऱ्याच्या पुढील विस्तीर्ण लाकडी सभामंडपात कोकणी लाकडी मंदिर स्थापत्याची छाप जाणवते. मंदिर परिसरात घोड्यावर स्वार होऊन युद्ध करणाऱ्या वीराचे चित्रण असलेली वीरगळ असून ती झिजलेल्या स्थितीमध्ये आहे.
श्रीदेव मल्लिकार्जुन मंदिराच्या समोर श्रीदेवी महालक्ष्मीचे मंदिर असून या मंदिराच्या लाकडी तुळ्यांवरील नक्षीकाम, घोडेस्वार, मुखवटे आणि हाताच्या आकृती असलेली लाकडी निशाणे विशेष लक्षवेधी आहेत. ही निशाणे कोकणातील ग्रामदैवत परंपरा, वीरसंस्कृती, उत्सव-परंपरा, नवस किंवा देवतेच्या प्रतीकात्मक उपासनेशी संबंधित असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चौकट १
वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्याचा महत्वाचा दुवा ‘स्टुको कळस’
श्रीदेव मल्लीकार्जुन मंदिराच्या बांधकामातून अनेक वैशिष्ट्यांपैकी एक असलेले वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यावर उभारलेला चुन्याच्या गिलाव्यावर केलेल्या स्टुको अलंकरणाने सजलेला कळस. खाली काळ्या दगडाची भक्कम वास्तू आणि त्यावर देवतांच्या, अलंकरणीय घटकांच्या व लहान शिखरांच्या उठावदार रचनांनी सजलेला कळस आहे. यामुळे मंदिराच्या वास्तूत विविध कालखंडांची सांगड दिसून येत असून स्टुको कळस वैशिट्यपूर्ण स्थापत्याचा महत्वाचा दुवा मानला जात आहे. स्टुको म्हणजे दगडात प्रत्यक्ष शिल्प कोरण्याऐवजी चुनाधारित गिलाव्याच्या थरांवर उठावदार शिल्पे घडविण्याची पद्धत. या माध्यमातून देवदेवता, प्राणी, पक्षी, पुष्पवल्ली, कमानी, लहान शिखरे आणि विविध अलंकरणीय घटक तुलनेने कमी वजनात साकारता येतात.

कोट १
प्राचीन दगडी गाभारा, स्टुको कळस अन् बहुकालीन स्थापत्यप्रवास असे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम प्रिंदावण येथील श्रीदेव मल्लिकार्जुन मंदिरामध्ये पाहायला मिळते. मंदिरातील लाकडी नक्षीकामात मराठा-पेशवेकालीन प्रभाव जाणवत असला तरी त्याचा निश्‍चित कालखंड ठरविण्यासाठी स्वतंत्र शैलीगत व तांत्रिक अभ्यास होणे गरजेचे आहे. मंदिराचे शास्त्रीय दस्तऐवजीकरण, शिल्पांचे छायाचित्रण, स्थापत्यनकाशे, लाकडी भागांचे वय व शैलीचा अभ्यास, स्टुको कळसातील चुन्याच्या थरांचे परीक्षण आणि स्थानिक मौखिक परंपरांचे संकलन होवून अभ्यास झाल्यास या मंदिराचा इतिहास आणि वैशिट्यपूर्ण स्थापत्य शैली अधिक स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
- विनोद पवार, अभ्यासक

चौकट २
स्टुको शिखर म्हणजे काय?
‘स्टुको’ म्हणजे दगडावर थेट कोरीव काम न करता चुना, वाळू आणि विशिष्ट नैसर्गिक घटकांचे मिश्रण (गिलावा) वापरून तयार केलेले शिल्पकाम होय. या गिलाव्याच्या साहाय्याने मंदिराच्या शिखरावर (कळसावर) वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती, कमानी आणि आकृत्या घडवल्या जातात, त्याला ‘स्टुको शिखर’ म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com