अतिक्रमण हटाव मोहीम गणेशोत्सवानंतर

अतिक्रमण हटाव मोहीम गणेशोत्सवानंतर
Published on

गणेशोत्सवानंतर अतिक्रमण हटाव मोहीम
पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय ; कोकणनगरातील गाळ्यांवर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः रत्नागिरी शहरातील फूटपाथ आणि रस्त्यांवरील तात्पुरती अतिक्रमणे काढण्याची मोहीम आता गणेशोत्सवानंतर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष, नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत यावर एकमत झाले.
शहरातील ज्या ठिकाणी विकासकामे प्रस्तावित आहेत, तेथील खोके, टपऱ्या आणि हातगाड्या हटवल्या जाणार आहेत. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी नगरपरिषदेने दुकानदारांना स्वतःहून अतिक्रमणे हटवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेकांनी टपऱ्या हलवल्या, मात्र प्रतिसाद न देणाऱ्या दुकानदारांच्या टपऱ्या जप्त करण्यात आल्या. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतील निर्णयानुसार पोलीस बंदोबस्तात सलग तीन दिवस ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान टपरीधारक व फेरीवाल्यांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेत कारवाई थांबवण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या विशेष बैठकीत, गणेशोत्सवाचा सण लक्षात घेता ही मोहीम सण संपेपर्यंत स्थगित ठेवून त्यानंतर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत कोकणनगर येथील गाळे बांधकामाच्या वादावरही सविस्तर चर्चा झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक केतन शेट्ये यांनी याप्रकरणी भूमिका मांडली. या विषयावर जोपर्यंत योग्य व अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत कोकणनगरात कोणत्याही नव्या कामाला हात लावला जाणार नाही, असाही निर्णय घेण्यात आला.

विकासकांच्या ठिकाणी तडजोड नाही
विकासकामे प्रस्तावित असलेल्या ठिकाणी अतिक्रमणाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम पवित्रा प्रशासनाने घेतला आहे.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com