esakal | एसटी कामगारांचे उद्या  "आक्रोश' आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Tomorrow ST Workers Agitation In Ratnagiri

एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. पगाराची सात तारीख उलटल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत. आपली दिवाळी अंधारात घालवावी लागणार असल्याची खंत त्यांना वाटत आहे. मानसिक दृष्ट्या खचले आहेत, असे शिंदे म्हणाले.

एसटी कामगारांचे उद्या  "आक्रोश' आंदोलन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्‍न कर्मचाऱ्यांसमोर आहे. किमान दहा ते बारा वेळा भेटीगाठी घेऊनही महामंडळ व राज्य शासनाने काहीही केले नाही. त्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सर्व सदस्य सोमवारी (ता. 9) घरासमोर कुटुंबियांसह आक्रोश आंदोलन करणार आहेत. पगार न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा संघटनेचे राज्याचे अध्यक्ष संदीप शिंदे व सचिव हनुमंत ताटे यांनी दिला आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. पगाराची सात तारीख उलटल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत. आपली दिवाळी अंधारात घालवावी लागणार असल्याची खंत त्यांना वाटत आहे. मानसिक दृष्ट्या खचले आहेत, असे शिंदे म्हणाले. या सर्व कुटुंबांची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे आम्ही नक्की तोडगा काढून पगार देण्यासाठी बांधिल आहोत, असेही त्यांनी सांगितले. 

एसटीचे उत्पन्न घटल्याने वेतन मिळत नसल्याने अनेक कामगारांवर घर चालवण्यासाठी भाजीपाला विक्री, भाड्याने वाहन चालवण्याची वेळ आली. अनेकांनी कौटुंबिक अडचण, लग्नसमारंभ, घरबांधणी अशा विविध कारणांसाठी कर्ज घेतले आहे. मुळातच कमी वेतन असताना अशा कर्जामुळे कोरोना काळात हप्ते फेडणे अवघड झाले. यामुळेच आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. 

वेतन नसल्याने घर कसे चालवू, भाजीपाला, धान्य नाही, काय करू असे अनेक फोन रात्री अपरात्रीसुद्धा येतात. मान्यताप्राप्त संघटना म्हणून आम्ही त्यांची जबाबदारी घेत आहोत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. वेतन कायद्याचा भंग केला म्हणून महामंडळाला न्यायालयात खेचणार आहोत. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना चांगले पगार, दिवाळी भेट दिली जाते. मग आम्ही काय परदेशात राहतो का, महाराष्ट्रासाठी काम करतोय. आम्हालाही हे लाभ मिळालेच पाहिजेत, असे शिंदे यांनी ठणकावून सांगितले. 

कोरोना योद्धे उपेक्षित 
"बहुजन हिताय बहुजन सुखाय' असे ब्रीद घेऊन काम करणारे महामंडळ आहे. पण 12 तासापेक्षा जास्त ड्युटी करून वेतन मिळत नसल्याबद्दल कामगारांमध्ये असंतोष आहे. कोरोना महामारीच्या लॉकडाऊन कालावधीत एसटीने कामगार, मजूर सोडले. विद्यार्थ्यांना आणले. अनेक कर्मचारी शहीद झाले. एसटी कर्मचारी कोरोना योद्धे आहेत पण तीन महिने पगार दिला जात नाही, अशी खंत अनेकजण मांडत आहेत. 
 

loading image