esakal | जत्रोत्सवात स्टॉलला परवानगीची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

 Traders from Sindhudurg district gave a statement to MLA Deepak Kesarkar

जिल्ह्यातील मोठ्या जत्रोत्सवापैकी गणल्या जाणाऱ्या सोनुर्ली माऊली देवीच्या जत्रोत्सोवामध्येही बाहेरील व्यापाऱ्यांना दुकाने लावण्यात बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

जत्रोत्सवात स्टॉलला परवानगीची मागणी

sakal_logo
By
रुपेश हिराप

सावंतवाडी (सिंधुदुर्ग)  डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या जिल्ह्यातील पारंपरिक जत्रोत्सवात स्टॉल लावण्याची परवानगी द्या, अटी व शर्थींच्या अधीन राहून व्यापार करू, अशी मागणी जिल्ह्यातील स्टॉलधारक व्यापाऱ्यांनी आज आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदनही त्यांनी श्री. केसरकर यांच्याकडे सुपूर्द केले. 
जिल्ह्यामध्ये होणाऱ्या गावागावांतील पारंपरिक जत्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक उलाढाल होते.

जिल्ह्यातील अनेक तरुण बेरोजगार व व्यावसायिक छोट्या-मोठ्या व्यापार उद्योगातून चरितार्थ चालवीत. बहुतांश व्यापाऱ्यांचे वर्षभराचे उत्पन्न या जत्रोत्सवाच्या व्यापारावर अवलंबून असते. खेळणी, हॉटेल, मिठाई, खाजे, कापड, चप्पल, सौंदर्य साधने, आईस्क्रीम, थंड पेय, केळी विक्रेत्या, फुले विक्रेत्या आदी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक व्यवसाय करतात; मात्र या वर्षी होणाऱ्या जत्रोत्सवामध्ये कोरोनाचे संकट लक्षात घेता गावाबाहेरील व्यापाऱ्यांना दुकाने थाटण्यात बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या जत्रोत्सवापैकी गणल्या जाणाऱ्या सोनुर्ली माऊली देवीच्या जत्रोत्सोवामध्येही बाहेरील व्यापाऱ्यांना दुकाने लावण्यात बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

सोनुर्ली जत्रोत्सव संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यांमध्ये प्रसिद्ध असल्याने या जत्रोत्सवात व्यापारी वर्गाची मोठी उलाढाल होते; मात्र या वर्षी दुकाने लावण्यात बंदी असल्याने व्यापारी वर्गाने आमदार केसरकर यांची भेट घेत जिल्ह्यामध्ये आता होणाऱ्या जत्रोत्सवात दुकाने लावण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी केली. या वेळी बाबुराव नळेकर, महेश आंगचेकर, आनंद धडाम, संजय तानावडे, सुशील घाडी, हेमंत पांगम, इम्तियाज शेख, सखाराम आंगचेकर, संजय तानावडे, नंदकिशोर नळेकर, हर्षाली रजपूत, जयवंत शिर्के, विष्णू गावडे, दीया मालवणकर, सुशील घाडी, विष्णू गावडे, प्रमोद गावडे, संतोष सावळ, आपा सावंत आदी उपस्थित होते. 

व्यापारी मेटाकुटीस 
निवेदनात म्हटले आहे, की कोरोना काळात व्यापारी मेटाकुटीस आले आहेत. आता व्यापारास परवानगी न मिळाल्यास उपासमारीची वेळ येईल. शासनाने इतरस्तरावर व्यापार सुरू करण्यासंदर्भात विविध अटी व शर्ती ठेवून व्यापारास परवानगी दिली आहे. याच धर्तीवर जत्रोत्सवामध्येही अटी व शर्तीच्या अधीन राहून दुकाने लावण्यास परवानगी मिळावी. 

संपादन - राहुल पाटील

loading image