esakal | रत्नागिरीत रुग्णालय ऑक्‍सिजनबाबत गॅसवरच; जिल्ह्यात पाच टनच शिल्लक

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीत रुग्णालय ऑक्‍सिजनबाबत गॅसवरच; जिल्ह्यात पाच टनच शिल्लक
रत्नागिरीत रुग्णालय ऑक्‍सिजनबाबत गॅसवरच; जिल्ह्यात पाच टनच शिल्लक
sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयात पुढील २४ तास पुरेल एवढाच पाच टन ऑक्‍सिजन शिल्लक आहे. लोटे येथे १५ टनावर ऑक्‍सिजन उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच जिल्हा ऑक्‍सिजनबाबत गॅसवर असल्याची स्थिती आहे. अडीचशे ऑक्‍सिजन बेडवरील रुग्ण जिल्हा रुग्णालयाकडून हाताळले जात आहेत. शंभर गंभीर रुग्णांमागे ९७ रुग्णांना वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला यश येत आहे. तीन रुग्ण मात्र दगावत असल्याचे पुढे आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. वर्षभरात सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी जिल्ह्यात मंगळवारी (२०) विक्रमी ६८५ रुग्ण सापडले आहेत. त्यात मृतांची संख्या देखील चिंता वाढवणारी आहे. सरासरी पाच रुग्ण दिवसाला दगावत आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला असून संसर्गाबाबत जिल्ह्याची चिंता वाढत आहे. नाशिकमधील दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याचा ऑक्‍सिजन उपलब्धतेबाबत आढावा घेतला असता चिंतेची बाब पुढे आली. जिल्ह्याकडे मुबलक ऑक्‍सिजन नाही. जिल्हा आणि महिला रुग्णालयालाच पुढील २४ तास पुरेल एवढा म्हणजे ५ टन ऑक्‍सिजन आहे. लोटेमध्ये १५ टनाच्यावर ऑक्‍सिजनची व्यवस्था करण्यात आल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात येते. ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या दर दिवशी वाढत आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आरोग्य यंत्रणा रुग्ण वाचवण्याच्या दृष्टीने शर्थीचे प्रयत्न करीत आहे. महिला आणि जिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या एकूण गंभीर रुग्णांपैकी ९७ रुग्णांना वाचवण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. मात्र, १०० मागे ३ रुग्ण दगावत आहेत. ते सुद्धा वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. परंतु अनेक रुग्ण लक्षणे असतानाही उपचारासाठी उशिरा दाखल होत आहेत. त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

हेही वाचा: रत्नागिरीत खराब ऑक्सिजन पाईपलाईनचा स्फोट

"जिल्हा रुग्णालयाला २४ तास पुरेल एवढा पाच टन ऑक्‍सिजन आहे. लोटेत १५ टन ऑक्‍सिजन असल्याची माहिती आहे. उपलब्धतेबाबत प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आम्ही सुमारे अडीचशे गंभीर रुग्ण हाताळत आहोत."

- डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक

दृष्टिक्षेपात...

  • एकूण बाधित १६ हजारांहून अधिक

  • साडेबारा हजार लोक झाले बरे

  • दोन हजार रुग्ण उपचारार्थी दाखल

  • मृत्यूची संख्या ४७५ पर्यंत

  • अतिदक्षता विभागात ३६ बेड