दुकाने सुरू ठेवण्या संदर्भात व्यापारी महासंघाने केली आहे `ही` मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

उन्हाळा असल्याने सकाळी अकरा वाजल्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत कडक उन्ह असते. या कालावधीत घराबाहेर पडणे अशक्‍य होते. संध्याकाळी पाच वाजता शासकीय बंधनामुळे दुकानदारांना दुकाने बंद करावी लागत आहेत.

मालवण ( सिंधुदुर्ग ) - देशात अनलॉक 1 मध्ये सर्व नागरिकांना आपले दैनंदिन व्यवहार सकाळी सात ते सायंकाळी सात यावेळेतच आटोपावे लागत आहेत. या परिस्थितीत परवानगी दिलेल्या व्यवसायांना आपल्या आस्थापना उघड्या ठेवण्यासाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच असे वेळेचे बंधन घातले आहे. हे बंधन व्यापाऱ्यांबरोबरच ग्राहकांनाही जाचक ठरत आहे. त्यामुळे व्यवसाय सुरू ठेवण्याची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत करावी, अशी मागणी व्यापारी महासंघाच्यावतीने करण्यात येत आहे. 

उन्हाळा असल्याने सकाळी अकरा वाजल्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत कडक उन्ह असते. या कालावधीत घराबाहेर पडणे अशक्‍य होते. संध्याकाळी पाच वाजता शासकीय बंधनामुळे दुकानदारांना दुकाने बंद करावी लागत आहेत. त्यामुळे ग्राहकांना नाईलाजास्तव सकाळी नऊ ते साडे बारा यावेळेतच जीवनावश्‍यक गरजांची पूर्तता करण्यासाठी बाजारात येणे भाग पडत आहे.

साहजिकच यावेळेत बाजारात एकच गर्दी होऊन सोशन डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन होत आहे. यातून कोरोनाच्या प्रसाराची शक्‍यता वाढण्याबरोबरच दुकानदारांना कारवाईची भीती भेडसावत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन नुकत्याच पार पडलेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत महासंघाच्यावतीने जिल्ह्यातील दुकाने उघडी ठेवण्याची वेळ सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे सहा अशी बदलण्यात यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी प्रशासनाकडे केली होती. 

प्रशासनाच्यावतीने याबाबत सकारात्मक प्रतिसाद देण्याचे मान्य करून हे व्यवसाय उघडे ठेवण्याच्या वेळाबाबतचे आदेश हे राज्यस्तरावरून निघालेले असल्याने त्यात बदल करण्याचे अधिकार राज्यस्तरावरच असल्याचे स्पष्ट केले होते. जिल्ह्यातील व्यापारी बांधवांची ही मागणी रास्त असून राज्यस्तरावर मांडण्याचे प्रशासनाकडून मान्य केले होते; मात्र या मागणीला आठवडा उलटूनही दुकाने उघडी ठेवण्याच्या वेळेतील बदला बाबत अद्याप कोणताही प्रतिसाद प्रशासनाकडून न मिळाल्याने आज जाहीरपणे ही मागणी महासंघाच्यावतीने करण्यात येत आहे. 

याबाबतचे स्वतंत्र निवेदन जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांना पाठविण्यात येत आहे. ग्राहकहित लक्षात घेऊन सर्वांनीच व्यापारी बांधवांच्या या न्याय मागणीला सकारात्मकतेने घेऊन दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे सहा अशी बदलण्यासाठी प्रयत्न करावेत; अशी विनंती व्यापारी महासंघाच्यावतीने सर्व लोकप्रतिनिधी, राज्यकर्ते व राजकीय पक्षांच्या नेत्यांना करण्यात येत आहे. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traders Federation Demanded About Shop Opening Timing