esakal | थांबलेले पर्यटन बहरले, पर्यटकांची मासळीकडे ओढ  
sakal

बोलून बातमी शोधा

tourism started in ratnagiri

ऑक्टोबर पासून बऱ्यापैकी मासळी मिळू लागली. परंतु, त्यावेळी मासळीला दरच नव्हता. संचारबंदी उठल्यानंतर पर्यटक खास मासळी खरेदीसाठी येऊ लागले आहेत.

थांबलेले पर्यटन बहरले, पर्यटकांची मासळीकडे ओढ  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हर्णे - गेले आठ महिने कोरोनामुळे थांबलेला पर्यटन उद्योग बऱ्यापैकी बहरत असताना पर्यटकांची आवक हळूहळू वाढू लागली आहे. सरकारने उठवलेल्या संचारबंदीमुळे आठ महिने कंटाळलेला पर्यटक आवर्जून ताजी मासळी व सुकी मासळी खाण्यासाठी आणि खरेदीसाठी हजेरी लावू लागले आहेत. बाहेरून मासळी खरेदी करण्यापेक्षा लिलावातून मासळी खरेदी करण्याचे आकर्षण पर्यटकांमध्ये जास्त दिसून येत आहे.


थंड अल्लाहदायक वातावरण, शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला दाभोळ ते केळशी पर्यंतचा समुद्र किनारा. यामुळे दापोलीला पर्यटनदृष्ट्या जागतिक नकाशावर एक महत्वाचे स्थान आहे. कोरोनाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येताच पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक फिरायला बाहेर पडू लागला आहे. तसेच शनिवार पासून लागलेल्या सलग दिवाळी सुट्टीच्या निमित्ताने लॉकडाऊनच्या काळात कंटाळलेला पर्यटक पर्यटनासाठी दापोलीमध्ये येऊ लागला आहे आणि दापोलीमध्ये आलेला पर्यटक हर्णे बंदरामध्ये आल्याशिवाय माघारी फिरत नाही.

ऑगस्ट महिन्यापासून मासेमारीला सुरुवात झाली पण सुरुवातीपासूनच वारंवार वादळं येत गेल्यामुळे सप्टेंबर महिन्यापर्यंत मासळीची आवकच नव्हती. ऑक्टोबर पासून बऱ्यापैकी मासळी मिळू लागली. परंतु, त्यावेळी मासळीला दरच नव्हता. संचारबंदी उठल्यानंतर पर्यटक खास मासळी खरेदीसाठी येऊ लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मासळी खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. दापोली तालुक्यात कोणत्याही ठिकाणी वास्तव्याला आलेला पर्यटक हर्णे बंदरामधील मासळीच्या वेगवेगळ्या जाती खरेदी व खास आवर्जून खाण्यासाठी येतच असतात. त्याप्रमाणे आता तालुक्यातील बहुतांशी हॉटेल व रिसॉर्टना झिंगा फ्राय, पापलेट थाळी, सुरमई थाळी, कोळंबी बिर्याणी आदी मासळीच्या चटकदार मसालेदार डिशेस खाण्यासाठी पर्यटकांची कोकणात यायला सुरुवात झाली आहे. सध्या पापलेट, सुरमई, हलवा, कोलंबी, म्हाकुळ आदी चांगल्या प्रतीच्या मासळीची आवक सुरू झाल्याने खवय्यांसाठी पर्वणी झाली आहे. येथील निसर्गसौंदर्याची भुरळ पर्यटकांना पडतेच; परंतु कोकणी पद्धतीच्या घरगुती जेवणाची लज्जत ही वेगळीच असते. 

हे पण वाचामहावितरणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा पवित्रा नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतला

दापोलीत आलो आणि हर्णे बंदरातली ताजी मासळी खाल्ली नाही असं एकाही पर्यटकाकडून होत नाही. गेले पाच ते सहा दिवस मासळी खाण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी पर्यटक हर्णै बंदरामध्ये आवर्जून हजेरी लावू लागले आहेत. ताजे ताजे मासे अक्षरशः लिलावा मधून व चिमणी बाजारातून पर्यटक खरेदी करत आहेत.  

संपादन - धनाजी सुर्वे