पर्यटकांच्या आग्रहात्सव सिंंधुदुर्गावर होडी वाहतूक सुरू

प्रशांत हिंदळेकर
Sunday, 26 May 2019

समुद्रातून प्रवासी वाहतूक करण्यास कालपासून शासनाने बंदी आदेश लागू केलr आहे. त्यामुळे आज येथे हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. किल्ला दर्शनास आलेल्या हजारो पर्यटकांना सकाळपासूनच भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. पर्यटकांनी किल्ले प्रवासी होडी वाहतूक संघटनेकडे सातत्याने मागणी केल्याने अखेर पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी दुपारी बारा वाजता किल्ले प्रवासी होडी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय संघटनेने घेतला.

मालवण - समुद्रातून प्रवासी वाहतूक करण्यास कालपासून शासनाने बंदी आदेश लागू केलr आहे. त्यामुळे आज येथे हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. किल्ला दर्शनास आलेल्या हजारो पर्यटकांना सकाळपासूनच भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. पर्यटकांनी किल्ले प्रवासी होडी वाहतूक संघटनेकडे सातत्याने मागणी केल्याने अखेर पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी दुपारी बारा वाजता किल्ले प्रवासी होडी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय संघटनेने घेतला. त्यामुळे किल्ले प्रवासी वाहतूकीबरोबरच दांडी परिसरातील जलक्रीडा प्रकार सुरू ठेवण्यात आल्याचे दिसून आले.

दरम्यान तारकर्ली, देवबाग येथील जलक्रीडा व्यवसाय सकाळपासूनच बंद ठेवण्यात आल्याने पर्यटकांना माघारी परतावे लागले. प्रादेशिक बंदर अधिकारी सूरज नाईक यांनी व्यावसायिकांना वाढीव मुदत देण्याचा आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून आला नसल्याचे स्पष्ट केले. 

याबाबत अधिक माहिती अशी,  सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतुकीस शासनाने २५ मेपासून बंदीचे आदेश दिले. याचा फटका आज रविवारच्या दिवशी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूकीसह स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग या जलक्रीडा पर्यटन व्यावसायिकांना बसला. पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याने किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी, जलक्रीडा व्यावसायिकांनी येथील बंदर कार्यालयात धाव घेतली. यावेळी प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक, बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांच्याकडे होडी प्रवासी वाहतूकीसह जलक्रीडा, स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंगसाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. यावर कॅप्टन नाईक यांनी मुंबईतील मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यालयातून मुदतवाढ देण्याबाबत कोणतेही आदेश प्राप्त नसल्याचे स्पष्ट केले. समुद्रातील वातावरण चांगले असताना बंदर विभागाकडून मुदतवाढ देण्यास दिरंगाई होत असल्याने पर्यटन व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली. दुपारी १२ वाजेपर्यंत बंदर विभागाकडून कोणतेही आदेश न आल्याने पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रवासी वाहतूक संघटनेने सिंधुदुर्ग किल्ल्यावर अनधिकृतरीत्या प्रवासी वाहतूक सुरू केली.

सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक प्रवासी संघटनेच्यावतीने ४ एप्रिलला बंदर विभागाच्या मुंबईतील वरिष्ठ कार्यालयात प्रवासी होडी वाहतुकीस मुदतवाढ मिळावी यासाठी पत्र दिले होते. मात्र वातावरण चांगले असताना आज रविवारच्या सुटीदिवशी मोठ्या संख्येने पर्यटक आले असताना त्याची बंदर विभागाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असतानाही पर्यटकांच्या सोयी सुविधांसाठी शासनाचे उदासीन धोरण आहे. शासनाच्या बंदी कायद्याचा आम्हाला आदर आहे. मात्र पर्यटन व्यावसायिक म्हणून येथे आलेल्या पर्यटकांची आम्ही गैरसोय होऊ देणार नाही. आज सकाळपासून आम्ही किल्ला प्रवासी वाहतूक बंद ठेवली होती. दुपारी बारा वाजेपर्यंत ही वाहतूक बंद होती. मात्र पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होऊ लागल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बारा वाजल्यानंतर प्रवासी होडी वाहतूक सुरू करण्यात आली

-  मंगेश सावंत,

अध्यक्ष, सिंधुदुर्ग किल्ला होडी व्यावसायिक संघटना 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourist Insistence to stats Boating in Sindhudurg