रत्नागिरीत होणार  पर्यटन परिषद : पर्यटन तज्ज्ञ करणार मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

भाटलेकर; 27 रोजी आयोजन, हेरिटेज टुरिझम मुख्य विषय 

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन वाढण्यासाठी सलग तिसऱ्या वर्षी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे पर्यटन परिषद आयोजित केली आहे. येत्या 27 जानेवारीला अंबर मंगल कार्यालयात ही परिषद होईल, अशी माहिती रत्नागिरी पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी दिली. 

हेरिटेज टुरिझम-डेस्टिनेशन रत्नागिरी जिल्हा (क्षमता, आव्हाने, संधी, विकास आणि नियोजन) हा यावर्षीच्या पर्यटन परिषदेचा विषय आहे. अंबर मंगल कार्यालयात 27 जानेवारीला सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत ही परिषद होईल. पर्यटनविषयक तज्ज्ञ या वेळी मार्गदर्शन करणार आहेत. प्रवेश मर्यादित असेल.

परिषदेच्या दिवशी त्याच ठिकाणी नोंदणी केली जाणार आहे. जिल्ह्याची पर्यटन क्षमता, आव्हाने, संधी, विकास आणि नियोजन या दिशेने योग्य आराखडा तयार करण्याच्या हेतूने तिसरी पर्यटन परिषद आयोजित केली आहे. परिषदेत हेरिटेज टुरिझम, दुसऱ्या सत्रात शाश्वत पर्यटन क्षमता आणि आव्हाने या विषयावर चर्चासत्र होईल. त्यामध्ये हॉटेल्स असोसिएशन, टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, सामाजिक आणि पर्यटन संस्था, लोकप्रतिनिधी, पर्यटन प्रतिनिधी सहभागी होतील. परिषदेला पर्यटनमंत्री, सर्व आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, पर्यटन महामंडळाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी, बांधकाम अधिकारी यांना निमंत्रित केले आहे. 

पर्यटन विकासासाठी सुविधा 
पर्यटन विकासासाठी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, सागरी महामार्ग, नवे पूल, रेल्वेचे दुपदरीकरण, जहाज वाहतूक, प्रवासी विमान वाहतूक हे प्रकल्प पूर्ण व्हायला हवे आहेत. पर्यटक गोव्याऐवजी रत्नागिरीत राहिला पाहिजे, याकरिता ही परिषद महत्त्वाची आहे, असे भाटलेकर यांनी सांगितले. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tourism conference in Ratnagiri