कोकणात ऑलिव्ह रिडले कासवांचा जीवनप्रवास उलगडणार

राजेश शेळके
Friday, 6 November 2020

कासवांच्या संवर्धनातून कासवांचे स्थलांतर आणि त्यांच्या इतर गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे.

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात सापडणार्‍या ऑलिव्ह रिडले कासवांना टॅग करून लवकरच त्यांच्या जीवनप्रवासाचा उलगडा केला जाणार आहे. डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेमार्फत त्यांच्यावर अभ्यास केला जाणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याच्या किनार्‍यावर ही कासवं मोठ्या प्रमाणात सापडतात. कासवांच्या संवर्धनातून कासवांचे स्थलांतर आणि त्यांच्या इतर गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे.

हेही वाचा - चिठ्ठीत उद्धव ठाकरे तुमचंही नाव आलंय, स्वतःला अटक करून घेणार का ? निलेश राणेंचा प्रश्न -

वनविभागाने याला दुजोरा दिला असुन प्रकल्पासाठी 9.87 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. मॅनग्रुव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशनच्या नियामक मंडळाच्या बैठकीत निधीला मंजुरी देण्यात आली आहे. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच टेलिमेट्री अभ्यास सुरू होईल. या अभ्यासातून कासव मध्य पूर्व, पाकिस्तान किंवा श्रीलंकेच्या दिशेने जातात की नाहीत? भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवर कसे स्थलांतर करतात? याबद्दल माहितीचा उलगडा होणार आहे. 

ऑलिव्ह रिडलेच्या कासवांच्या हालचालींवर संशोधकांना वैज्ञानिक ज्ञान मिळू शकेल. त्यामुळे संवर्धन आधारित संशोधन आणि अभ्यास वाढणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांत जवळजवळ  600 ऑलिव्ह रिडले कासव समुद्रकिनारी विश्रांतीच्या ठिकाणी जातात. कासवांवर आवश्यक सेन्सर बसवण्यात येणार आहेत. प्लॅटफॉर्म ट्रान्समीटर टर्मिनल किंवा पीटीटी वापरल्या जातील. त्यानंतर कासवाच्या कडक सेसवर हे ट्रान्समीटर बसविण्यात येईल. 12 ते 14 महिने कासवावर अभ्यास चालणार आहे. पश्‍चिम किनारी भागात प्रथमच अशा प्रकारे अभ्यास करण्यात येणार आहे. ऑलिव्ह रिडलेच्या कासवांच्या पश्‍चिम किनार्‍यावरील संख्येविषयी माहिती मिळून कासवांच्या जीवनप्रवासाचा उलगडा होणार आहे.  

हेही वाचा -  अमेरिकेत ट्रम्पचा पराभव; भारतातही बदल होणार -

"डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेमार्फत ऑलिव्ह रिडले कासवांचा अभ्यास केला जाणार आहे. किनार्‍यावर मोठ्या प्रमाणात ही कासवं आढळतात. ही टीम लवकरच जिल्ह्यात दाखल होणार आहे."

- प्रियांका लगड, रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tortilla olive ridel life strategy opened in ratnagiri participation of dehradun organisation in ratnagiri