
खटला निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम
लोगो-------
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण
खटला निकाली काढण्यास कालबद्ध कार्यक्रम
पुणे, ता. ८ : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या खटला वेळेत निकाली निघावा, यासाठी न्यायालयाने आता कालबद्ध कार्यक्रम (टार्इम बॉण्ड प्रोग्रॉम) निश्चित केला आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये या खटल्याच्या सुनावणीसाठी ठराविक तारखा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे खटला लवकर निकाली निघण्यास मदत होणार आहे.
मार्चमध्ये १६, १७ आणि १८, तर १० ते २१ एप्रिलदरम्यान या दिवशी या खटल्याची रोज सुनावणी होणार आहे. या तारखांना केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि आरोपींच्या वकिलांना त्यांची बाजू मांडावी लागेल. त्यामुळे या दरम्यान साक्षी पुरावे आणि उलटतपासणीचे कामकाज पूर्ण होर्इल. तसेच, झाल्यास खटला पुढील दोन महिन्यांत निकाली लागण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात ‘सनातन’ संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाचही आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
काय आहे आताची स्थिती?
खटला सुरू झाल्यापासून आतापर्यंत ‘सीबीआय’कडून एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. त्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच आणि गुन्ह्याच्या संबंधित इतरांची साक्ष घेण्यात आली. आता पुढील तारखांना या गुन्ह्याशी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची साक्ष घेण्यात येणार आहे. या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या पुणे महापालिकेच्या साफसफार्इ विभागातील कर्मचाऱ्याचीही साक्ष नोंदविण्यात आली. साक्षीपुरावे झाल्यावर खटल्यावर निकाल होणार आहे.
खटल्याचे कामकाज चालविण्यासाठी तारखा निश्चित झाल्याने साक्षी-पुराव्याचे कामकाज वेळेत संपेल. त्यामुळे खटला लवकर निकाली काढण्यास मदत होर्इल. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात आला आहे.
- प्रकाश सूर्यवंशी, विशेष सरकारी वकील, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)
उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नसतानाही सुमारे अडीच वर्षे या खटल्याची सुनावणी झाली नाही. मात्र, आता खटला आरोपींना जामीन मिळण्याच्या स्थितीत आल्यावर सुनावणीची घार्इ केली जात आहे. निश्चित तारखांनुसार खटला चालविण्याबाबत आमची काहीच हरकत नाही. खटला चालविण्यास आम्ही तयार आहोत.
- ॲड. प्रकाश साळशिंगीकर, आरोपींचे वकील