esakal | समुद्र किनारी प्रेमाला येईल भरती ; स्पेशल भेटीसाठी कोकणातली खास ठिकाणं

बोलून बातमी शोधा

tomorrow's valentine day special to meet with partner in this place in kokan}

गावखडीतील शांत किनार्‍यावरील सुरुचे बन गुजगोष्टी, गप्पांसाठी मन लुभावणारेच ठरु शकते.

समुद्र किनारी प्रेमाला येईल भरती ; स्पेशल भेटीसाठी कोकणातली खास ठिकाणं
sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : प्रेमाचा दिवस म्हणून ‘व्हेलेंटाईन डे’ओळखला जातो. या दिवशी तरुणाईचा उत्साह द्विगुणित होतो. हा आनंद साजरा करण्यासाठी रत्नागिरीतील तरुण-तरुणींचा सर्वाधिक कल हा किनार्‍यांकडे असतो. शहराजवळील भाट्ये, मांडवी, आरे-वारे, गणपतीपुळे हे बीच अनेकांना खुणावताना दिसतात. गावखडीतील शांत किनार्‍यावरील सुरुचे बन गुजगोष्टी, गप्पांसाठी मन लुभावणारेच ठरु शकते.

प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून अनेक तरुण-तरुणी 14 फेब्रुवारीची प्रतिक्षा करत असतात. यंदा कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत, तरीही हा दिवस साजरा करण्यासाठी अनेकांनी आराखडे तयार केलेच आहेत. गतवर्षी टाळेबंदीमुळे रखडलेले विवाह गेल्या दोन महिन्यात पूर्ण झाले. त्यामुळे प्रेमाच्या सुरवातीचा हा दिवस साजरा करण्यासाठी ही जोडपीही तेवढीच उत्सूक असतात. सकाळी बाहेर पडलेली तरुणाई दिवसभर किनार्‍यांवर फिरण्याचा आनंद घेत दुपारची जेवणं करुन पुन्हा सुर्यास्ताची मजा घेण्यासाठी बाहेर पडतात. बहूतांश तरुण-तरुणी सायंकाळी किनार्‍यावरुन सुर्यास्त पाहण्यासाठी गर्दी करतात. 

हेही वाचा -  भावाला केलेला नंतरचा कॉल उचलला डॉक्टरांनी ; जिगरी दोस्तांची ती सफर ठरली शेवटची 

किनार्‍यावरील भेळ-पुरी, नारळ पाणी यासह घोडागाडीतून भविष्यातील स्वप्नं पाहत असतात. रत्नागिरी शहरापासून काही अंतरावर असलेला रत्नदुर्ग किल्ला, मांडवी किनारा, सुरुचे बन असलेला भाट्ये किनारा, झुंजूमुंजू वार्‍याचा आनंद घेण्यासाठी गणपतीपुळे मार्गावरील आरे-वारे सनसेट पॉइंट तरुणाईला खुणावतोय. गणपतीपुळे मंदिरातील श्रींचे दर्शन घेऊन जोडीदारांबरोबर किनार्‍यावर सुरु असलेल्या वॉटरस्पोर्टचा आनंद घेता येऊ शकतो.

पुरातत्त्व विभागाकडून पावस येथील पूर्णगड किल्ल्याचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. तेथून नयनरम्य किनारा, निसर्ग सौदर्य पाहता येऊ शकतो. किल्ले, किनारे यासह रत्नागिरी शहरातील थिबा पॉइंट येथील गार्डनही फिरण्यासाठी चांगला स्पॉट ठरु शकतो. भाट्ये खाडीतून चिंचखरी पर्यंत असलेली फेरीबोटीतून फिरण्याची व्यवस्था येथील लोकांकडून करण्यात आली आहे. दोन तासांचा हा प्रवास आनंददायी ठरतो. प्रेम व्यक्त करण्याचा आणि भावी आयुष्याची गुंफण करण्याचा हा दिवस तेवढाच मंगलमय करण्यासाठी रत्नागिरीतील किनारे सर्वांची प्रतिक्षा करत आहेत.

संपादन - स्नेहल कदम