‘फॉर्च्यून इंडिया’च्या यादीत पु. ना. गाडगीळ आणि सन्स
‘फॉर्च्युन इंडिया’च्या यादीत
पु. ना. गाडगीळ आणि सन्स
गुणवत्तेच्या आधारे सलग तिसऱ्यांदा पटकावले स्थान
पुणे, ता. ११ : देशाच्या रिटेल क्षेत्रात परंपरा, विश्वास आणि गुणवत्ता यांच्या आधारे प्रख्यात ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’ कंपनीने ‘फॉर्च्युन ५०० इंडिया’मध्ये २८९ वा क्रमांक मिळवत सलग तिसऱ्यांदा स्थान मिळविले आहे.
सलग मिळालेल्या मानांकनामुळे पु. ना. गाडगीळ आणि सन्सची आर्थिक स्थिती, व्यवस्थापनाची दूरदृष्टी आणि ग्राहकांचा अविचल विश्वास याची ठाम पुष्टी मिळाली आहे. सुमारे १९३ वर्षांच्या परंपरेचा वारसा जपत कंपनीने सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या क्षेत्रात सातत्याने आधुनिक संकल्पना, पारदर्शकता आणि उत्कृष्ट ग्राहकसेवा यांचा मिलाफ साधला आहे. देशभरातील ग्राहकांमध्ये निर्माण झालेली विश्वासाची परंपरा कंपनीच्या यशामागील महत्त्वाचा घटक ठरली आहे.
या कामगिरीबद्दल भावना व्यक्त करताना कंपनीचे मुख्य प्रवर्तक अजित गाडगीळ म्हणाले, ‘हे यश आमच्या ग्राहक, कर्मचारी, भागीदार, पुरवठादार आणि समर्थकांचे आहे. ग्राहकांच्या विश्वासामुळेच पु. ना. गाडगीळ आणि सन्स आज भारतातील प्रभावी आणि प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये गणली जाते.’ पु. ना. गाडगीळ आणि सन्सची ही तिहेरी नोंद केवळ कंपनीसाठी नव्हे, तर पुण्याच्या व्यावसायिक परंपरेसाठीही अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी नमूद केले.

