महाराष्ट्रात ब्लॅकमॅजीकसाठी 'या' प्राण्याला आहे मोठी मागणी ; होतेय लाखाची उलाढाल

राजेश कळंबटे
Friday, 11 September 2020

*पश्‍चिम बंगालमध्ये सर्वाधिक प्रकार
* अनेक गैरसमज
* वजन एक ते पाऊण किलो

रत्नागिरी : समज-गैरसमाजामधून विविध प्रकारच्या प्राण्यांची तस्करी केली जाते. त्याप्रमाणेच विशिष्ठ वजनाचे आणि लांबीच्या मांडूळांचा उपयोग ‘ब्लॅकमॅजीक’मध्ये केला जात असल्याचे पुढे येत आहे. त्यातूनच संपूर्ण महाराष्ट्रात तस्करीचे प्रकार घडतात. ब्लॅकमॅजीकचे हे प्रकार पश्‍चिम बंगालमध्ये सर्वाधिक होत असल्याचा अंदाज आहे.

अंधश्रद्धा आणि गैरसमजामधून अनेकजण वन्यप्राण्यांच्या तस्करीकडे वळतात. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल केली जाते. त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेसह काही प्राणीमित्रही कार्यरत आहेत. रत्नागिरीत मांडूळ आणि खवले मांजराची तस्करी करणार्‍या आठ जणांची टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मांडूळाची तस्करी ही काळ्या जादुटोण्यासाठी केली जात असून त्याच्यामुळे भरपूर पैसे मिळतात असा समज आहे.

हेही वाचा- ...अखेर आठ महिन्यांनी स्वप्नील पोहोचला घरी!

पैशाच्या हव्यासापोटी त्याचा बळी घेतला जातो. त्याला डबल इंजिन असेही म्हणतात. चार किलो वजनाचा मांडूळ पाहिजे अशी मागणी केली जाते; परंतु हा साडेतीन फुटापर्यंत वाढतो, त्याचे वजन जास्तीत जास्त पाऊण ते एक किलोपर्यंतच राहते. त्यापेक्षा अधिक वजनाचे मांडूळ कुठेच सापडत नाही. वर्तमान पत्रावर हा साप ठेवला की अक्षरे गायब झाली पाहिजेत, पाण्यात ठेवल्यानंतर त्याची दोन्ही तोंडे ही यु आकारात पाण्यावर आली तरच तो फायदेशीर असा समज आहे.

प्रत्यक्षात या दोन्ही गोष्टीही होऊ शकत नाहीत. तसेच आरशासमोर मांडूळ ठेवला तर त्याचे प्रतिबिंब दिसता कामा नये, त्यांच्या संपर्कात टेस्टर नेल्यास तो पेटला तर त्याची उपयुक्तता अधिक असाही गैरसमज आहे. लक्षण असतील तर त्याला लाखो रुपयांना विकले जात असल्याचे पुढे येत आहे. याचा जमिनीतील गुप्तधन शोधण्यासाठीही याचा वापर होतो.

हेही वाचा- ऑनलाईनचा डाव ठरला भारी़, बीओटी काॅम्प्लेक्सला खडाजंगीत घेतली मंजुरी, कोकणातील कुठल्या पालिकेत घडला प्रकार

कसा असतो मांडूळ

मांडूळ या सापाला दुतोंड्या, माटीखाया, मालण तर त्याचे इंग्रजी नाव रेड सॅण्ड बोआ आहे. हा लाजाळू व शांत स्वभावाचा साप आहे. मंद हालचाल, जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने त्याला दुतोंड्या म्हटले जाते. लालसर किंवा तपकिरी रंग, पोटाचा रंग फिकट तपकिरी तोंड व शेपटी आखूड, डोळे लहान, बाहुली उभी असे त्याचे वर्णन करता येईल. जमिनीत राहणारा हा साप तोंड शरीराच्या मानाने बारीक असल्याने मातीत, वाळूत सहज शिरतो. भक्ष्याभोवती विळखा घालून भक्ष्याचा जीव गेल्यावर भक्ष्य गिळतो. सरासरी लांबी 75 सेमी (2 फूट 6 इंच) तर अधिकतम लांबी 100 सेंमी (3 फूट 3 इंच) असते. याचे खाद्य मुख्यतः उंदीर किंवा लहान सस्तन प्राणी, पाली, सरडे, छोटे पक्षी आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र याचे वास्तव आहे; परंतु कोकणात मांडूळ दुर्मिळ आहे.

अंधश्रद्धा आणि गैरसमजामधून मांडूळ जातीच्या सापाचा बळी दिला जातो. या प्राण्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

-ज्ञानेश्‍वर म्हात्रे, सर्प अभ्यासक, रत्नागिरी

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trafficking of foreheads from Blackmagic caused by superstition Also known as double engine