

पाणीसाठा घटल्याने रब्बी हंगामाची चिंता
पावसाच्या खंडामुळे सिंचनावर परिणाम; रब्बीचे क्षेत्र किती ? याकडे लक्ष
चिपळूण, ता. ५ : पावसाळ्यातील दमदार सरीनंतर सप्टेंबरमध्ये पावसाने दिलेली दीर्घ उघडीप आता चिपळूणच्या शेतीसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. भातपिकाच्या अंतिम टप्प्यात पावसाअभावी नुकसान होत असतानाच जमिनीतील ओलावा आणि विहिरींच्या पाणीपातळीवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भातकापणीनंतर घेतल्या जाणाऱ्या रब्बी पिकांचे क्षेत्र यंदा किती राहणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
चिपळूण तालुक्यात ६ हजार ७३०.९४ हेक्टर क्षेत्र भाताखाली आहे. यंदा पावसाच्या खंडामुळे भातपिकाला दाणे भरणी, फुलोरा आणि पोटरीच्या अवस्थेत फटका बसल्याचे कृषीक्षेत्रातून सांगण्यात आले आहे. त्यामुळे खरिपानंतर उपलब्ध ओलावा आणि पाणीसाठा यावर रब्बीचे पुढील गणित अवलंबून राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या उपलब्ध अधिकृत रब्बी पेरणी अहवालानुसार २०२५-२६ मध्ये मुख्य रब्बी पिकांसाठी सरासरी ५ हजार २३३ हेक्टर क्षेत्र होते तर प्रत्यक्ष पेरणी ४ हजार ७२ हेक्टरवर झाली. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत सुमारे ७८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली.
चिपळूणमध्ये रब्बी हंगामात वाल, कुळीथ, मूग, पावटा, उडीद, चवळी तसेच भाजीपाला अशी पिके घेतली जातात. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीत जमिनीतील ओलावा पुरेसा राहिल्यास पेरणी शक्य होते; मात्र विहिरी, कूपनलिका आणि लहान पाणीसाठ्यांवर आधारित क्षेत्रात पाण्याची उपलब्धता निर्णायक ठरते. चिपळूण तालुक्यातील ८५ टक्क्यांहून अधिक भूभाग डोंगराळ आहे. वाशिष्ठी आणि जगबुडी या जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून, डोंगराळ भौगोलिक रचनेमुळे पावसाचे पाणी वेगाने वाहून जाण्याचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे पाऊस झाल्याचे प्रमाण आणि त्यातून भूजलाचे प्रत्यक्ष पुनर्भरण झालेले प्रमाण यामध्ये फरक राहतो.
सध्या वाशिष्ठी, शिवनदी आणि तालुक्यातील लहान-मोठ्या नद्यांची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे रब्बीसाठी नदीतील प्रवाहापेक्षा नदीकाठच्या विहिरी, कूपनलिका आणि जमिनीतील ओलावा किती टिकतो, हे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. तालुक्यांमध्ये पावसाचा अभाव, पीकनुकसान आणि पाणीटंचाईची परिस्थिती असल्याचा मुद्दा सध्या उपस्थित करण्यात आला आहे. चिपळूणचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणीही पुढे आली आहे.
कोट
रब्बीचे क्षेत्र ठरवताना केवळ पाऊस किती झाला यापेक्षा जमिनीत किती ओलावा शिल्लक आहे आणि विहिरींची पाणीपातळी किती आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. उपलब्ध पाणी मर्यादित असल्यास कमी कालावधीची आणि कमी पाण्यात येणारी पिके घेण्यावर भर द्यावा.
- रणजित शिंदे, कृषीतज्ज्ञ, कोळकेवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.