रत्नागिरीकर यंदा मूर्तींना मुखवटे करण्याची प्रथा जपणार

मकरंद पटवर्धन
Tuesday, 17 November 2020

रूपं लावण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून रत्नागिरीकर जपत आहेत.

रत्नागिरी : शहरातील विविध मंदिरांतील मूळ मूर्तींना अन्य देवतांचे मुखवटे (रूप) साकारण्याची प्रथा दरवर्षीप्रमाणे यंदाही जपली जाणार आहे. मंदिरे खुली करण्याचे आदेश शासनाने जारी केल्यामुळे मंदिरांमध्ये ही प्रथा जपली जाणार असून ही रूपं पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनाही संधी मिळणार आहे.

रूपं लावण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून रत्नागिरीकर जपत आहेत. दरवर्षी दीपावलीच्या सणानंतर रूपे देण्यास सुरवात होते. शहरातील राधाकृष्ण मंदिर, राम मंदिर, विठ्ठल मंदिर, पतितपावन मंदिरात हा सोहळा पाहण्याची पर्वणी त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत मिळणार आहे. कोकणात या परंपरेला मोठे महत्त्व असून रत्नागिरीसारख्या ठिकाणी कला अपवादानेच पाहायला मिळते. मंदिरातील मूळ देवतांच्या मूर्तीला विविध रूपांमध्ये देवाची पूजा बांधली जाते.

हेही वाचा - शिवसेनेने भावनेच्या आहारी जाऊन रिफायनरी प्रकल्प रद्द केला -

मूर्तींचे रूप बदलण्याचे काम मेणाच्या साहाय्याने केले जाते. दीपावलीच्या काळात या मंदिरांमध्ये मूूळ देवतांच्या मूर्तीला दररोज वेगवेगळी रूपे तसेच पूजा बांधली जाते. या काळात मंदिरात सकाळी काकडा आरती केली जाते. त्यानंतर दुपारी विविध देवदेवतांच्या स्वरूपातील रूपे मंदिरातील मूळ मूर्तींना देण्यास सुरवात होते. रात्री ११.३० पर्यंत ही रूपे पाहण्यासाठी खुली असतात. राधाकृष्ण मंदिरातील देवांची रूपे बदलण्याची परंपरा राधाकृष्ण वैश्‍य समाज जपतो. ही प्रथा सुमारे शंभर वर्षांची असल्याचे जाणकार सांगतात. येथील मूर्तींवर लक्ष्मी, कृष्ण-सुदामा, साईबाबा, विठ्ठल रखुमाई, दत्त, ग्रामदैवत भैरी बुवा, श्री स्वामी समर्थ, संत तुकाराम आदींची रूपे या मंदिरात करतात.

"कोकणात शिमगोत्सवामध्ये सर्व ग्रामदैवतांना रूपं लावली जातात. ही रूपं त्याच देवतांची असतात. पण दिवाळीमध्ये रत्नागिरीतल्या मूर्तींना दुसऱ्या देवतांचे रूप देण्याची प्रथा आहे. येथील कलाकार ही रूपं सुरेख व चपखलपणे साकारतात."

- विजय पेडणेकर, विठ्ठल मंदिर

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the tradition of ratnagiri people to idol this year also experienced this in ratnagiri